BLOG - मौत की उमर क्‍या है? अटल... अटल... 

- संदीप काळे 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मौत की उमर क्‍या है? दो पल भी नहीं, 

जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं। 

मौत की उमर क्‍या है? दो पल भी नहीं, 

जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं। 

अटलजींच्या या प्रसिद्ध ओळी.. मरणालाही त्यांनी जिंकले होते. गेल्या 10 वर्षांपासून तब्येत साथ देत नसली, तरी त्यांनी कधी हार खाल्ली नाही. "भारतरत्न' अटलबिहारी यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. "एका मोठ्या भारतरत्नाला आम्ही गमावले' अशा शब्दात सबंध भारतवासीयांना शोक आवरता आला नाही. एक अत्यंत साधी आणि विनयशील व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने आणि विनयशीलतेने भारतरत्न बनू शकते, याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे अटलजी. आपल्या पक्षाची सत्ता येवो की न येवो; आपल्या विचाराची सत्ता मात्र जनमानसावर सतत बिंबवण्याचे काम करणारा हा नेता सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या गळ्यातला ताईत होता. आज त्यांच्या जाण्याने हा कार्यकर्ता पोरका झाला आहे. संघाच्या मुशीत वाढणाऱ्या फार कमी नेत्यांनी सर्वांगीण भारताचा विचार केला. त्यात अटलजींचे नाव सर्वात आघाडीवर असेल. 

नांदेडकरांच्या आठवणीतले अटल.... 
1982 ला "अब की बारी अटल बिहारी'चा नारा देत जनसंघाने भाजपच्या झेंड्याखाली अवघा देश जंगजंग पछाडून काढला होता. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी भाजपच्या प्रसारासाठी नांदेडला आले होते. चंद्रकांत मस्की हे त्या वेळी भाजपचे मुदखेड मतदारसंघातील एकमेव आमदार होते. आता नांदेडची तहसीलची इमारत आहे, तिथे गुरुद्वारा मैदानावर त्यांची सभा होती. 1980 ला भाजपची स्थापना झाल्यावर भाजपच्या पक्षबांधणीसाठी अटलजी नांदेडमध्ये आले होते. भाग्यनगर येथे संघाचे कट्टर कार्यकर्ते डॉ. प्रभाकर पुरंदरे यांच्या घरी अटलजींच्या जेवणाचा बेत केला होता. त्यांची आवडती फिश फ्राय आणि खिम्याचा केक खाऊन वाजपेयी एकदम प्रसन्न झाले होते. वाजपेयी यांना जेवण वाढणाऱ्या पुरंदरे यांच्या मोठ्या कन्या मंजिरी पुरंदरे सांगत होत्या...अटलजींच्या स्वागतासाठी अवघे घर सजले होते. छान रांगोळी, स्वयंपाकाचा घमघमाट, बाहेर वाजणारी वाजंत्री, सारे काही आठवणीत राहील असे. माझी आई विजया पुरंदरे हिने अटलजींना ओवाळले. जेवण सुरू झाले आणि जेवणाबरोबर देशभरातली आढाव्याची मैफील सुरू झाली. नांदेडमध्ये फीशसाठी प्रसिद्ध असणारे हॉटेल "ब्लू डायमंड' येथील आचारी मोहनसिंग वस्ताद यांना खास फिश तयार करण्यासाठी बोलावले होते. मी नमस्कार करतांना "सदा खुश रहो' हे त्यांचे शब्द आजही कानात कायम घर करून आहेत.

प्रभाकर पुरंदरेच्या दुसऱ्या लहान कन्या अरुंधती पुरंदरे सांगत होत्या... मी त्यांच्याशी त्या वेळी चर्चा केली. विद्यार्थी परिषदेचे काम करतानाचे अनुभव मी त्यांना सांगत होते. माझे सर्व बोलणे त्यांनी ऐकून घेतले आणि शेवटी म्हणाले, "लगे रहो... आप जैसे कार्यकर्ता संघटन का मुख्य आधार है। लक्ष्मीनारायण पंडित तेव्हा भाजपचे अध्यक्ष होते. त्यांनी अटलजींना आवडणाऱ्या सर्व बाबींची विशेष खबरदारी घेतली होती. 

त्यानंतर 1998 ला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अटलजी नांदेडला आले होते. त्या वेळी भाजपचे उमेदवार म्हणून धनाजीराव देशमुख निवडणूक रिंगणात होते. भाजपचे सरचिटणीस म्हणून आता काम पाहणारे व्यंकटेश साठे हे तेव्हा भाजपचे एक कार्यकर्ते म्हणून काम करीत होते. साठे म्हणाले, "नांदेडच्या स्टेडियमवर त्यांचे भाषण होते. प्रचार भाजपचा, सभा भाजपची आणि भाषण ऐकण्यासाठी कॉंग्रेससह इतर पक्षातील कार्यकर्ते केवळ अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी आले होते. धनाजीराव पडले; पण अटलजींची सभा आजही इतिहाचे पान बनली आहे.' 

सभेनंतर त्यांची गुरुद्वारा भेट सर्वांच्या आठवणीत राहील अशीच होती. पत्रकार राम शेवडीकर सांगत होते, "आमच्या घरापासून ते गुरुद्वारापर्यंत अटलजींना पाहण्यासाठी एकच गर्दी होत होती. माझे घर गुरुद्वाराजवळच असल्यामुळे अटलजींचा तो "दर्शन दौरा मला आजही आठवतो. त्यांच्या गुरुद्वारातील सत्काराने त्यांची मोहक छबी अजूनच सुंदर दिसत होती. ती छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी माझ्यासह अनेक जण पुढे आले होते. 
कवीमनाचे अटल... 

छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, 
टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। 

किंवा 

पेड़ के ऊपर चढ़ा आदमी 
ऊंचा दिखाई देता है। 
जड़ में खड़ा आदमी 
नीचा दिखाई देता है। 

अशा अनेक शब्दांना अजरामर करणाऱ्या अटलजी यांनी साहित्य क्षेत्रात आपला कमालीचा ठसा उमटविला होता. अपने ही मन से कुछ बोलें, ऊँचाई, एक बरस बीत गया, क़दम मिला कर चलना होगा, कौरव कौन, कौन पांडव, क्षमायाचना, जीवन की ढलने लगी सॉंझ, झुक नहीं सकते, दो अनुभूतियॉं, पुनः चमकेगा दिनकर, मनाली मत जइयो, मैं न चूप हूँ न गाता हूँ, मौत से ठन गई, हरी हरी दूब पर, हिरोशिमा की पीड़ा हे त्यांचे प्रसिध्द कवितासंग्रह; तर "मेरी संसदीय यात्रा', "स्नकल्प काल', "शक्ती से शान्ती', "मृत्यू या हत्या', "अमर बलिदान', "जनसंघ और मुसलमान', "संसद में तीन दशक' अशी अनेक त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. 
वैचारिक साहित्यावर त्यांचा पगडा कमालीचा होता. अटलजींचे वडील कृष्ण बिहारी हे संस्कृत भाषा आणि साहित्याचे विद्वान होते. कृष्णा यांच्या विचाराचा अटलजंवर कमालीचा पगडा होता. 
"जनसंघ और मुसलमान' या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय मुसलमान आपलेच कसे आहेत, हे अगदी पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्या काळी त्यांच्यावर टीकाही झाली. आपल्यावर टीका करणाऱ्याला कधीही वाकड्या शब्दात उत्तर न देणारे ते भारताचे एकमेव पंतप्रधान असतील. ते मुस्लिमधार्जिणे आहेत, अशी टीका त्यांच्यावर अनेक वेळा झाली; तरीही त्यांनी आपल्या माणुसकीच्या विचारावर कधीही त्या टीकेचा परिणाम होऊ दिला नाही. आरएसएसचे मासिक चालवण्यासाठी अटलजीनी ???? ला आपले कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडून कामाला सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्यातल्या निर्भीड पत्रकाराची ओळखही झाली. पुढे राजकारणामध्ये अटलजीने प्रवेश केला. पहिल्यादा लोकसभेची निवडणूक बलरामपूरमधून लढवली आणि ते निवडून आले. त्या निवडणुकीनंतरचे त्यांचे पहिले भाषण कमालीचे गाजले होते. त्यांच्या भाषणाची नेहमी विरोधकही प्रशंसा करायचे. त्याचे भाषण असले की कविता आणि गीतामधील दाखले ठरलेले असायचे. त्यांची बहुचर्चित कविता "मौत से ठन गई!' ही आजही सर्वसामान्यांच्या ओटावर गुणगुणत असते. 

मौत से ठन गई! 
जूझने का मेरा इरादा न था, 
मोड पर मिलेंगे इसका वादा न था, 
रास्ता रोक कर वह खडी हो गई, 
यूं लगा जिंदगी से बडी हो गई। 
मौत की उमर क्‍या है? दो पल भी नहीं, 
जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं। 
मैं जी भर जिया, मैं मन से मरूं, 
लौटकर आऊंगा, कूच से क्‍यों डरूं? 
तू दबे पांव, चोरी-छिपे से न आ, 
सामने वार कर फिर मुझे आजमा। 
मौत से बेखबर, जिंदगी का सफ़र, 
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर। 
बात ऐसी नहीं कि कोई ग़म ही नहीं, 
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं। 
प्यार इतना परायों से मुझको मिला, 
न अपनों से बाक़ी हैं कोई गिला। 
हर चुनौती से दो हाथ मैंने किए, 
आंधियों में जलाए हैं बुझते दिए। 
आज झकझोरता तेज़ तूफ़ान है, 
नाव भंवरों की बांहों में मेहमान है। 
पार पाने का क़ायम मगर हौसला, 
देख तेवर तूफ़ां का, तेवरी तन गई। 
मौत से ठन गई। 

त्यांच्या लिखाणावर वास्तवादाचा चष्मा नेहमी पाहावयास मिळतो. कधीही त्यांचे लिखाण ललित स्वरूपाचे नव्हते. माझ्यासारख्या समाजवादी विचार असलेल्या तरुणाला हा संघवादी योद्धा का आवडायचा, याचे मुख्य कारण त्यांनी आपल्यामध्ये कधी कडवा हिंदू दिसू दिला नाही. त्यांनी कधी भगवा विरुद्ध हिरवा याला खतपाणी घातले नाही. म्हणून अटलजी आम्हाला तरुणांचे आदर्श वाटतात.

"न मैं टायर्ड हूँ न मै रिटायर्ड हूँ' हे त्यांचे विचार सूर्य आणि चंद्र असेपर्यंत अजरामर राहतील.

काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ 
गीत नया गाता हूँ 

हे वाजपेयी यांचे शब्द नाहीत; तर जगण्याचा आधार आहे. आज त्यांच्या जाण्याने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक मार्गदर्शक नेता हरपला आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live