Beed News
Beed News Saam TV

'मी हे सहन करू शकत नाही म्हणत', सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या!

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल, मात्र सावकारकीचा कलम नाही..

बीड: बीड जिल्ह्यात (Beed District) खाजगी सावकारांनी मांडलेल्या उच्छादाचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका विस्तार अधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलाला, चक्क खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागली आहे. विशेष म्हणजे हे राजकीय पदाधिकारी असणारे सावकार आहेत. कोणी उपजिल्हाप्रमुख तर कोणी नगरसेवक तर कोणाची आई नगरसेवक आहे.

राजकीय पदाधिकारी असणाऱ्या, खाजगी सावकारांकडून घेतलेले पैसे अव्वाच्या सव्वा व्याजासह देऊनही, कुटुंबियांना सावकाराकडून दिला जाणारा त्रास असाह्य झाल्याने, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थी तरुणाने, गळफास घेऊन स्वतः जीवन संपवलं आहे. "मी हे सहन करू शकत नाही, मला माफ करा". असा व्हाट्सअप मेसेज कुटुंबियांना करत त्याने आत्महत्या केलीये. तर याप्रकरणी दोन आठवड्यानंतर, बीड शहर पोलीस (Beed Police) ठाण्यामध्ये, 5 सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed News
बंगाली अभिनेत्री पल्लवी डे च्या मृत्यू प्रकरणात लिव्ह-इन-पार्टनर शग्निक गोत्यात

पंकज बबन काळे वय 21 रा. जिजामाता चौक बीड, असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मयत पंकजचे वडील बबन काळे हे माजलगाव पंचायत समितीत विस्ताराधिकारी आहेत. त्यांनी 2019 मध्ये दहा रुपये शेकडा दराने, किशोर बाजीराव पिंगळे या सावकाराकडून सात लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील 60 आर जमीन आणि बीड शहरातील पत्नीच्या नावे असणारे राहते घर सावकार पिंगळे याने लिहून नोटरी करून घेतलं होतं.

त्यानंतर व्याजासह मूळ रक्कम पिंगळे यास देऊनही, सावकार पिंगळे याने बबन काळे यांच्या पत्नीवर धनादेश न वटल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर 1 मे रोजी विस्ताराधिकारी असणारे, बबन काळे हे माजलगावला ध्वजारोहणासाठी गेले होते. त्या दिवशी कुटुंबातील व्यक्ती देखील बाहेर होते, मात्र मयत पंकज हा एकटाच घरी होता.

सावकाराकडून घरी येऊन सततची धमकी, मारहाण याला वैतागून शेवटी पंकजने कुटुंबीयांना व्हाट्सअप द्वारे मेसेज करून, घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत पंकज याचे वडील बबन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, किशोर पिंगळे, रंणजीत पिंगळे, राजकुमार गुरखुदे, हनुमंत उर्फ बंडू पिंगळे आणि आशिष सोनी यांच्याविरोधात, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान एक सावकाराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय मात्र 4 सावकार अद्यापही फरार आहेत.

दरम्यान बीडमध्ये शिवसेना असो की राष्ट्रवादी अथवा भाजप सगळ्या पक्षात काम करणारे अनेक लोक हे खाजगी सावकारकी करतात. काहीजण अर्बन निधीच्या नावाखाली तर काहीजण वडापाव विकण्याच्या नावाखाली अन काहीजण खुलेआमपणे लोकांना रोजाने पैसे देतात.त्यांच्याकडून लाखाचे दहा लाख कमावतात.हे सगळं प्रशासनातील सगळ्यांना माहीत आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप ठोस अशी कारवाई झाली नाही. त्यामुळं आता तरी या सावकारांसह इतर सावकारांवर कारवाई होणार का ? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com