हाफिज सईदची अटक म्हणजे पाकिस्तानचं ढोंग 

हाफिज सईदची अटक म्हणजे पाकिस्तानचं ढोंग 

मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने अटक केली आहे. मात्र, २००८ पासून आजपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहता ही अटकही केवळ तोंडदेखले पणाच ठरेल हे निश्चित आहे. दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी पुरवते हे वारंवार सिद्ध झाले आहे. मग ते मुंबईवरचे बाँबस्फोट असोत की भारताच्या संसदेवरचा हल्ला असो. २६/११ च्या मुंबईवरच्या हल्ल्यात अजमल आमीर कसाब हा अतिरेकी जिवंत पकडला गेला आणि मग पाकिस्तानला या हल्ल्याचा कट आपल्याच भूमीवर घडल्याचे मान्य करावे लागले.

त्यानंतर हाफिजला अटकही झाली. पण त्यानंतर त्याची जी बडदास्त ठेवली गेली ते पाहता ही अटक म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या डोळ्यांत फेकलेली धूळ होती हे नंतर स्पष्टपणे दिसून आले. पाकिस्तानच्या लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्या जमात-उल-दावा या संघटनेचा हाफिज सईद हा संस्थापक. भारतावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना पाकिस्तानातील मुरिदके येथे असलेल्या प्रशिक्षण तळावर हाफिज स्वतः उपस्थित होता हे मुंबई हल्ल्याचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी सिद्ध केले. कसाबनेही तशी जबानी दिली होती. 

हाफिजला पाकिस्तानने दोन वेळा त्याच्या राहत्या घरी स्थानबद्ध केले होते. ११ डिसेंबर, २००८ रोजी मुंबई हल्ल्यानंतर आणि नंतर पुन्हा २००९ मध्ये. पण दोन्ही वेळेला पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय हाफिजच्या मदतीला धावले आणि हाफिज पुढच्या कारवाया करायला मोकळा सुटला. २०१३ मध्ये भारताचे तत्कालिन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य केले होते. त्यामुळे लष्कर-ए-तय्यबा आणि जमात-उल-दावा या दोन्ही संघटनांना अत्यानंद झाला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने या हिंदू दहशतवादाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी हाफिज सईदने त्या पुढे जाऊन केली होती. या कथित हिंदू दहशतवाद्यांचे तळ ड्रोन हल्ल्यात उध्वस्त करावेत, अशी मुक्ताफळेही त्याने उधळली होती. २०१४ च्या सप्टेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तानात दोन्ही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भारत नद्यांमध्ये हेतूपूर्वक पाणी सोडून पाकिस्तानाच पूराच्या रुपाने दहशतवाद घडवत असल्याचा जावईशोध हाफिजने लावला होता. भारतावर अण्वस्त्र हल्ल्याची धमकीही त्याने दिली होती. 

हाफिज सईदचा बोलावता धनी ही पाकिस्तानची आयएसआय आहे हे उघड आहे. त्यामुळेच हाफिज मोकाट सुटला होता. आश्चर्याची बाब म्हणजे दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने हाफिजला मुंबई हल्ल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. आता फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ही पॅरिस स्थित जागतिक संघटनेच्या दबावाखाली पाकिस्तानने पुन्हा एकदा हाफिजला अटक केली आहे. सगळीकडून होणारी आर्थिक कोंडी पाहता पाकिस्तानला हे पाऊल उचलणे भाग होते. मात्र, हाफिज सईद पुन्हा मोकाट सुटणार नाही, याची खात्री कोण देणार, हा खरा प्रश्न आहे. भारताविरुद्धचे सगळ्यात मोठे हत्यार पाकिस्तान बोथट करेल हे पूर्व इतिहास पाहिला तर मनाला पटण्यासारखे नाही!


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com