
संजय राठोड
यवतमाळ : राज्यात २०१३ साली जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला. मात्र अद्यापही समाजातून अंधश्रद्धेचे भूत उतरलेलं नाही. गुप्तधन शोधण्याच्या मोहात अनेक ठिकाणी अघोरी प्रयोग केल्याचे प्रकार उघडकीस येताहेत. असाच काहीसा एक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातून समोर आला आहे. यवतमाळच्या पांढरकवडा जवळ असलेल्या केळापूरमध्ये गुप्तधनासाठी पतीने चक्क आपल्याच पत्नीवर अघोरी प्रयोग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. (Yavatmal Crime News)
पतीला गुप्तधन शोधण्याचे इतके वेड लागले की, त्याने चक्क अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याच्या मोहात स्वतःच्या पत्नीवर अनेक मांत्रिक प्रयोग केले. गुप्तधनासाठी पत्नीला अंगारा लावणे, लिंबू, हार टाकणे, माणसाची कवटी तिच्या गळ्यात टाकणे तसेच जडीबुटीचे औषध देऊन तिला जीवाने मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही बाब पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने या नराधम पतीची कृत्य आपल्या आई-वडिलांना फोनवरून सांगितली.
दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी तत्काळ केळापूर गाठून याबाबतची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य, प्रतिबंध व निर्मूलन आणि काळा जादू, हुंडाबंदी कायद्या अंतर्गत सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच घटनेतील सहाही आरोपी फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह 10 वर्षापूर्वी केळापूर येथील प्रवीण गोविंदराव शेगर याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर एक ते दिड वर्ष पीडीतेला सासरच्या मंडळीकडून चांगली वागणूक देण्यात आली. परंतू काही दिवसानंतर सासरच्या मंडळींनी माहेरून दोन लाख रुपये आण असा तगादा पीडितेकडे लावला. दरम्यानच्या काळात तिच्या पतीला व सासरच्या मंडळीला गुप्तधन शोधण्याचे वेड लागले. अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याचा मोहात पतीसह सासरच्या मंडळीने अनेक वेळा पीडितेवर मांत्रिक प्रयोग केला.
विशेष म्हणजे गुप्तधनासाठी सुनेचा नरबळी देण्याचा हट्ट पती सह सासरच्या मंडळीनी धरला होता. मात्र पिडीत महिला याला नकार देत असल्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्या जात असल्याने तिने पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून केळापूर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच सहाही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.