H1N1 : स्वाइन फ्लूने राज्यात 31 रुग्णांचा मृत्यू :पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

राज्यात स्वाइन फ्लूच्या 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत. पिंपरी- चिंचवड व पुणे शहर आणि ग्रामीण भागात मिळून 12 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यामध्ये या आजाराने आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात स्वाइन फ्लूच्या 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत. पिंपरी- चिंचवड व पुणे शहर आणि ग्रामीण भागात मिळून 12 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यामध्ये या आजाराने आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

पावसाळी वातावरणामुळे स्वाइन फ्लूच्या "एच1एन1' या विषाणूंच्या संसर्गास पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे राज्यात गेल्या आठ महिन्यांच्या तुलनेत गेल्या महिन्याभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस, घेतलेली काळजी आणि या आजाराबद्दलची जनजागृती यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत नियंत्रित असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षी राज्यात स्वाइन फ्लूचे सहा हजार 887 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 778 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा आतापर्यंत 180 स्वाइन रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

पुणे आणि परिसरात स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मोठी असल्याचे दिसते. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी- चिंचवड मिळून 12 रुग्णांना मृत्यू स्वाइन फ्लूने झाला आहे. विदर्भातही गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण असल्याने तेथील जिल्ह्यात प्रत्येक एका रुग्णाचा या आजाराने मृत्यू झाला आहे.

ढगाळ वातावरणामुळे राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची आणि त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या नियंत्रणात राहिली आहे.
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य

शहर ........... मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या
नाशिक ........... 8
पिंपरी- चिंचवड .... 6
पुणे शहर .......... 3
पुणे जिल्हा ........ 3
अकोला, नगर ...... 2
जळगाव, बुलडाणा, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, नागपूर .... 1
मध्य प्रदेश ....... 1 (उपचारासाठी महाराष्ट्रात आलेला रुग्ण)

 


संबंधित बातम्या

Saam TV Live