In Ten Rupees Food will get in Mumbai
In Ten Rupees Food will get in Mumbai

मुंबईत कशी मिळेल 10 रुपयांत थाळी?

मुंबई : विधानसभा निवडणुकीत स्वस्तात सकस आहार देण्याचे आश्‍वासन चांगलेच गाजले. भाजपने पाच रुपयांत; तर शिवसेनेने दहा रुपयांत सकस आहार देण्याची घोषणा आपल्या जाहीरनाम्यांत केली. राजकारण्यांकडून या आश्‍वासनाची पूर्ती होईल तेव्हा होईल; पण त्याआधीच मुंबईच्या डबेवाल्यांनी दहा रुपयांत सकस थाळी देण्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदर नोव्हेंबरमध्ये निवडणुकीपूर्वीच ठाण्यातील दोन तरुणांनी खारटन रोड परिसरात दहा रुपयांत भाजी व भात असे जेवण देण्यास सुरुवात केली होती. 

विधानसभा निवडणुकीत "मुंबई डबेवाला संघटने'ने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याने डबेवाल्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शपथविधी सोहळ्यालाही डबेवाल्यांनी हजेरी लावली होती. "शिवसेनेचे सरकार आले, तर गरजूंना दहा रुपयांत सकस आणि पोटभर जेवण देऊ,' अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. या घोषणेला अनुसरूनच "मुंबई डबेवाला असोसिएशन'च्या वतीने मुंबईत पहिले अन्नवाटप केंद्र सुरू करून गरजूंना दहा रुपयांत सकस आणि पोटभर जेवण देण्याचा निर्णय डबेवाल्यांनी घेतला आहे. 

ज्येष्ठांसाठी घरपोच जेवण 

डबेवाल्यांवर पीएच.डी. करणाऱ्या डॉ. पवन अग्रवाल यांनी आपली विक्रोळी टागोरनगर येथील प्रशस्त जागा विनामूल्य "मुंबई डबेवाला असोसिएशन'ला वापरण्यास दिली आहे. याच जागेवर दुपारी 12 ते दोन व रात्री सात ते नऊ या वेळेत गरजवंतांना दहा रुपयांत सकस व पोटभर जेवण दिले जाणार आहे; तर विक्रोळी विभागातील जे ज्येष्ठ नागरिक सेंटरवर येऊ शकत नसतील, त्यांना थोडे शुल्क आकारून थेट त्यांच्यापर्यंत अन्न पोचवले जाणार आहे. 

वेळप्रसंगी तोटा सहन करू, पण... 

विक्रोळी येथील जागेत काही आवश्‍यक ते बदल केले जात असून, साधारण 15 दिवसांत तेथे अन्नवाटपाचे काम सुरू केले जाईल. दहा रुपयांत सकस आणि पोटभर जेवण देणे अवघड असले, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेला "मुंबई डबेवाला असोसिएशन'ने प्रतिसाद दिला आहे. वेळप्रसंगी तोटा सहन करू, पण उद्धव ठाकरे यांची दहा रुपयांत सकस आणि पोटभर जेवणाची घोषणा यशस्वी करू, असा निर्धार असोसिएशनने केला आहे. त्यासाठी विठ्ठल सावंत, दशरथ केदारी, कैलास शिंदे, अनंथा तळेकर या डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे. 

Web Title: Food will get in Mumbai  In Ten Rupees

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com