जोरदार झालेल्या पावसात राज्यातील 10 जण मृत्युमुखी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 जून 2019

पावसामुळे झालेल्या विविध घटनांत राज्यातील विविध भागांत दहा जणांचा बळी गेला आहे.

पावसामुळे झालेल्या विविध घटनांत राज्यातील विविध भागांत दहा जणांचा बळी गेला आहे.

मुंबईत चौघांचा बळी
पावसाने मुंबई आणि पालघरमध्ये चौघांचा बळी गेला. मुंबईत अंधेरी आणि गोरेगावमध्ये विजेचा शॉक लागून तिघांचा, तर पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्‍यात अंगावर वीज पडून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. परळ येथील कामगार मैदानाची भिंत पडून पदपथावर राहणारे तिघे जखमी झाले. पनवेल परिसरात पावसाचे पाणी अनेक घरांत घुसल्याने फर्निचर तसेच अन्य साहित्याचे नुकसान झाले.

वीज पडून मायलेक ठार
उमरी (जि. नांदेड) - वीज पडून आईसह मुलगा ठार झाल्याची घटना हातणी (ता. उमरी) येथे आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. सुशीला गोविंद सुरणे (वय 30) व मुलगा राजेश गोविंद सुरणे (वय चार) शेतात असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांनी शेतातील झाडाचा आश्रय घेतला. त्या वेळी वीज अंगावर पडून दोघाचा जागीच मृत्यू झाला.

दोन मजुरांचा मृत्यू
मुसळधार पावसात वीज कोसळल्याने अकोल्यामध्ये दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला.

किशोरवयीन मुलीचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे दोन वेगवेगळ्या घटनांत नाशिक जिल्ह्यात एका किशोरवयीन मुलीसह दोघांचा मृत्यू झाला.

सात ठिकाणी 100 मि.मी. पाऊस
पावसामुळे शुक्रवारी मुंबईत सात ठिकाणी शंभर मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. घाटकोपरमध्ये सर्वाधिक 280.80 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल वांद्रे-कुर्ला संकुल - 147.40, सांताक्रूझ - 139.40, मालाड (प.) - 132.80 , लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स, अंधेरी - 137, चेंबूर - 136.60, भांडुप - 108.60, मुलुंड (पूर्व) 127.40. मिमी पावसाची नोंद झाली.

सलग चौथ्या दिवशी जलधारा
जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागांत आज सलग चौथ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. जळगावसह भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड आणि जामनेर तालुक्‍यात आज दुपारी दमदार हजेरी लावली. गिरणा परिसरातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव तालुक्‍यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा, तर अमळनेर, एरंडोल व धरणगाव तालुक्‍यातही काही ठिकाणी पाऊस झाला. आतापर्यंत एकूण सरासरीच्या साडेसात टक्के पाऊस झाला आहे.

Web Title: 10 death by rain in state


संबंधित बातम्या

Saam TV Live