शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला रायगडचा आसमंत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

किल्ले रायगड : शिवछत्रपतींचा जयघोष, शिवभक्तीचा जागर आणि आसमंतात दुमदुमणाऱ्या "हर हर महादेव"च्या गर्जनेने बुधवारी (ता. ६) शिवराज्याभिषेक सोहळा संस्मरणीय ठरला. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवमूर्तीस सुवर्णनाण्यांचा अभिषेक होताच शिवभक्तांनी दिलेल्या "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषणेने दुर्गराज रायगडचा कोना न कोना शहारून गेला. 

किल्ले रायगड : शिवछत्रपतींचा जयघोष, शिवभक्तीचा जागर आणि आसमंतात दुमदुमणाऱ्या "हर हर महादेव"च्या गर्जनेने बुधवारी (ता. ६) शिवराज्याभिषेक सोहळा संस्मरणीय ठरला. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवमूर्तीस सुवर्णनाण्यांचा अभिषेक होताच शिवभक्तांनी दिलेल्या "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषणेने दुर्गराज रायगडचा कोना न कोना शहारून गेला. 

सकाळी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे ढोलताशांच्या गजरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते राजसदरेवर शिवराज्याभिषेकाला सुरवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विविध गडांवरून आणलेल्या पाण्याने तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. या वेळी युवराज शहाजीराजे, फिजीचे राजदूत एस. धृनीलकुमार, पशु व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर आदींसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. यामुळे रायगडावर शिवभक्तीची लाट आली आहे. सहभागी विविध वयोगटातील तरुण, महिला मुले यांच्यामध्ये या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चैतन्य संचारले आहे. रयतेचा राजा अशी ख्याती असणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेकाचा ३४५वा वर्षसोहळा रायगडावर अनुभवण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला होता. जसे कार्यक्रम होतील तशा वाढत जाणाऱ्या जयघोषाच्या घोषणांनी एक वेगळेच चैतन्य अनुभवायस मिळत होते. अनेक शिवभक्त गडावर दंडवत घालत आले. शिवराज्याभिषेकासाठी सिंहगड, राजगड, पन्हाळगड, विशाळगड, तोरणा या पाच गडांचे पाणी आणण्यात आले.

शेतकरी गीतांनी हेलावला रायगड 
रयतेचा राजाने शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. पण आता हा शेतकरी जगण्यासाठी धडपडत आहे. कार्यक्रमात जसे स्फूर्तिदायक पोवाडे गायले जात होते, तशी पोवाड्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अवस्थाही मांडली जात होती. यामुळे जल्लोषाला भावुकतेची किनार लाभली. ‘शेताच्या या बांधावरती आले नवे दलाल, तेच झाले मालामाल, दादा तू झाला कंगाल,’ या शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या ओळींना ही शिवप्रेमींनी दाद दिली. शेतकऱ्यांची अवस्था शाहीर मांडत असताना अवघा रायगड ही हेलवला होता. संभाजीराजे यांनी ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा भाषणात उल्लेख करून यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. 

पानिपतमधूनही शिवप्रेमी उपस्थित 
सोहळ्याला देशभरातील शिवप्रेमी उपस्थिती होती. छत्तीसगड, आंध्र प्रदेश येथून तर तरुणाई आली होतीच; पण ऐतिहासिक असणाऱ्या पानिपत येथूनही शिवभक्त उपस्थित होते.


संबंधित बातम्या

Saam TV Live