लग्नकल्लोळ! सुहागरात्री बाहेरून कडी लावून पळालेल्या वधूला अटक

लग्न
लग्न

नीलेश दिवटे

कर्जत : नव्यानेच ओळख झालेल्या मित्राने परस्पर लग्न ठरविले. त्यापोटी दोन लाख दहा हजार रुपयेही घेतले. ठरलेल्या तारखेला व ठरलेल्या वेळी लग्नसोहळा पारही पडला. मात्र, मीलनाची स्वप्ने रंगवत असतानाच वधू पळून गेल्याने, वराच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. त्याने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत आपबीती सांगितली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून वधूसह चौघांना अटक केली. तसेच, त्यांच्याकडून ८० हजार रुपये हस्तगत केले.

याबाबत माहिती अशी ः तालुक्यातील एका विवाहेच्छू युवकाचे लग्ण मोठे प्रयत्न करूनही जमत नव्हते. बऱ्याच शोधाशोधीनंतर त्याची एकाशी ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. मित्राने, ‘चल, मी तुझ्यासाठी चांगली मुलगी शोधली आहे. तुझे तिच्याशी लग्न लावून देतो; मात्र काही खर्च येईल,’ असे सांगितले. हे ऐकून उपवर मुलाला आकाश ठेंगणे झाले. त्याने काहीही विचार न करता क्षणार्धात होकार कळविला.

लग्न
पंकजा मुंडे , विनोद तावडे मोदींच्या भेटीला

विवाहसोहळ्यासाठी दोन लाख दहा हजार रुपये खर्च येईल, असे मध्यस्थाने सांगितले. रक्कम ताब्यात घेतल्यानंतर ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला. नंतर मंतरलेले दोन दिवस गेले. दोघांचे मिलन होण्याचा दिवस उजाडला; मात्र बराच वेळ गेला तरी वधू काही येईना. वराने बाहेर जाऊन सगळीकडे शोधले; मात्र ती सापडली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वराने पोलिसांसमोर आपबीती कथन करीत तक्रार नोंदविली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत राजू ऊर्फ राजेंद्र वैजनाथ हिवाळे (रा. माजलगाव, ता. जि. परभणी), विलास जिजरे (रा. हिंगोली, जि. हिंगोली), मंगलाबाई दत्तराव वाघ (रा. पोखणी, जि. परभणी), वधू पल्लवी गोमाजी सगट (वय २०, रा. मोहाला, ता. सोनपेठ, जि. परभणी) यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून ८० हजार रुपये हस्तगत केले.

आमिषाला बळी पडू नका

विवाह रखडलेल्या तरुणांना हेरून लग्न लावून देणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. खोटी नाती भासवून आर्थिक फसवणूक करीत नवरीसह पलायन केले जात आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. तसा संशय आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com