अटलबिहारी वाजपेयी रुग्णालयात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) सायंकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेण्यासाठी 'एम्स' रुग्णालयात धाव घेतली. नियमित तपासणीसाठी वाजपेयी यांना आज दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

वाजपेयी यांना भेटण्यास डॉक्‍टरांनी मनाई केली असल्याचे वृत्त दुपारी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना वाजपेयी यांची प्रत्यक्ष भेट घेता आली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही सायंकाळी 'एम्स'ला भेट दिली. वाजपेयी यांचे दीर्घकाळापासूनचे सहकारी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांनीदेखील 'एम्स'ला भेट दिली. बड्या नेत्यांच्या भेटीमुळे वाजपेयी यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. 

मात्र, 'दोन दिवसांपूर्वी अटलजींची प्रकृती जशी होती, तशीच आजही आहे. ही नियमित तपासणी आहे', असे निवेदन वाजपेयी यांच्या कुटुंबीयांकडून प्रसिद्ध करण्यात आले. 'वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे. 'एम्स'चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वाखालील तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक वाजपेयी यांची तपासणी करत आहे', असे पत्रक रुग्णालयाने दुपारी प्रसिद्ध केले होते. 

वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असली, तरीही आज रात्री लगेच त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जाण्याची शक्‍यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live