"नागरिकत्व' विधेयकावरून ईशान्य भारतात तीव्र आंदोलनाचा भडका

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

गुवाहाटी : "नागरिकत्व' विधेयकावरून ईशान्य भारतामध्ये भडकलेला आंदोलनाचा वणवा आज आणखी तीव्र झाला. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांमध्ये आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करीत सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. अनेक ठिकाणांवर उग्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बेभान आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा दलांना अनेक ठिकाणांवर गोळीबारही करावा लागला. या आंदोलनाचा मोठा फटका रेल्वे आणि विमान वाहतुकीला बसला आहे.

गुवाहाटी : "नागरिकत्व' विधेयकावरून ईशान्य भारतामध्ये भडकलेला आंदोलनाचा वणवा आज आणखी तीव्र झाला. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांमध्ये आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करीत सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. अनेक ठिकाणांवर उग्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बेभान आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा दलांना अनेक ठिकाणांवर गोळीबारही करावा लागला. या आंदोलनाचा मोठा फटका रेल्वे आणि विमान वाहतुकीला बसला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व नॉर्थ-ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशन करीत असून, अन्य तीस विद्यार्थी संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. आसाममध्ये या आंदोलनाची तीव्रता अधिक असून, दहा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तेथील इंटरनेटसेवाही बंद करण्यात आली आहे. त्रिपुरा आणि आसाममधील रेल्वेसेवा पूर्णपणे थांबविण्यात आली असून, विविध रेल्वेस्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी वेगळ्या गाड्यांची सोय केली जात आहे. गुवाहाटीमध्ये आज प्रचंड तणाव होता. लष्कराला ध्वजसंचलन करावे लागले. त्रिपुरामध्ये आसाम रायफलचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गुवाहाटीमधील आजच्या आंदोलनाचे नेतृत्व "ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन'ने केले. कृषक मुक्ती संग्राम समितीने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे होमग्राउंड असणाऱ्या दिब्रुगडमध्ये छाबुआ येथे रेल्वे स्थानकांना आगी लावण्यात आल्यानंतर या ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आसामचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) मुकेश अग्रवाल यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्याच्या गुप्तचर विभागाचे महासंचालक जी. पी. सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुवाहाटी पोलिसप्रमुखांनाही हटविण्यात आले असून, अन्य काही बड्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. शहर पोलिसप्रमुख दीपक कुमार यांच्या जागी मुन्नाप्रसाद गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एल. आर. बिष्णोई यांचीही बदली करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण आणि सशस्त्र पोलिस विभागाचे प्रमुख करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. एन. सिंह, पोलिस उपमहानिरीक्षक आनंदप्रकाश तिवारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

बांगलादेश परराष्ट्रमंत्र्यांचा दौरा रद्द
"नागरिकत्व' विधेयकास संसदेने मान्यता दिल्यानंतर ईशान्य भारत पेटला आहे. या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी त्यांचा प्रस्तावित तीन दिवसांचा भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोमेन यांचे आजच भारत दौऱ्यावर आगमन होणार होते, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.

 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची आसाममधील नागरिकांनी चिंता करू नये. त्यांचे अधिकार, ओळख आणि सुंदर अशी संस्कृती कुणीही हिरावून घेणार नाही. याचा उत्तरोत्तर विकास होतच राहील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

"मुस्लिम लीग' सर्वोच्च न्यायालयात
"भारतीय युनियन मुस्लिम लीग'ने नागरिकत्व विधेयकास आव्हान देत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका सादर केली आहे. या विधेयकामुळे राज्यघटनेच्या समानतेच्या मूलभूत अधिकाराचा भंग होत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या विधेयकाविरोधातील ही पहिलीच याचिका असून, अन्य काही संघटना याविरोधात न्यायालयात याचिका सादर करू शकतात.

 

Web Title: CAB Amid curfew, passengers stranded at Guwahati airport as Assam remains on boil


संबंधित बातम्या

Saam TV Live