पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसह पाच जणांविरुद्ध 'अट्रोसिटी' अंतर्गत गुन्हा दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 जुलै 2019

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यान्वये (अॅट्रोसीटी) चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यान्वये (अॅट्रोसीटी) चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ.करमळकर, प्रफुल्ल पवार यांच्यासह सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षासंचालक सुरेश भोसले, सुरक्षारक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश भीमराव भोसले (वय 25) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादी हे विद्यापीठातील मराठी विभागामध्ये एमफील करीत आहे. विद्यापीठातील विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठविला आहे. कुलगुरु, कुलसचिव यांच्यासह पाच जणांना फिर्यादी हे अनुसूचित जाती आणि जमातीमधील असल्याचे माहित असल्याने त्यांनी फिर्यादी यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्यासाठी जातीय द्वेषातून विद्यापीठाच्या एका प्रकरणात1 एप्रिल 2019 ला त्यांच्याविरुद्ध खोटे व गंभीर गुन्हे दाखल केले. 

1 एप्रिलला विद्यापीठाने जेवणाच्या प्रश्नावरुन अचानक काढलेल्या एका परिपत्रकाबद्दल विद्यापीठातील रिफेक्टरीसमोर सकाळी 11 ते दुपारी दोन या वेळेत 150 ते 200 विद्यार्थी गोंधळ घालीत होते. त्यावेळी फिर्यादी हे त्यांच्या वृत्तवाहिनीसाठी वार्तांकन करत होते. हा गोंधळ सुरु असताना तेथे विद्यापीठाचे सुरक्षारक्षक व चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी पाहत होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये छापुन आलेल्या वृत्तामध्ये फिर्यादीच्या नावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

विद्यापिठाविरुद्ध सातत्याने बातम्या प्रसिद्ध करीत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने आपल्याविरुद्ध आपणास मानसिक त्रास देण्यासाठी, शैक्षणिक करीअर खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास खडकी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार करीत आहेत.

"आकाश भोसले या विद्यार्थ्यावर विद्यापीठ प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरुन भोसले याने कुलगुरु, कुलसचिव यांच्यासह पाच जणांविरुद्ध 'अॅट्रोसीटी' अंतर्गत काल गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे." 
- भास्कर जाधव, पोलिस निरीक्षक, चतु:श्रृंगी पोलिस ठाणे.

 

Web Title: Atrocity Filed against five people including Vice Chancellor of Pune University


संबंधित बातम्या

Saam TV Live