Loksabha 2019 : 2004 ची निवडणूक लक्षात आहे ना, काय झालं होतं ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 एप्रिल 2019

"पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिंक्‍य आहेत, असे वाटते का?,' या पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या,""अजिबात नाही. 2004 विसरू नका. तेव्हा निवडणुकीपूर्वी अटलजी अजिंक्‍य आहेत, असे म्हटले जायचे. पण आम्ही जिंकलो.' 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिंक्‍य आहेत, असे वाटते का?,' या पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या,""अजिबात नाही. 2004 विसरू नका. तेव्हा निवडणुकीपूर्वी अटलजी अजिंक्‍य आहेत, असे म्हटले जायचे. पण आम्ही जिंकलो.' 

रायबरेली मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देत होत्या. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी त्यांच्यासमवेत होते. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे केंद्र सरकार 2004 मध्ये पराभूत झाले. त्यावेळी काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे होते. तेव्हापासून त्या रायबरेलीतून, तर राहूल गांधी अमेठीतून निवडून येत आहेत. 

2004 आणि 2019 च्या निवडणुकांतील एक साम्य आहे म्हणजे दोन्ही वेळा केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेवर आहे. तुलना करण्याचा दुसरा मुद्दा म्हणजे त्यावेळी अटलजी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा सत्तेवर येणार, असा अंदाज सर्वत्र वर्तविला जात होता. मतदानपूर्व व मतदानानंतरचे सर्वेक्षणातही तोच अंदाज वर्तविला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आज त्याच पद्धतीचे अंदाज वर्तविले जात आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या वेळच्या स्थितीची तुलना करावीशी वाटते. 
एनडीएच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता 1998 मध्ये 13 महिन्यांसाठी, 1999 मध्ये पाच वर्षांसाठी सत्ता आली होती. देशातील चांगली स्थिती लक्षात घेत भाजपने 2004 मध्ये सहा महिने अगोदर निवडणुका घेण्याचे ठरविले. त्यावेळी भाजपकडे देशपातळीवर नावाजलेले लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन, नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू यांसह अनेक जेष्ठ नेते होते. त्या तुलनेत काँग्रेसकडे सोनिया गांधी यांच्या व्यतिरिक्त गर्दी खेचणारे नेत्यांची वानवा होती. 

भारतीय अर्थव्यवस्था 2004 मध्ये चांगल्या स्थितीत होती. "इंडिया शायनिंग' ही घोषणा करीत भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. सोनिया गांधी परदेशात जन्मल्या असल्याचा मुद्दाही त्यावेळी प्रचारात होता. भाजपचा प्रचार हायटेक होता, तर त्या तुलनेत काँग्रेसचा प्रचार "लो की' होता. सल्लागारांची मते डावलून गांधींनी द्रमुक व राजद यांच्याशी आघाडी केली. काँग्रेस विजयी होऊ शकेल, अशा राज्यांतच गांधी यांनी प्रचार केला. नागरीकांशी विशेषतः महिलांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला. "काँग्रेसका हाथ, आम आदमीके साथ,' ही त्यांची घोषणा होती. 

तरीदेखील निवडणुकीचा निकाल सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देणारा ठरला होता. निकाल लागला तो एनडीएच्या विरोधात. 1999 च्या तुलनेत काँग्रेसच्या 21 जागा वाढत 145 झाल्या. मात्र, मित्रपक्षांमुळे युपीएला 218 जागा मिळाल्या. भाजपच्या जागा 44 ने कमी होत 138 वर पोहोचल्या. तर एनडीए 270 वरून 181 पर्यंत घसरली. युपीए मात्र 145 वरून 218 वर पोहोचली. सीपीएम च्या नेतृत्वाखालील डावी आघाडी 59 जागा मिळवत तिसऱ्या स्थानावर होती. डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने युपीएचे सरकार डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आले. 

सोनिया गांधी यांची निवड काँग्रेसने पंतप्रधान पदासाठी केली होती. त्यावेळी माझ्या मनातील "आतील आवाज' ऐकून मी पद नाकारत आहे, असे सांगत त्यांनी पंतप्रधान पद सोडले होते. त्यावेळी, त्यांनी राहूल व प्रियांका या त्यांच्या मुलांशी चर्चा केली व निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांचे सरकार पुढे दहा वर्षे सत्तेत होते. हा झाला 2004चा इतिहास. 

सध्याच्या निवडणुकीशी त्याची तुलना केली असता, "अच्छे दिन,' "सबका साथ, सबका विकास,' अशी घोषणा देत पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचे एनडीए सरकार सत्तेवर आले. भाजपलाच पूर्ण बहुमत मिळाल्याने, त्यांना निर्णय घेताना फारशा अडचणी नव्हत्या. मनकी बात करीत त्यांनी वेळोवेळी देशवासियांशी संवाद साधला. मात्र, विरोधकांच्या प्रश्‍नांना त्यांनी फारशी उत्तरे दिली नाहीत. पत्रकार परिषदाही जवळपास झाल्या नाहीत. 

गेल्या निवडणुकीतील प्रचाराच्या वातावरणाचा सध्या अभाव जाणवतो. कोणताही महत्त्वाचा मुद्दा अद्यापही प्रचारात ऐरणीवर आलेला नाही. देशाच्या एका भागात मतदान सुरू असताना, दुसऱ्या भागात उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची स्थिती आहे. दोन्ही मुख्य आघाड्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत, तर प्रादेशिक पक्षांचे नेते आपापल्या भागात जादा जागा मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी "न्याय' योजना मांडली, तर बेरोजगारीच्या प्रश्‍नांवर तरुणाईला साद घातली आहे. राफेल विमान खरेदीतील कथित गैरव्यवहारवरून राहूल गांधी टीका करीत आहेत. पण, तरीदेखील आजपर्यंत निवडणुकीवर परीणाम होईल, असा मुद्दा प्रचारात प्रकर्षांत पुढे आल्याचे दिसून आले नाही. 

वेगवेगळ्या सर्वेक्षणांचा मारा सध्या सोशल मिडियांवरून होत आहे. त्यात सत्तारुढ एनडीए बहुमताच्या जवळपास किंवा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा 50 ते 60 जागांनी कमी होत असल्याचे दिसून येते. निवडणुकांचे मतदान आणखी महिनाभर चालणार आहे. त्यामुळे प्रचाराचे वातावरणही तापत राहील. 

गेल्या निवडणुकीत एनडीएने 336 जागा मिळविल्या, तर युपीएला साठ जागा मिळाल्या होत्या. दोन्ही आघाड्यांमध्ये नसलेल्या पक्षांनी एकूण 147 जागा मिळविल्या होत्या. आता आघाड्यातील अनेक पक्ष बदलले आहेत. वेगवेगळ्या राज्यातील राजकीय स्थिती बदलली आहे. भाजपने काही मित्र गमावले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार वगळता नवा सक्षम मित्र जोडला गेला नाही. देशपातळीवर सर्वत्र एकसारखेच चित्र असेल, असे सध्या तरी वाटत नाही. एनडीएच्या जागा कितीने घटतील, त्या कोणत्या पक्षांकडे जाणार आहेत, यांवरच केंद्रातील पुढील सत्तेचा निर्णय होईल. 

त्याचमुळे, सोनिया गांधी यांनी पत्रकारांना 2004 च्या स्थितीची आठवण करून दिली, तर निवडणूक निकालानंतर चित्र स्पष्ट होईल, असे राहूल गांधी यांनी या वेळी स्पष्ट केले. 

Web Title: Dnyaneshwar Bijle writes about Loksabha Election 2004 and BJPs status today


संबंधित बातम्या

Saam TV Live