2019 मध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे: रमेश कराड

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 मे 2018

उस्मानाबाद : लातूर जिल्ह्यातील भाजपचे रमेश कराड यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेच त्यांना उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर करण्यात आली. 

उस्मानाबाद : लातूर जिल्ह्यातील भाजपचे रमेश कराड यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेच त्यांना उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर करण्यात आली. 

उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या कार्यक्रमाला आमदार अमरसिंह पंडीत, आमदार राहुल मोटे, आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, बसवराज पाटील नागराळकर, अक्षय मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे, उस्मानबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कराड यांच्या आदेशानुसार कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांना उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची उमेदवारीही देण्यात आली आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

कराड  म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक सदस्य आहे. मध्यंतरी रस्ता चुकला होता. आता १४ वर्षांचा वनवास संपला आहे. २०१९ मध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. त्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

मुंडे म्हणाले की, कराड यांची घरवापसी तर आहेच त्याबरोबरच त्यांच्या १४ वर्षाच्या वनवासाचा शेवट आहे. भाजप हा निष्ठावंतावर अन्याय करणारा पक्ष आहे. श्री. कराड हे  (कै.) गोपीनाथराव मुंडे यांच्या जवळचे होते म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला. (कै.) गोपीनाथराव मुंडे यांच्याजवळ असणाऱ्यावर भाजपमध्ये असाच अन्याय होतो, असे मुंडे यांनी सांगितले. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर कराड यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला.


संबंधित बातम्या

Saam TV Live