कणकवलीत वरचढ कोण? नितेश राणे की बंडखोर?

कणकवलीत वरचढ कोण? नितेश राणे की बंडखोर?



कणकवली मतदार संघातून भाजपकडून नितेश राणे आणि सेनेकडून सतीश सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेयत...राज्यात शिवसेना-भाजपाची महायुती आहे पण, कणकवलीत मात्र, युतीला तडा गेलाय...जिथे राणे तिथे सेनेचा विरोध हे समीकरण आहे...त्यामुळं नितेश राणेंसाठी ही लढाई अस्तित्वाची आहे...या निवडणुकीत राणेंना पाडण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसलीय...कणकवली मतदार संघ म्हणजे भाजपची हक्काची जागा...पण, असं असताना नितेश राणेंच्याविरोधात शिवसेनेनं सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय...कणकवली मतदार संघात सात उमेदवार रिंगणात असले तरीदेखील शिवसेना आणि राणे अशीच लढाई पाहायला मिळतेय...ही निवडणूक राणे आणि सावंतांसाठी अस्तित्वाची लढाई आहे...राजकारणात टिकण्यासाठी सतीश सावंत यांना ही निवडणूक जिंकावीच लागेल...नाहीतर निवडणुकीनंतर सतीश सावंत यांना राजकारणात पुन्हा उभं राहणं अवघड होईल...तर नितेश राणे यांच्यासाठीही ही निवडणुक जिंकणं महत्त्वाचं आहे...शिवसेनेनं आधीच निलेश राणे आणि नारायण राणेंचा पराभव केलाय...आता नितेश राणेंचा पराभव करून सिंधुदुर्गातील राणेंचं राजकारण संपवण्याचं स्वप्न शिवसैनिक पाहतायत...त्यामुळं विजय मिळवून राणेंना आपलं अस्तित्व टिकवण्याची ही अग्निपरिक्षा आहे...  

 घरोघरी जाऊन प्रचारावर भर, लोकसंपर्काचा फायदा कुणाला ?

नितेश राणे आणि सतीश सावंत हे कणकवलीतले...नारायण राणेंमुळं नितेश राणेंना राज्यात ओळख मिळाली...पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर नितेश राणेंनी देवगड, वैभववाडी आणि कणकवलीत कामांचा धडाका लावला...सोशल मीडियावर त्याची जबरदस्त मार्केटिंगही केली...पण, स्थानिक नेत्यांमुळं सामान्य कार्यकर्त्यांना नितेश राणेंपर्यंत सहज पोहोचणं शक्य होत नाही...त्यामुळं चांगली कामं करूनही नितेश राणेंचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जुळली नाही...तर सतीश सावंत हे गेली 24 वर्षे सिंधुदुर्गातील राजकारणात सक्रिय असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे...सहकार क्षेत्राच्या माध्यमातून दुर्गभ भागात सावंताचा जनसंपर्क वाढलाय...सहकार संस्था,सेवा संस्थेत केलेल्या कामाचा उपयोग सावंतांनी निवडणुकीसाठी केलाय...इतकंच नव्हे तर मूळ गाव भिरवंडे इथले सगळे रहिवासी, मुंबईतले चाकरमानी, माहेरवासीनी सगळेजण सतीश सावंतांच्या पाठिशी उभे आहेत...त्यामुळं गाजावाजा न करता, घरोघरी जाऊन मतांची संख्या वाढवण्यात सध्या तरी सतीश सावंतांना पसंती मिळतेय...

 राणे, सावंतांची जमेची बाजू आणि पडती बाजू

नितेश राणे - राणेंचा कौटुंबिक राजकीय वारसा असल्याने त्यांना राजकारणातील अनुभव आहे...पण, सक्रिय राजकारणात नितेश राणे गेल्या 6 वर्षांपासून आलेयत...पदार्पणातच म्हणजे 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या प्रमोद जठार यांचा पराभव केला...त्यावेळी नितेश राणे 25 हजार मतांनी निवडून आले...गेल्या पाच वर्षात नितेश राणे यांनी दांडगा लोकसंपर्क वाढवला, मतदारसंघात अनेक उपक्रम राबवले, छोटी मोठी कामंही केली...पण, अचानक भाजपमध्ये जाऊन उमेदवारी मिळवल्याने निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले...तडकाफडकी पक्ष बदलल्याने वयोवृद्ध असो किंवा सामान्य मतदार यांना नितेश राणे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढतायत हेदेखील माहित नाही...याचा फटका मतांमधून नितेश राणेंना बसू शकतो...पण, नितेश राणे हे ईव्हीएमवर प्रथम क्रमांकावर असल्याने थोडा का होईना त्याचाही फायदा होऊ शकतो...  

