माध्यमांबरोबर मानसिकताही बदलली, न्यूड दृश्य लवकरच पडद्यावर

माध्यमांबरोबर मानसिकताही बदलली, न्यूड दृश्य लवकरच पडद्यावर

ओढणी धरून पळत जाणारी हिरोईन, पाठिमागे पळत जाणारा हिरो.. मग एकाच ओढणीत दोघं येतात आणि हळू-हळू लाँग शॉट घेत कॅमेरा फेड आऊट होतो.. अशी दृश्ये आपण गेल्या दशकापर्यंत पाहत होतो. तेव्हाही अशी काही लोक होते ज्यांना कथेसाठी ‘ती’ दृश्ये थेट दाखवण्यासाठी आग्रही होते. अर्थात तेव्हाची माध्यमे आणि मानसिकता या दोन्हीमुळे ते शक्य नव्हते. पण समाज हा परिवर्तनशील असतोच. जशी माध्यमे बदलली तशी मानसिकता बदलली. मग ‘त्या’ दृश्यांकडे मस्करी, शौक याच्यापलीकडे पाहू जाऊ लागलंय. किचनपासून ते कॉलेज, चौकात मुला-मुलींच्या चर्चांमध्ये ‘त्या’ दृश्यांबाबतच्या चर्चेत सहजपणा आणि विवेकी दृष्टीकोन आलाय. याचाच अर्थ समाज बजलतोय. सेक्रेड गेम्स, गंदी बात या वेबसिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन कौटुंबिक मालिका आणि मुख्य प्रवाहातले चित्रपट करणारे आहेत. 

भरमसाठ बांगड्या, मोठी टिकली, चमचम साडी नेसलेली हिरोईन आपल्या पतीची वाट बघत असते. तिचा पती येतो. त्याच्या मागोमाग त्याची बहिण किंवा लांबची आत्त्या वगैरे येते. तो तिला काहीबाही बोलतो मग पत्नी समजावण्याचा प्रयत्न करते. पण तो काहीतरी भीषण डायलॉग टाकून निघून जातो. त्याच्या सोबत आलेली त्याची बहिण किंवा लांबची आत्या मनातल्या मनात काहीतरी बोलते आणि आपण जग जिंकल्याच्या आविर्भावात ठरलेल्या शैलीत हसते. मग ती पत्नी धाय मोकलून रडत बसते. आत्तापर्यंत एकता कपूरच्या मालिकेत आपण अशा प्रसंगांचा अत्याचार अनेकवेळा सहन केलाय. पण तीच एकता कपूर आता असे बोल्ड सीन दिग्दर्शित करत आहे. याचा अर्थ मालिका किंवा चित्रपट दिग्दर्शित करताना दिग्दर्शक फक्त गरज म्हणून किंवा अपरिहार्यता म्हणून करत असेल, मालिका किंवा चित्रपट दिग्दर्शित करताना त्यांची सुद्धा घुसमट होत असणार आहे. पण योग्य व्यासपीठ आणि योग्य मानसिकता मिळाल्यावर त्याची वैचारिक पातळी वाढण्यास नक्कीच मदत होईल. पण प्रश्न असा आहे अशी दृश्ये मुख्य प्रवाहात ‘नॉर्मलाइज्ड’ होण्यासाठी कितीसा अवधी लागतोय आणि ते किती स्वीकारले जात आहेत. अर्थात अशी दृश्ये असलीच पाहिजे असा आग्रह नाही. पण आपला दृष्टीकोन तरी कधी बदलणार. तसेच ‘ती कथानकाची गरज आहे’ असे गोड कारण देणारे आणि भडकपणा खच्चून भरलेली दृश्ये दाखवून डोळ्यांवर अत्याचार करणारे महाभागही असतात. पण त्यांच्यासाठी खऱ्या सृजनशीलतेवर अन्याय करणे योग्य नाही. एवढ्या वर्षात आपण अशाच दिग्दर्शक, निर्मात्यांवर अन्याय केला आहे. ज्या गोष्टीवर समाजाने प्रकर्षाने टिका केली, ज्या कथानकांना जाणून बूजून सप्रेस्ड केले गेले. त्याच वलयाची कथानकं प्रामुख्याने दिसत आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचायल्याही आहेत. पण परिवर्तन हे पाण्यासारखे आहे. त्याला कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही नाहक अडकून बसलात तर कोरडेच राहता. बदलाचा ओलावा समाज स्वीकारतोच. सेन्सॉर बोर्डाचे वैगेरे म्हणाल तर गोष्टी तिथपर्यंत आल्याच नाहीत. समाज हा विवेकी असतोच. चांगले, वाईट, याचा विचार करण्याइतका नक्कीच समंजस आहे. न्यू़ड आणि अश्लील यांतली रेषा समजण्यास सुरवातही झालीय. पण ती जाणून-बूजून पुसण्याचा प्रयत्नही होत आहे. काही वर्षांपूर्वी लोकांनी खासगीकरण आणि कम्प्युटर्सला विरोध केला. 

आता ऑनलाईन कन्टेटला विरोध करणारीही आहेत. पारंपरिक माध्यमे आणि लोकांचा विश्वास हे समीकरण काही वर्षे राहिलच. पण त्यातून पोहोचवल्या जाणाऱ्या कन्टेन्टचा बदल म्हणजे या काळातील परिवर्तनाचा भाग आहे. आपण सगळेच त्याचा भाग आहोत. त्यामुळे कोणाला कोरडे राहायचे आणि कोणाला समाजातील ओलाव्याचा भाग व्हायचं हे व्यक्तीसापेक्ष आहे. सध्याच्या काळात अशी दृश्यांचा समावेश असलेली कथानके ऑनलाईन उपलब्ध आहेत. पण हा प्रवाह चित्रपटगृह, मालिकांपर्यंतही पोहोचू शकतो आणि काही वर्षांनी अनेक पत्रकार आपल्या लेखाची ‘काही वर्षांपूर्वी अशी दृश्ये फक्त ऑनलाईन दिसायची’ अशी सुरवात करतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com