ही लढत प्रतिष्ठेची नव्हे, तर वर्चस्वाची

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 मार्च 2019

नगरमधून डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी निश्‍चित झाल्याने नगरबरोबर शिर्डी मतदारसंघातील लढत काट्याची होणार, हे निश्‍चित झाले आहे. विखे-पाटील, त्यांचे विरोधक बाळासाहेब थोरात, जगताप यांच्यादृष्टीने ही लढत प्रतिष्ठेचीच नव्हो, तर वर्चस्वाची ठरणार असल्याने त्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नगरमधून डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी निश्‍चित झाल्याने नगरबरोबर शिर्डी मतदारसंघातील लढत काट्याची होणार, हे निश्‍चित झाले आहे. विखे-पाटील, त्यांचे विरोधक बाळासाहेब थोरात, जगताप यांच्यादृष्टीने ही लढत प्रतिष्ठेचीच नव्हो, तर वर्चस्वाची ठरणार असल्याने त्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नगर जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्‍चित झाल्याने, आता राजकीय जुळवाजुळव आणि हालचालींना वेग आलाय. मोठा गाजावाजा करत भाजपमध्ये प्रवेश केलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांना पक्षाची उमेदवारी मिळण्याची हमी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिल्याने, ते कामाला लागले आहेत. दुसरीकडे, भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हेसुद्धा दिल्ली दरबाजी हजेरी लावून उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावण्याच्या तयारीत आहेत. विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संपर्क मोहिमेत जोर वाढवला आहे. भाजपच्या निष्ठावंतांच्या गोटातील नाराजी दूर करण्याच्या प्रयत्न तसेच ते सर्वपक्षीय मंडळींना चुचकारण्याचे काम करीत आहेत. शिवाय, स्वतः राधाकृष्ण विखे-पाटील हेही पुत्राच्या विजयासाठी सरसावले आहेत. त्यांनीही तालुकानिहाय दौरे करीत व्यक्तिगत गाठीभेटींवर भर दिला आहे.

विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप लढणार की, त्यांचे पुत्र आमदार संग्राम लढणार, याबाबत गेली दहा दिवस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह श्रेष्ठींमध्ये खल चालू होता. अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची घोषणा आज (गुरुवारी) केली. त्यानंतर जगताप समर्थकांनीही जोरदार मोहीम उघडली असून, कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करायचाच, असा चंग बांधलाय. त्यातच नगरच्या जागेसंदर्भातील वाद आणि त्यानिमित्ताने पवार आणि विखे यांच्यातील वाक्‌युद्ध उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. पवार आणि विखे या दोघांनीही नगर मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे राज्यातील काट्याच्या लढतीत नगरचा समावेश असेल, यात काडीमात्रही शंका नाही.

थोरातांकडून विखेंची आघाडी
शिर्डी या राखीव मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे नाव खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केलेले आहे. लोखंडे कामालाही लागले आहेत. काँग्रेसकडून अनेक नावे चर्चेत होती. मुलगा भाजपमध्ये गेल्याने आता राधाकृष्ण विखेही भाजपमध्ये जातील, अशी शक्‍यता असल्याची आवई विखे विरोधकांनी पक्षश्रेष्ठींकडे उठवली आहे.

त्यामुळे विखे यांचे जिल्ह्यातील वजन घटवण्यासाठी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात हे प्रयत्नशील असणे स्वाभाविक आहे. त्याचाच भाग म्हणून विखे यांचे समर्थक असलेले श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा काँग्रेसच्या पहिल्याच यादीत शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार म्हणून समावेश झाला. याशिवाय, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष असलेले दुसरे विखे समर्थक करण ससाणे यांची एका रात्रीतून, थेट दिल्लीतून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. ही दोन्हीही कामे थोरात यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून करून आणली. त्यामुळे विखे यांची कोंडी करण्याचा थोरात यांनी प्रारंभ केल्याचे मानले जाते. आता दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसची कार्यकारिणी लगेच जाहीर करून थोरात यांचा जिल्हा दौरा सुरू होईल. विखे यांचा पाडाव करण्यासाठी थोरात नगरवरही विशेष लक्ष देतील.

शरद पवारांचीही थोरात यांनाच साथ असेल. त्यामुळे नगर आणि शिर्डी या दोन्हीही मतदारसंघात विखेंचा पाडाव करण्यासाठी पवार आणि थोरात एकत्र येतील. त्यांचा सामना विखे कशा पद्धतीने करतील, याबाबत राज्यात उत्सुकता आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Nagar Constituency Politics


संबंधित बातम्या

Saam TV Live