जातपंचायतींच्या दहशतीचे क्रूर स्वरूप पुन्हा एकदा आले समोर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 मे 2019

अंबरनाथ - कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीच्या मानहानीकारक कुप्रथेच्या विरोधात संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते विवेक तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा करणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या प्रकारामुळे जातपंचायतींच्या दहशतीचे क्रूर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.

अंबरनाथ - कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीच्या मानहानीकारक कुप्रथेच्या विरोधात संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते विवेक तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा करणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या प्रकारामुळे जातपंचायतींच्या दहशतीचे क्रूर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.

कंजारभाट समाजातील महिलांसाठी अत्यंत अवमानकारक असलेल्या कौमार्य चाचणी पद्धतीविरोधातील ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ या चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते विवेक तमायचीकर यांना यापूर्वीही समाजाच्या काही नेत्यांकडून सामाजिक बहिष्काराच्या धमक्‍या देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्यामागे राज्यातील सुजाण नागरिकांचे बळ असल्याचे पाहून त्यांच्यावर थेट बहिष्कार जाहीर करण्यात आला नव्हता. मात्र विवेक यांच्या आजीचे सोमवारी रात्री देहावसान झाल्यानंतर समाजातील काही घटकांनी त्यांना समाजबहिष्कृत केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या अंत्ययात्रेत समाजातील एकही व्यक्ती सहभागी झाली नसल्याचे विवेक यांनी सांगितले.

समाजातील एका व्यक्तीच्या घरी त्याच दिवशी झालेल्या हळदी समारंभात एका समाजनेत्याचे भाषण झाले. विवेक यांच्या आजीच्या अंत्ययात्रेला कोणीही जावू नये असे आदेशवजा  आवाहन त्यांनी या भाषणात केल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर हा बहिष्काराचा प्रकार उघडकीस आला. तमायचीकर यांनी याबद्दल तीव्र खेद व्यक्त केला आहे. जातपंचायतीकडून मात्र, तमायचीकर हे समाजाची बदनामी करीत असल्याचा आरोप करण्यात येत असून, अशा प्रकारे कोणताही बहिष्कार टाकण्यात आला नसल्याचे समाजाच्या काही सदस्यांकडून सांगण्यात येत आहे.  

कौमार्य चाचणी म्हणजे काय?
कंजारभाट समाजातील स्त्रीच्या कौमार्याचा लग्नापूर्वी भंग झालेला नाही’ हे तपासून पाहण्याची अनिष्ट आणि स्त्रीच्या माणूसपणावर आघात करणारी ही कुप्रथा. समाजातील प्रत्येक महिलेला लग्नानंतर पहिल्याच रात्री ही चाचणी द्यावी लागते. कंजारभाट समाजाचे एक स्वतंत्र संविधान असून, त्यातील कलम ३८ नुसार विवाहित दाम्पत्याला या चाचणीकरीता एक खोलीत नेले जाते. तेथे दोन्हीकडचे नातेवाईक उपस्थित असतात. वधू-वराला तेथे अर्ध्या तासाचा वेळ दिला जातो. काही वेळाने पांढ-या चादरीवर रक्ताचा डाग आहे की नाही याची तपासणी होते. दुस-या दिवशी नवरीच्या दारात पंचायत भरते व तेथे सर्वांसमक्ष नव-या मुलाला विचारले जाते, की तुझा माल कसा होता, खरा की खोटा. नवऱ्या मुलाने तीन वेळा त्याचे उत्तर दिले की त्यावरून मुलीचे चारित्र्य योग्य की अयोग्य त्याचा फैसला होतो. वस्तुतः योनीचे पटल हे कोणत्याही कारणाने, अगदी धावणे, सायकल चालवणे अशा साध्या बाबींमुळेही फाटू शकते. त्याचा तिच्या तथाकथित कौमार्याशी काहीही संबंध नसतो.

समाजातील अनिष्ट परंपरेला विरोध करीत असल्याने आणि हे प्रकार उघडकीस आणल्याने जातपंचायतीने माझ्यावर बहिष्कार टाकला आहे.
- विवेक तमायचीकर, सामाजिक कार्यकर्ते

हे प्रकरण सामंजस्याने आणि चर्चेद्वारे मिटू शकेल. मात्र बहिष्कार टाकणे योग्य नाही.
- कृष्णा इंद्रेकर, उपायुक्त, धर्मादाय आयुक्तालय

Web Title: Social boycott of funerals


संबंधित बातम्या

Saam TV Live