Corona | एकच मास्क पुन्हा पुन्हा वापरणं धोकादायक!

corona mask
corona mask

पुणे - खरंतर प्रत्येकानं मास्क वापरण्याची गरज नाही. तुम्ही जर कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात येणार असाल. तर आणि तरच मास्क वापरण्याची नितांत गरज आहे. तसंच सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणं असतील तर मास्क घालावा.  एकच मास्क वारंवार वापरणे म्हणजे जंतुसंसर्गाला निमंत्रण दिल्यासारखेच आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. सुदृढ माणसाला होणारा विषाणू संसर्ग मास्कमुळे प्रतिबंधित होतो, याचा कोणताही पुरावा नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

‘कोरोना’ प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये करावा लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर मास्क किती सुरक्षा देऊ शकतो, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी ही निरीक्षणे नोंदविली आहेत. रुबी हॉल क्‍लिनिकमधील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे म्हणाले, ‘‘सुदृढ व्यक्तीला होणारा विषाणू संसर्ग मास्कमुळे रोखला जातो, असे पुरावा नाही. सर्दी, खोकला किंवा फ्ल्यूसदृश लक्षणे असल्यास तुम्ही मास्क निश्‍चित वापरू शकता. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्या व्यक्तींना संसर्ग होऊ नये, यासाठी ही काळजी घ्यावी.’’ 

गेल्या आठ-दहा दिवसांपासून मास्कची खरेदी वाढली आहे. खरेदी केलेले तेच ते मास्क गेल्या सहा-सात दिवसांपासून नागरिक वापरत आहेत. एकच मास्क दिवसेंदिवस वापरल्याने त्यातून जंतूसंसर्गाचा धोका वाढत आहे, असे मत संसर्गजन्य आजार प्रतिबंधक तज्ज्ञांनी व्यक्त केले.  

‘एन ९५’ मास्क कोणासाठी?
‘एन ९५’ मास्क हा कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सेवा करणारे डॉक्‍टर, परिचारिका, तेथील कर्मचाऱ्यांसाठी आहे. हा मास्क घालण्यापूर्वी त्यातून हवा थेट आत जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे तो मास्क घालण्याची शास्त्रीय पद्धत आहे. त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. सर्वसामान्य नागरिक आता हा मास्क सर्रास वापरताना दिसत आहेत. एकच मास्क वारंवार वापरणेदेखील आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. त्यामुळे रुग्णालयात काम करणाऱ्यांशिवाय इतरांनी हा मास्क घालणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. 

मास्क कसा वापरावा?
    नाक आणि तोंडावर योग्य पद्धतीने घाला. मास्क आणि चेहरा यात फट राहणार नाही, याची काळजी घ्या
    मास्कला स्पर्श होणार नाही, याकडे लक्ष द्या 
    मास्कला स्पर्श झाल्यास साबणाने हात स्वच्छ करा
    एका वेळी एकच मास्क वापरावा
    एकदा वापरलेला मास्क योग्य पद्धतीने नष्ट करावा
    मास्क मागून काढावा
    मास्क काढताना पुढे स्पर्श करू नका 

काय करा?
    सर्वांना मास्कची गरज नाही 
    संसर्ग टाळण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीशी लांबून संवाद साधा
    आजारी लोकांना भेटणे टाळा 
    नाक, डोळे, तोंड यांना वारंवार स्पर्श करू नका
    सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये

इथे विचारा शंका ः १८००२३३४१२०

जीवनावश्‍यक वस्तूंचा गैरप्रकार/काळाबाजार करणाऱ्यांची तक्रार करा ः १०० (पोलिस नियंत्रण कक्ष),  ः ८९७५२८३१०० 

मदतीसाठी  येथे करा संपर्क
टोल फ्री क्रमांक  - १०४
राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 
९१-११-२३९७८०४६ 

Web Title: It is dangerous to use the same mask frequently

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com