प्रज्ञासिंह जिंकल्यास मोदींची नामुष्की

प्रज्ञासिंह जिंकल्यास मोदींची नामुष्की

"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली ताकद. सलग पाच वर्षे "मथळे' बदलणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे धोरण त्यांनी अतिशय हुशारीने वापरले. भाजप निवडणूक प्रचाराची मोहीम आता पक्षालाच नको असलेल्या "मथळ्या'ने संपत आहे. मोदी आणि शहा यांना सार्वजनिक जीवनात प्रथमच बचाव करता येणार नाही, अशा प्रकरणाचा सामना करावा लागला आहे.

भाजपचे नेहमीचे ट्विटरप्रेमी नेते प्रज्ञासिंह यांच्या बचावासाठी मैदानात उतरून "गांधी विरुद्ध गोडसे वाद' पुढे नेण्याच्या तयारीत होते. यात मंत्री अनंतकुमार हेगडे आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आघाडीवर होते. मात्र, हे सर्व प्रयत्न पाण्यात गेले. पक्षाच्या नेत्याने कोणत्याही व्यक्ती अथवा समुदायाबद्दल केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याचा बचाव अथवा ते नाकारण्याचे काम भाजप करू शकत असल्याचे मागील पाच वर्षांत दिसून आले. यात "अली विरुद्ध बजरंगबली', "मोदी की सेना', बेकायदा निर्वासितांना कीटकाची उपाधी, राहुल यांना पप्पू म्हणणे, आदी बाबींचा समावेश आहे. परंतु, महात्मा गांधींवर घसरताना ते एक गोष्ट विसरले. काही जण दिवाणखान्यात अथवा शाखांमध्ये गांधींच्या "चुका' आणि फाळणीबद्दल त्यांना दोष देणारे वादविवाद घालत असतील. मात्र, सार्वजनिकरीत्या दोष देण्याचे धाडस कोणी करीत नाही. पक्षाची वैचारिक पितृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही गांधींच्या हत्येपासून मागील सात दशके स्वतःला दूरच ठेवले आहे. 

आता पक्षाने भगवेधारी आणि हिंदुत्ववादी उमेदवार दिला. हा उमेदवार दहशतवादाच्या खटल्यात आरोपी असून, "दोषी ठरेपर्यंत तो निष्पाप' असा पवित्रा भाजपने घेतला. आता हाच उमेदवार गांधींची हत्या करणाऱ्याला देशभक्त म्हणत आहे. तुम्ही ज्याला राष्ट्रपिता म्हणता त्या व्यक्तीचा वारसा नष्ट करता येत नाही. विशेषतः त्यांच्या 150 व्या जयंती वर्षात जेव्हा कॉंग्रेस पक्षाकडून त्यांचा आदर्श तुम्ही यशस्वीरीत्या हिरावून घेतला आहे. पंतप्रधान स्वतः विदेशांतील पाहुण्यांना गांधींशी निगडित वारसा अभिमानाने दाखविण्याचे काम करतात. दांडी सत्याग्रहाला 89 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ब्लॉग लिहिणे आणि सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चंपारण येथे कार्यक्रम, साबरमती येथे चरख्यावर बसून छायाचित्रे काढणे आदी कामे पंतप्रधानांनी केली. तसेच, स्वच्छ भारत मोहिमेवरही गांधींचा गोल चष्मा बोधचिन्ह म्हणून वापरला. 

प्रज्ञासिंह ठाकूर या जनमत आकर्षित करणाऱ्या आणि पक्षाची नैतिक भूमिका स्पष्ट करणाऱ्या आहेत, असे मानले जाते. आता त्यांनी पंतप्रधान आणि पक्षप्रमुखांच्या पोटात जोरात लाथ मारली आहे. याची त्यांना तक्रारही करता येत नाही, कारण त्यांनीच प्रज्ञासिंह यांना शोधून काढले आहे. अमित शहा यांनी मोदींसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल खुलासा केला. भगवा दहशतवाद या नावाने हिंदूंना बदनाम करण्याची मोहीम कॉंग्रेसने हाती घेतली असून, याला आमचा पक्ष सत्याग्रहाच्या माध्यमातून उत्तर देत आहे, असे ते म्हणाले. येथे आणखी दोन कारणांचा विचार करावा लागेल. पहिले कारण, साध्वी प्रज्ञा यांच्या विधानापासून अंतर राखणे पक्षाला का शक्‍य झाले नाही. दुसरे म्हणजे, या राजकीय विधानाबाबत स्पष्टीकरण देताना शहा यांनी गांधींच्याच सत्याग्रह शब्दाचा वापर केला. गांधींनी संपूर्ण मानवजातीला दिलेला अहिंसक लढ्याचा मार्ग त्यांचीच हत्या करणाऱ्याला देशभक्त म्हणणाऱ्याचे समर्थन करण्यासाठी वापरण्यात आला. यावरून तुमची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, हे स्पष्ट होते.

योग्य कारणांसाठीही चुकीचे काम करू नका, हे जीवन आणि राजकारणातील आदर्श तत्त्व आहे. दिग्विजयसिंह यांना लक्ष्य करण्याचे काम भाजप करीत आहे. हिंदू दहशतवाद यावर उघडपणे बोलणारे ते कॉंग्रेसचे प्रवक्ते आहेत. त्यांनी दिल्लीतील बाटला हाउस चकमकीबद्दल शंका उपस्थित करीत अशोकचक्र विजेते हुतात्मा पोलिस अधिकारी मोहनचंद शर्मा यांच्याबद्दल प्रश्‍न उपस्थित केले होते. तसेच, मुंबईतील 26/11 चा हल्ला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कटाचा भाग असल्याचा आरोप करणाऱ्या पुस्तकाचेही त्यांनी समर्थन केले होते.

