वारी बंद झाल्याने येलदरी कॅम्प येथील वारकऱ्यांनी शोधला पर्याय

आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते.
वारी बंद झाल्याने येलदरी कॅम्प येथील वारकऱ्यांनी शोधला पर्याय
जिंतूर येथे काढली वारकरी दींडी

राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : कोरोनामुळे पंढरपूरची वारी बंद झाल्याने तालुक्यातील येलदरी कॅम्प, मुरुमखेडा, सावंगी- म्हाळसा येथील वारकऱ्यांनी गावातच प्रतिकात्मक वारी काढून श्री विठ्ठलाचे नामस्मरण सुरु केले.

आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. परंतु यंदा कोरोना विषाणूची साथ आणि लॉकडाऊनमुळे वारीवर अनिश्चिततेचं सावट आहे. मात्र दुसऱ्या वर्षीही पंढरपूरची वारी चुकू नये म्हणून या गावांमधील वारकरी संप्रदायातील मधुकर सनईकर यांनी एक अनोखा उपाय शोधून गावातच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापासून दररोज पायी दिंडी काढण्याचा निश्चय केला.त्यास इतरांचाही प्रतिसाद मिळाल्याने या दिंडी सोहळ्यात येलदरी येथील भजनी मंडळासह वारकरी सांप्रदायातील अनेक भक्तगण सामील होत असून त्यांना दररोज पंढरपूरच्या वारीमध्ये चालत असल्याचा आनंद मिळत आहे.

हेही वाचा -

विशेष म्हणजे यावेळी गर्दी न करता कोरोनाचे सर्व नियम पाळत सामाजिक अंतर राखून हा पालखी सोहळा आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या आषाढ पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व आहे. वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत शासनाने पायी वारीला परवानगी दिली नाही. त्यामुळे वारकरी मंडळीना याही वर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला जाता येणार नाही. लॉकडाऊनचे नियम शिथील झाले असलेतरी राज्यातील बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावरील निर्बंध आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नेहमीसारखा सोहळा झाला नाही, तरी परंपरांमध्ये खंड पडू नये असे मधुकर सनईकर यांना वाटले. यावर उपाय म्हणून त्यांनी येलदरी परिसरातील भजनी मंडळींच्या सहकार्याने वारकऱ्यांना गावातच पायी चालत वारीचा पर्याय उपलब्ध करुन दिला.

बघता बघता या वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने रोजच वारीतील संख्या वाढत आहे. दिंडीतील भक्तांना गावातील नागरिकांकडून चहा पाणी, नाष्टा दिला जात आहे. त्यामुळे आपण पंढरपूरच्या वारीतच चालत जात असल्याचा आनंद वारकऱ्यांना येत आहे. या उपक्रमात बाबुराव मुळे, कोंडीबा रणबावळे, शामराव जाधव, दिगंबर होडबे, बबन माकोडे, भास्कर कापुरे, गणेश स्वामी, व्यंकटेश सोनकेपल्ली, गणेश ढाकणे, विजय जैस्वाल आदींनी पुढाकार घेतला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com