राज्यातील 304 पैकी 289 रुग्ण निगेटीव्ह

राज्यातील 304 पैकी 289 रुग्ण निगेटीव्ह

पुणे - ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विलगीकरण कक्षांत आतापर्यंत 304 जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी 289 जणांचे प्रयोगशाळा नमुने ‘कोरोना’करिता निगेटिव्ह आले असून, त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले; तर पाच जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 12 जणांना पुण्यात; तर तिघांना मुंबईतील रुग्णालयात भरती केले आहे.

मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत एक हजार 101 विमानांमधील एक लाख 29 हजार 448 प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकांनी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्यूरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशांत सध्या कोरोना विषाणूंचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने 21 फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. 

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा उद्रेक झालेल्या 12 देशांमधून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी आरोग्य विभागास दैनंदिन स्वरूपात देण्यात येते.

नवीन ‘कोरोना’ विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून सर्व जिल्हा रुग्णालये; तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 खाटा उपलब्ध आहेत. 

बाधित भागातून राज्यात आलेल्या 591 प्रवाशांपैकी 353 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, नगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यांतूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

काही शाळांना सुटी जाहीर
कोरोनाच्या धास्तीने पालकांची चिंता वाढविली असून, कात्रजमधील एका खासगी व्यवस्थापनाच्या संस्थेने उद्यापासून त्यांच्या शाळेला सुटी दिली आहे. दरम्यान, शाळांना सुटी देण्याचा कोणताही आदेश दिला नसून केवळ खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कात्रज भागातील सीबीएसईशी संलग्न असलेल्या सरहद शाळेने उद्यापासून सुटी जाहीर केली आहे. शाळा सुरू करण्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद केले आहे. आणखी दोन शाळांनी सुटी जाहीर केली असून, त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. धायरी आणि नांदेडसिटी परिसरातील या शाळा असल्याचे समजते. 

राज्य बोर्डाच्या शाळांबाबत उद्या बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title 289 Patients Negative In Maharashtra

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com