Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला.
Marathwada Liberation Day
Marathwada Liberation DaySaam Tv

औरंगाबाद - आज मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. पण मराठवाडा आजही मागासलेपणाच्या जोखडात अडकलाय. काही क्षेत्रात भरारीही घेतली, आज अमृत महोत्सव साजरा करताना पुन्हा मुक्ती संग्रामाचा लढा आठवला जातोय. 75 वर्षात मराठवाड्याने काय मिळवलं, यावर आता चर्चा सुरू आहे.

मराठवाडा (Marathwada) हा हैद्राबाद संस्थानात होता. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

हे देखील पाहा -

हैदराबाद संस्थानची त्यावेळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता.मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले.दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्गजी जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच सूर्यभान पवार आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा नं बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाली – ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामूळे. ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळे जनतेस न्याय मिळाला.

मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद काबिज केले.

१५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला.

हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत.

Marathwada Liberation Day
Petrol Diesel: कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

मराठवाडा कसा आहे?

मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे ६४५९० चौ. किमी असून यामध्ये पुढील ८ जिल्हे आणि ७६ तालूके व ६३ बाजारपेठेची शहरं आहेत.

१) औरंगाबाद

२) नांदेड

३) परभणी

४) बीड

५) जालना

६) लातूर

७) उस्मानाबाद व

८) हिंगोली

दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, ५२ दरवाजे, पानचक्की, ३ जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com