सोलापूर : 'कोरोना'मुळे राज्यातील शेती कर्जाची वसुली बॅंकांनी थांबविली असून कर्ज मंजुरीलाही ब्रेक लावण्यात आला आहे. दुसरीकडे बायोमेट्रिकमुळे कर्जमाफीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे कामही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, खातेदारांना बॅंकांमध्ये न येता ऑनलाइन व्यवहार करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हेही नक्की वाचा : मुंबई शट डाऊन होण्याच्या मार्गावर! लोकल, बस मेट्रो बंद होणार?
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने राज्य सरकारने विविध पातळीवर तातडीचे निर्णय घेतले आहेत. नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाच दिवसांच्या आठवड्यानंतर सक्तीची केलेली शासकीय कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरी बंद ठेवण्यात आली आहे. गर्दी होऊ नये याची दक्षता सातत्याने घेतली जात असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर बॅंकांनीही कर्जाची वसुली थांबविली असून कर्जमाफीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणही ठप्प ठेवले आहे. पुणे, नागपूर, यवतमाळ, रायगड, ठाणे, नगर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याठिकाणच्या बॅंकांनीही विशेष काळजी घ्यायला सुरवात केली आहे. बॅंकांमध्ये सॅनिटरी लिक्विडची बाटली ठेवणे बंधनकारक केले असून कर्मचाऱ्यांना मास्क लावून काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही नक्की वाचा : कस्तुरबामधील 'त्या' रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाही झालेला?
कर्ज वसुली अन् कर्जमंजुरी थांबविली
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने खातेदारांनी व्यवहारासाठी बॅंकांमध्ये न येता ऑनलाइन व्यवहार करावेत, एटीएमद्वारे पैसे काढावेत. कर्ज मंजुरी व कर्ज वसुलीची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. कर्जमाफीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण त्यांच्या घरी जावून केले जात आहे.
- संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर
हेही नक्की वाचा : चीनमधील कोरोना महाराष्ट्रात कसा पसरला, ते जाणून घ्या
दोन लाखांवरील कर्जमाफीचे परिपत्रक नाहीच
ठाकरे सरकारने राज्यातील बळीराजाचा दोन लाखांची कर्जमाफी दिली. त्यानुसार दोन लाखांपर्यंतच्या बहूतांश शेतकऱ्यांना लाभही मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण आता कोरोनामुळे थांबविण्यात आले आहे. दुसरीकडे सरकारने अधिवेशनात दोन लाखांहून अधिक पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांवरील रक्कम भरल्यानंतर कर्जमाफीतील दोन लाख रुपये मिळतील, असे स्पष्ट केले. मात्र, अद्यापही बॅंकांना दोन लाखांवरील शेतकऱ्यांच्या निर्णयाचे परिपत्रक अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे दोन लाखांहून अधिक कर्जदार शेतकरी बॅंकांमध्ये हेलपाटे मारु लागले आहेत, असेही बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Breakdown of loan waiver aadhar verification