मराठी भाषा भवन रंगभवनातच : सुभाष देसाई यांचा पुढाकार

सरकारनामा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020


मुंबई ः मायमराठी कटोरा घेऊन मंत्रालयासमोर उभी असल्याची कुसुमाग्रजांनी व्यक्‍त केलेली खंत अभिजात दर्जाबाबत दिसते; तसेच कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या मराठी भाषा भवनाबाबतही दिसते. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक ज्या मराठी भाषा भवनासाठी धडपडत होते, ते पार गावकुसाबाहेर नवी मुंबई परिसरात फेकले गेले होते.

मुंबई :  मायमराठी कटोरा घेऊन मंत्रालयासमोर उभी असल्याची कुसुमाग्रजांनी व्यक्‍त केलेली खंत अभिजात दर्जाबाबत दिसते; तसेच कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या मराठी भाषा भवनाबाबतही दिसते. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक ज्या मराठी भाषा भवनासाठी धडपडत होते, ते पार गावकुसाबाहेर नवी मुंबई परिसरात फेकले गेले होते.

हे मराठी भाषा भवन पुन्हा दक्षिण मुंबईतील झगमगाटी, मानाच्या जागेत उभारण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. रंगभवन परिसरातच मराठी भाषा भवन उभे कसे करता येईल, यासाठी जोरबैठका सुरू झाल्या आहेत. त्यासंबंधातील तरतुदींकडे नव्याने लक्ष देण्याचे प्रयत्न मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील धोबी तलाव भागात काही वर्षांपूर्वी मराठी भाषा भवन उभे राहणार होते; परंतु संबंधित जागेचा समावेश वारसा वास्तू यादीत असल्याचे सांगून त्या शक्‍यतेवर फुली मारण्यात आली होती. वारसा वास्तू दर्जा मुंबई महापालिका ठरवत असल्याने शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेतून संबंधित कागदपत्रे हलवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत वारसा यादीतील ही इमारत विशेष प्रयत्न करून मराठीच्या विकासासाठी वापरता येईल का, याचा विचार करण्यात आला. रंगभवन परिसरात ऍम्फीथिएटर सुरू करण्याचा विचार मध्यंतरी समोर आला होता.

शेजारीच कामा आणि जीटी ही रुग्णालये असल्यामुळे या परिसरात ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई करा, अशी जनहित याचिका न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्या याचिकेची काय स्थिती आहे, कर्णकर्कश भोंग्यांचा विचार न करता तेथे अभिजात कार्यक्रम सादर करता येतील का, याचीही चाचपणी केली जाणार आहे. मराठी भाषा पंधरवडा पाळण्यास नवे सरकार विसरले, अशी टीका झाल्यानंतर या संदर्भात सावध पावले टाकण्याचा निर्णय उच्च स्तरावरून घेण्यात आला आहे.
त्यानुसार धोबी तलावाशेजारील रंगभवनाचे रूपांतर मराठी भाषा भवनात केले जाणार आहे.
 

WebTittle :: Marathi Language Bhavan in Rangabhavan: Subhash Desai's initiative


 

संबंधित बातम्या

Saam TV Live