ट्रॅक्टरपासून शेतीच्या अवजारांची निर्मीती

ऍग्रो वन
बुधवार, 8 जानेवारी 2020

येथील सुनील सातपुते या अवलिया तरुणाने आपले बुद्धीकौशल्य व दीर्घ अनुभवाच्या जोरावर विविध पिकांसाठी विविध ट्रॅक्टरचलित अवजारांची निर्मिती केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी एकहजार शेतकऱ्यांना या अवजारांची सेवा दिली आहे. अलीकडील मजूरटंचाईच्या काळात शेतकऱ्यांना फायदा देण्याबरोबरच या व्यवसायातून सातपुते यांनी रोजगारनिर्मितीही साधली आहे.

पिलीव (जि. सोलापूर) : जिल्ह्यात पिलीव (ता. माळशिरस) येथील सुनील सातपुते यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. तिघा भावांच्या वाटणीत त्यांच्या वाट्याला अवघी सात गुंठे शेती आली. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. फलटण येथे मामा ट्रॅक्टर, जेसीबी व्यवसायात होते. लहानपणी मामाकडे सुटीला गेले की या यंत्रांविषयी मनात उत्सुकता तयार होई. पुढे मग याच कुतूहलाचे रूपांतर ट्रॅक्टर, जेसीबी यंत्राच्या वाहनावर चालक म्हणून झाले. या यंत्रांची हाताळणी, त्यातील बारकावे या बाबी लक्षात येऊ लागल्या. वाहनातील प्रत्येक सुटा भाग न भाग तोंडपाठ झाला. ट्रॅक्टरमध्ये दोष निर्माण झाला तर तो कशामुळे झाला असेल हे ते तातडीने सांगू शकतील एवढा यात अभ्यास झाला.

सात गुंठे शेतीतून उत्पन्नाचा मोठा प्रश्‍नच होता. त्यामुळे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन म्हणून
आपल्या आवडीच्याच ट्रॅक्टर व्यवसायाकडे अधिक लक्ष देण्याचे ठरवले. दीड लाख रुपयांच्या डिपॅाझीटची कशीबशी जुळवाजुळव करून खासगी कंपनीकडून कर्जाद्वारे साडेचार लाख रुपये किंमतीचा छोटा ट्रॅक्टर आणि जोडीला पेरणीयंत्र घेतले. त्याद्वारे आपल्या शेतात मका पेरला. पण त्यात काही दोष आढळले. तिथूनच मग आपले बुद्धी कौशल्य, यंत्रे हाताळण्याचा दीर्घ अनुभव व कल्पनाशक्ती यांच्या जोरावर सुधारीत अवजारे तयार करण्याची दिशा पक्की झाली.

हिंमत हरली नाही
गेल्या चार-पाच वर्षांत सातत्याने ट्रॅक्टरचलित अवजारांमध्ये सुनील यांनी बदल केले.
अवजारांची मोडतोड करून पुन्हा नवे प्रयोग व समाधान होईपर्यंत ते त्याचे काम करीत राहिले. त्यांच्या घरात असलेले सळ्या, लोखंडाचे तुकडे असे काही टन साहित्य त्यांच्या या प्रयत्नांची साक्ष देते. या सगळ्या प्रकारामुळे अनेकदा वेल्डिंग व्यावसायिकही वैतागले. काहींनी तर वेळखाऊ आणि सततच्या मोडतोडीच्या कामामुळे त्यांच्या कामाला स्पष्ट नकार दिला. पण सुनील हिंमत हारले नाहीत. नवे वेल्डर शोधत काम सुरूच ठेवले.

स्वतःच्या शेतीत प्रयोग
अथक प्रयत्न व चिकाटीतून अखेर यश मिळत गेले. जी अवजारे तयार केली. त्यांचे प्रयोग स्वतःच्या शेतात करून पाहिले. अनेकवेळा मल्चिंग पेपरचे काही रोल खराबही झाले. सगळ्या कामांची खात्री पटल्यानंतर मग अन्य शेतकऱ्यांना अवजारांची सेवा देण्यास ते तयार झाले.

- अवजारांविषयी

  • फण व रोटर या मुख्य अवजारांचा आधार
  • गादीवाफा (बेड) तयार करणे, पेरणी करणे, खते टाकणे, दोन्ही घटक मातीआड करणे, सारे पाडणे
  • पॉली मल्चिंग पेपर अंथरून देणे आदी कामे अवजारे करतात.
  • एखाद्या शेतकऱ्याला कलिंगड, खरबूज घ्यायचे असल्यास त्याने केवळ बेसल डोस वापरून शेत तयार ठेवायचे. त्यानंतर पुढील सर्व कामे अगदी बेडवर मध्यभागी ड्रीपच्या लाईन्स व मल्चिंग पेपर अंथरणे,
  • पेपरचा ताण काढून तो बुजवणे यासह सर्व कामे ही ट्रॅक्टचलित अवजार करतात.
  • शेतकऱ्यांचा प्रत्येक कामातील वेळ, श्रम, मजुरी यात बचत होते.
  • अनेकवेळा पेरतेवेळी बी एकसमान किंवा ठरावीक खोलीवर पडत नाही. त्यामुळे बी उगवण क्षमता कमी राहते. सिंचनानंतर दोन्ही बाजूने पाणी पुढे जाते. मात्र सुनील यांनी विकसित केलेल्या अवजाराद्वारे
  • एकसमान पद्धतीने पीकनिहाय बी निश्‍चित खोलीवर पडते. त्यामुळे उगवणक्षमता वाढते.
  • एक एकरांत सुमारे चार ते पाच तासांत पॉली मल्चिंगचे काम पूर्ण होते.

सर्व हंगामात काम उपलब्ध
सुनील तीनही हंगामात कार्यशील राहतात. मका, ज्वारी, गहू, हरभरा, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांसाठी शेतकऱ्यांची विविध कामे करून देतात. उन्हाळी हंगामात कलिंगड, खरबूज, ढोबळी मिरची, टोमॅटो आदी पिकांत अधिक काम राहते. खोडवा उसातही दोन्ही बाजूला रोटर मारणे, खत पसरवणे ही कामे ते कुशलतेने करून देतात.

सुमारे हजार शेतकऱ्यांना सेवा
शेतकऱ्यांकडून कामांची विचारणा आल्यानंतर सुनील आधी शेत पाहून येतात. कामे वेळेत पार पाडण्यासाठी त्यांच्यासोबत दोन सहकारीही कार्यशील असतात. परिसरात गेल्या तीन ते चार वर्षांत त्यांनी एकहजारांपर्यंत शेतकऱ्यांना सेवा दिली आहे. अंतर ४० ते ६० किलोमीटरपर्यंत असल्यास काहीवेळा पहाटे तीन वाजता देखील घरून निघावे लागते. महिन्याला पाच, दहा ते पंधरा एकरांपर्यंतचे काम राहते. सहकारी, त्यांचे वेतन, डिझेल आदी खर्च वजा जाता महिन्याला २० ते २५ हजार रुपये हाती पडतात असे सुनील यांनी सांगितले.

Web Title -  agriculture story marathi iinnovative farmer solapur dist has developed some implements farmers save


संबंधित बातम्या

Saam TV Live