कोहळीकरांच्या 'मुख्यमंत्री' भेटीचा गॉडफादर कोण ? राजकीय तर्कवितर्कांना उधाण

श्री. कोहळीकर यांच्या बंडखोरी व अपक्ष राहण्यामुळे शिवसेना विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारकरीत्या तिसऱ्या क्रमांकावर गेली होती. कोहळीकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवीली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शशिकांत धानोरकर

तामसा ( जिल्हा नांदेड ) : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा २०१९ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविणारे बाबुराव कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विकासकामांचे निवेदन दिले असले तरी ही भेट घडवून आणणारा 'गॉडफादर' कोण ? याबाबतच्या तर्कवितर्कांना हदगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

श्री. कोहळीकर यांच्या बंडखोरी व अपक्ष राहण्यामुळे शिवसेना विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारकरीत्या तिसऱ्या क्रमांकावर गेली होती. कोहळीकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवीली होती. पक्षविरोधी कारवाई त्यांच्याविरुद्ध करीत पक्षाने बाहेरचा रस्ता दाखविला होता. पण निवडणुकीनंतर दीड वर्षाचा कालावधी लोटला असून पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बाबुराव कदम यांनी बंडखोरी केली तरी ते जनाधार असणारे शिवसैनिक होते. हे निकालाने सिद्ध केले होते. याच कारणामुळे कोहळीकर यांनी पक्षातील वरिष्ठांशी स्नेहसंबंध कायम ठेवले असावेत.

हेही वाचा - कोथरूड ते आनंद नगर मेट्रो रुळावरून धावली; अंतर्गत चाचणी यशस्वी

पंधरवड्यापूर्वी कोहळीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची थेट- भेट घेतल्याचे फोटो व्हायरल होताच तालुक्यात क्रिया- प्रतिक्रिया उमटून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीपेक्षा भेट घडवून आणणाऱ्याचीच जास्त चर्चा होत आहे. मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोहळीकर यांच्या बाबतीत 'सॉफ्ट' करुन प्रत्यक्ष निवेदनातून चर्चा होण्यामुळे तालुक्यात अनेकांची अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोहळीकरांना बराच वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकल्याचे समजते. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात पक्षीय पातळीवर संभाव्य घटना- घडामोडीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे पडसाद सोशल मीडियावर समर्थक व विरोधक यांच्या क्रिया-प्रतिक्रियातून बघायला मिळत आहेत.

कोहळीकर यांचे पक्षात पुनर्वसन होऊन त्याचा फायदा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला मिळवण्याचा विचार होत आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच कोहळीकरांची मुख्यमंत्रीभेट होणे अन् जिल्हाप्रमुख पदाची निवड लांबणीवर पडणे या घटनांचा राजकीय अर्थ शोधला जात आहे. या भेटीपूर्वी तालुक्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद मिळणार अशी चर्चा व शक्यता होती. आता मात्र जिल्हाप्रमुख पद कोणाला मिळणार ? अशीही चर्चा वाढली आहे.या भेटीनंतर एक माजी राज्यमंत्र्याच्या उपस्थितीत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या गावात झालेली मोठी बैठक चर्चेत आहे. बैठक खेळीमेळीत झाल्याचे सांगितले जात असले तरी मुख्यमंत्रीभेटीच्या कथित गॉडफादरच्या भूमिकेवर गंभीर कुजबुज अनेकांनी खाजगी रुपात व्यक्त केल्याचे समजते.

येथे क्लिक करा - ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चुराडा ४ मृत्यू

बाबुराव कोहळीकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेली भेट केवळ तालुक्यातील विकास प्रश्नावरुन निवेदन देण्यापुरतीच मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे. पण ही भेट तालुक्याच्या राजकारणात भविष्यात राजकीय उलथापालथ घडविण्याची नांदी ठरल्यास आश्चर्य वाटणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचे 'माध्यम' असलेले गॉडफादर कोण ? याबाबत कोहळीकर यांनी बाळगलेले मौन राजकीय संशयकल्लोळ वाढविणारे ठरत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com