शत्रुघ्न सिन्हा विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे.

पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे.

पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत पक्षाकडून त्यांना दुर्लक्षित ठेवण्यात आले. त्यांनीही वेळोवेळी भाजपविरोधात भूमिका घेतली. निवडणूक जाहीर होण्याच्या काळातच त्यांनी कॉंग्रेसशी घरोबा करीत पाटणासाहिबमधून उमेदवारी मिळविली. आता कॉंग्रेसवासी शत्रुघ्न सिन्हा यांचा मुकाबला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी होणार आहे. दोन्ही दिग्गज उमेदवारांमुळे ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. पाटणासाहिब मतदारसंघात संपूर्ण पाटणा शहर आणि उपनगरांमधील काही भागाचा समावेश होतो. निवडणुकीत एकूण 18 उमेदवार असले, तरी खरी लढत शत्रुघ्न सिन्हा आणि रविशंकर प्रसाद यांच्यातच आहे. 

गंगेच्या किनाऱ्यावरील शेकडो वर्षे जुन्या असलेल्या शीख समाजाच्या तीर्थस्थळाचे नाव या नगराला दिलेले आहे. शीखांचे गुरू गोविंदसिंग यांचे हे जन्मस्थळ आहे. बालपणीचा काळ त्यांनी पाटणासाहिबमध्येच घालविला आहे. 2008 मध्ये मतदारसंघाच्या सीमानिश्‍चितीनंतर पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा येथून विजयी झाले होते. 2014 मध्येही त्यांनी ही जागा राखली. आता तिसऱ्यांदाही आपणच विजयी होणार, असा विश्‍वास ते व्यक्त करीत आहेत.

पाटणासाहिबमधून "हॅट्ट्रिक' करणार का? यावर ते म्हणाले की, येथून मी दोनदा निवडून आलो आहे. मला मिळालेले मताधिक्‍य हे बिहारमधील सर्वाधिक आहे. जनतेच्या माझ्यावरील प्रेमामुळे हे शक्‍य झाले आहे. शिवाय, मी काही वारंवार पक्षांतर करणाऱ्यातला नाही. कोणत्या परिस्थितीत मला भाजपमधून बाहेर पडावे लागले, हे सर्वांना माहीत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करताना सिन्हा हे भाजपचे वर्णन "वन मॅन आर्मी अँड टू मॅन शो' असे करीत असत. भाजपमधून बाहेर पडून कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळविल्यानंतर भाजपने रविशंकर प्रसाद यांना त्यांच्याविरोधात मैदानात उतरविले. सिन्हा यांना यापूर्वी मिळालेला विजय हा भाजपच्या नावावर मिळालेला असल्याचा दावा भाजप नेते करीत आहेत. 

अन्य पक्ष सिन्हांच्या पाठीशी

पाटणासाहिबमध्ये आम आदमी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष यांचा निवडणुकीत फारसा प्रभाव नसणाऱ्या पक्षांनी धर्मनिरपेक्ष व भाजपला पराभूत करणाऱ्याला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या पक्षांचे कार्यकर्ते शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रचार करताना दिसत होते. 

Web Title: Attention on Shatrughan Sinhas Hat trick in Loksabha Election


संबंधित बातम्या

Saam TV Live