..आता कुंपणावरील नेत्यांची परीक्षा

..आता कुंपणावरील नेत्यांची परीक्षा

गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-मंगळवेळा), आमदार सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे (माण-खटाव) यांनी ठेवली आहे. ही मंडळी कुंपणावर आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हाकेला कोण कधी प्रतिसाद देतो, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या कुंपणावरील नेत्यांच्या भूमिकेची परीक्षा जवळच आहे. विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी अजूनही भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाही. भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून त्यांचा उल्लेख मात्र होतो. 

भूमिका बदललेल्यांना दणका 
"राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो' अशी म्हण आहे. तसेच अलीकडील काळात "आज कोणत्या पक्षात आहात', असेही विचारण्याची वेळ आली आहे. राजकारणात निष्ठावंत हा शब्द दुर्मीळ झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात तर भाजपमधील "इनकमिंग'चा विचार केला तर त्याचा प्रत्यय पुरेपूर आला. मात्र दोन अपवाद वगळता भूमिका बदलणाऱ्यांना मतदारांनी मोठा दणका दिल्याचे चित्र पश्‍चिम महाराष्ट्रात दिसले. कुंपणावरच्या नेत्यांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. तेव्हा भविष्यात कुंपणावरील नेत्यांची भूमिका काय राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

माने यांना मतदारांची साथ 
पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या पाच जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघांचा विचार केला, तर माढा मतदारसंघातील भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व इचलकरंजीतील धैर्यशील माने यांचाच काय तो अपवाद! अन्य मतदारसंघांतील उमेदवारांबाबत मतदारांनी आपला रोष दाखवून दिला. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी निवडणूक लढविली होती. मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी करून लढाऊ वृत्तीला पाठिंबा दिला. परंतु, या निवडणुकीत त्यांनी साखर कारखानदारीचे मनसबदार असलेल्या कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'शी सोबत केली. त्यामुळे मतदारांनी शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. माजी खासदार निवेदिता माने यांनी भूमिका बदलत "राष्ट्रवादी'तून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र धैर्यशील यांनीही शिवसेनेची वाट चोखाळली, तरीही मतदारांनी अपवाद करून त्यांना साथ दिल्याचे दिसते. 

बोलबाला खूप; पण पदरी पराभव 
सांगली मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविलेले विशाल पाटील यांना मतदारांनी नाकारले. वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील अनेकांना कॉंग्रेस पक्षसंघटनेत व सत्तेतील पदे मिळाली होती; परंतु कॉंग्रेसला ही जागा मिळत नसल्याचे पाहून विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चोखाळलेला मार्ग महागात पडला. याच मतदारसंघातील भूमिका बदललेल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर (पूर्वाश्रमीचे भाजप) यांना मिळालेल्या मतांचा विचार केला, तरी यशाने मात्र त्यांना हुलकावणीच दिली. सातारा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविलेले नरेंद्र पाटील (राष्ट्रवादीतून भाजप व तेथून शिवसेना) यांचा बोलबाला झाला, परंतु त्यांच्या पदरी अपयशच आले. 

बहुचर्चित माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढविलेले संजय शिंदे यांनीही वेळोवेळी भूमिका बदलली. निवडून येणारे हमखास उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. तरीही मतदारराजाने त्यांच्या पारड्यात मताचे दान टाकताना फारच विचार केल्याचे दिसले. पूर्वी "राष्ट्रवादी'त असलेले शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा मतदारसंघातून निवडणूक लढविली. जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून ते विजयी झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस अशी सर्वांची साथ घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी व भाजप नेत्यांशी त्यांनी जवळीक साधली. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाजपकडून निवडणूक लढविण्याची दिलेली "ऑफर' नाकारत त्यांनी शरद पवारांच्या हाकेला साथ दिली अन्‌ "राष्ट्रवादी'कडून ते रिंगणात उतरले. याच मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढविणारे रणजितसिंह निंबाळकर यांनी 2004 मध्ये फलटणमध्ये शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. नंतर ते कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष झाले. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भूमिका बदलूनही भाजपकडून बाजी मारली. ज्या फलटण विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला, त्याच मतदारसंघाने या वेळी त्यांना मताधिक्‍क्‍य दिले. 

भाजपशी जवळिकीचा लाभ नाही 
बारामतीमधून भाजपकडून निवडणूक लढविलेल्या कांचन कुल यांच्या कुटुंबीयांनी "राष्ट्रवादी', रासप (महायुती), नंतर भाजप असा प्रवास केला. प्रचंड चर्चेत येऊनही त्यांना फटका बसल्याचे दिसले. "संभाजी' मालिका फेम डॉ. अमोल कोल्हे पूर्वी शिवसेनेत होते. परंतु, भूमिका बदलण्यापूर्वी कोणतीही निवडणूक त्यांनी लढविलेली नव्हती. या निवडणुकीत ते शिरूर मतदारसंघातून "राष्ट्रवादी'चे उमेदवार होते. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला त्यांनी धूळ चारली. कोल्हापूरचे "राष्ट्रवादी'चे उमेदवार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी गेल्या पाच वर्षांत भाजपशी जवळीक साधली होती. त्यांनी "राष्ट्रवादी'कडून निवडणूक लढविली, तरी या जवळिकीचा त्यांना फटका बसलाच.

Web Title: Abhay Diwanji Writes Article about Politics in Western Maharashtra

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com