भाजपच्या मते, दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला हिंदुत्ववादी चेहराच दिग्विजयसिंह यांच्यासमोर योग्य ठरेल. गेल्या महिन्यात प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांना शाप दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वादग्रस्त विधान केले. याचबरोबर बाबरी मशीद पाडण्यात स्वतः सहभागी असल्याचेही त्यांनी वक्तव्य केले. यावर पक्षाने प्रतिमानहानी टाळण्यासाठी पावले उचलली. प्रज्ञासिंह यांनी मौनव्रत घेतले आणि भाजपने दिग्विजयसिंह यांच्यावर टीका सुरू केली.

दिग्विजयसिंह आणि कॉंग्रेसने याचप्रकारे मोहनचंद शर्मा यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, प्रज्ञासिंह यांच्या गोडसेभक्तीने पक्षाला तोंड लपविण्यासही जागा राहिली नाही. 
भाजपने 1989 पासून टोकाची विचारसरणी नियंत्रित ठेवण्याचे धोरण अचूकरीत्या अवलंबले आहे. अडवानी यांच्या अयोध्या यात्रेच्या सुरवातीच्या काळाचा विचार करता टोकाच्या विचारसरणीच्या प्रवृत्तींना खतपाणी घालण्यात आले. नंतरच्या काळात या प्रवृत्ती अडगळीत टाकण्यात आल्या. आठवून पाहा, साध्वी ऋतंभरा, प्रवीण तोगडिया आणि विनय कटियार. तर, काही जण मुख्य प्रवाहात आले. यात उमा भारती ते साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती ते योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. हे धोरण तीन दशके चालले आणि त्यानंतर लवकरच संपले. प्रज्ञासिंह या त्याचे ताजे आणि पक्षाला मान खाली घालायला लावणारे उदाहरण. त्यांची निवड चूक असल्याचेही पक्षाला मान्य करता येत नाही, कारण पक्षाच्या अध्यक्षांनीच जाणीवपूर्वक त्यांची निवड केल्याचे विधान केले होते. भारतीय राष्ट्रवाद कसा विकसित झाला याकडे भाजपने दुर्लक्ष केले.

हिंदू धर्म (हिंदुत्व) हाच संपूर्ण भारताला एकसंध ठेवत असून, हीच राष्ट्रवादाची व्याख्या असल्याचा त्यांचा समज आहे. हा प्रवास हिंदू धर्म ते हिंदुत्व ते हिंदीभाषक पट्ट्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ः एक धर्म, एक समाज, एक भाषा, एक राष्ट्र. भारतात मोठ्या प्रमाणात विविधता असल्याने या प्रकारच्या साच्यात तो बसू शकणार नाही. दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू आणि केरळ या चार राज्यांत जरी संपूर्ण बहुमत मिळाले, तरी मोदींना हे कायम लक्षात ठेवावे लागेल. या राज्यांतील 103 जागांपैकी दोन जागा मिळाल्यासही भाजपने भरून पावलो, अशी भावना ठेवावी.

संपूर्ण भारताचा विचार करता अशा प्रकारच्या हिंदुत्वाच्या वातावरणाला जनता विरोध करेल. संघराज्य देशाची स्थापना करणाऱ्या संस्थापकांच्या दूरदृष्टीला विरोधाभासी असा हा विचार आहे. या दूरदृष्टीत धर्म, धर्मग्रंथ अथवा विचारसरणीचा समावेश नाही. यामुळेच भारत प्रत्येक दशकात अतिशय चांगल्या प्रकारे एकत्र राहून बलशाली आणि अधिक धर्मनिरपेक्ष बनला आहे. याचवेळी विचासरणीच्या आधारे चालणारा शेजारी देश पाकिस्तानची अवस्था बिकट आहे. 

भारताने आधुनिक जगाला दिलेला मोठी देणगी म्हणजे विविधतेतील सलोखा आहे. जगात मध्य पूर्वेचा विचार करता वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदणे अवघड आहे. भारताचा विविधतेचा सगळ्यात मोठा ब्रॅंड महात्मा गांधी आहेत. नेहरूंच्याबद्दल वादग्रस्त विधाने करणे सोपे आहे. इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना काही जण नायक मानतात. याचवेळी टोकाची उजवी विचारसरणी असलेलेही महात्मा गांधींना लक्ष्य करणे धोक्‍याचे मानतात.

मोदी हे प्रामाणिकपणे सांगत असतील, की त्यांचे हृदय प्रज्ञासिंह यांना माफ करणार नाही, तर त्यांनी आता प्रज्ञासिंह जिंकू नयेत, यासाठी प्रार्थना करायला सुरवात करायला हवी. अन्यथा, महात्मा गांधींच्या नावाने शपथ घेऊन पाच वर्षे काम करणे त्यांना नामुष्कीचे ठरेल. कारण, गांधींच्या मारेकऱ्याला देशभक्त ठरविणारी त्यांच्याच पक्षातील व्यक्ती त्या वेळी संसदेत असेल. 

Web Title: Article on Pragya Thakur on Election Issue

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com