सतीश सावंत - गेली 24 वर्षे राजकारणात जम बसवलाय...शिक्षकाचा मुलगा अशी ओळख असलेल्या सावंतांनी 24 वर्षे नारायण राणेंसोबत काम केलं...जिल्ह्यातील राजकारणात सावंतांनी अनेक मोठी पदं भूषवली...बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संपर्क, सह्याद्री पट्ट्यातील नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली...शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तीमत्व हीच सतीश सावंतांची जमेची बाजू आहे...तर राणेंसोबत कित्येक निवडणुकीसाठी काम केल्यानं राणेंची निवडणुकीची रणनिती चांगलीच माहित आहे...पण, स्थानिक निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विधानं, भांडणाच्या काही क्लिप विरोधक व्हायरल करत असल्याने त्याचा फटका बसू शकतो...

 राणेंनी 24 वर्षांत दिलं नाही ते शिवसेनेनं 24 तासात दिलं !

सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते...गेल्या 24 वर्षांचा त्यांना राजकारणात दांडगा अनुभव आहे...माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे विश्वासू असलेले सावंत राणेंच्या सावलीप्रमाणे सोबत होते...त्यामुळं राणे सेनेत असताना, सावंतांना शिवसेनेचं जिल्हाध्यक्षपद, काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेस जिल्हाध्यक्षपद, जिल्हा परिषदेवर कायमस्वरुपी सदस्य, अशी अनेक पदं सावंतांनी भूषवली...जिल्ह्याच्या राजकारणात सावंतांनी चांगला जम बसवला...त्यांना राज्याच्या राजकारणात जाण्याची इच्छा होती...मात्र, सावंतांना ती संधी मिळाली नाही...गेल्या निवडणुकीत मालवण मतदार संघातून नारायण राणेंनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली...पण, सेनेच्या वैभव नाईकांनी राणेंचा पराभव केला...त्यानंतर राणेंनी स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला पण, राणे स्वत: भाजपाकडून राज्यसभेत खासदार झाले...आणि आपला पक्षंही भाजपात विलीन केला...राणे आपल्या मुलांच्या फायद्यासाठी पक्ष बदलत असल्याची चर्चाही होऊ लागली...त्यामुळं नारायण राणेंचे विश्वासू असलेले सतीश सावंतांनी तडकाफडकी निर्णय घेऊन शिवबंधन हातात बांधलं आणि 24 तासातच सेनेचा एबी फॉर्म मिळवला...त्यांना उमेदवारी मिळताच राणेंचे कट्टर समर्थक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण हे राणेंना सोडचिठ्ठी देत सतीश सावंतांच्या गोठ्यात सामील झाले...

नाराजांची मतं कुणाला मिळणार ?

नितेश राणेंनी काँग्रेस पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला...फॉर्म भरण्याच्या दोन दिवस आधी नितेश राणे भाजपमध्ये आले...आणि त्यांना भाजपनं एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिली...त्यामुळं भाजपमध्ये काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले...कणकवलीतले भाजपचे नेते संदेश पारकर, वैभववाडीतील अतुल रावराणेंनी बंडाचा पवित्रा घेतला...संदेश पारकर यांनी अपक्ष म्हणून अर्जही दाखल केला...पण, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणत संदेश पारकरांनी शिवसेनेच्या सतीश सावंतांना पाठिंबा जाहिर केला...तर अतुल रावराणे,संदेश पटेल, सभापती लक्ष्मण रावराणे हेदेखील प्रचार सभेत सहभागी झाले...त्यामुळं या चौघांची 6 वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली...ही कारवाई केल्यामुळं चौघेही भाजपचे नेते शिवसेनेच्या सतीश सावंतांसाठी मैदानात उतरलेयत...इतकंच नव्हे तर अधिकाऱ्याच्या अंगावर चिखलफेक, मासे फेकणे ही वादग्रस्त प्रकरणं नितेश राणेंसाठी डोकेदुखी ठरू शकतात...
 
 सोशल मीडियावरचे उतावळे कार्यकर्ते कुणाला तारणार ?

सोशल मीडियावर चांगली पोस्ट शेअर केली तर तो आपला नाहीतर तो विरोधक हे चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळतंय...राणेंबद्दल कुणी एखादी पोस्ट टाकली आणि ती पोस्ट राणेंसाठी योग्य वाटत नसेल तर त्याचा खरपूस समाचार घेतला जातो...त्या पोस्टवर वाईट वाईट कमेंट्सही लिहिल्या जातात...यामुळं नितेश राणेंना सोशल मीडियावरील कार्यकर्त्यांचा फटका बसू शकतो...तर दुसरीकडे सावंत मात्र, सोशल मीडियापासून लांब आहेत...सावंतांचं पारडं जरी आता जड असलं तरी मतदानाच्याआधीचा एक दिवस खूप महत्त्वाचा आहे...या दिवशी सगळं चित्रं पलटू शकतं...त्यामुळं नितेश राणे गड राखणार की सतीश सावंत कणकवलीचा गड सर करणार हे निकालादिवशीच कळेल...

Web Title - marathi news article on rane future in election 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com