मराठवाड्यात अखेर वरुणराजाचं आगमन

मराठवाड्यात अखेर वरुणराजाचं आगमन

औरंगाबाद : पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठवाड्यात अखेर पाऊस बरसला असून, मोठ्या खंडानंतर पाऊस आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. 

बीडमध्ये ९.४ मिमी पावसाची नोंद
बीड : जुन महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर मोठ्या खंडानंतर शुक्रवार - शनिवारच्या मध्यरात्री जिल्ह्यात मध्यम पावसाने हजेरी लावली. सरासी ९.४ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ३.६३ टक्के एवढा आहे. 
मागच्या वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस झाला होता. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिमी असून गतवर्षी ३३४ मिमी एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्याला दुष्काळाच्या तिव्र झळांचा सामना करावा लागला. दरम्यान, यंदा जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळासह पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठा खंड पडला होता. शुक्रवारी (ता. २१) रात्री ११ वाजेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत जिल्ह्यात कमी अधिक पाऊस पडत होता. धारुर महसूल मंडळात सर्वाधिक ४९ मिमी तर त्याखालोखाल बीड महसूल मंडळात ४० मिमी एवढा पाऊस झाला. शिरुर कासार, आष्टी व पाटोदा तालुके मात्र कोरडे गेले आहेत. सरासरी ९.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. धारुर व बीड परिसरातील नद्या व ओढ्यांतून पाणी वाहिले आहे. दरम्यान, पावसाच्या हजेरीने शेतकरी काही प्रमाणात सुखावला असून पेरणीची लगबग होताना दिसत आहे. कृषी निविष्ठांच्या दुकानांत सकाळ पासूनच शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

नांदेड जिल्ह्यात पावसाच्या सरी...
नांदेड : फेब्रुवारीपासून वाढत्या तापमानाने बेजार झालेल्या नांदेडकरांना आज. सायंकाळी पावसाच्या हलक्या सरींनी थंडावा दिला. मोठा पाऊस पडेल असे वातावरण निर्माण होऊनही अपेक्षित पाऊस न झाल्याने नागरिकांचा पुन्हा हिरमोड झाला. शहराच्या सिडको, हडको, बाबानगर परिसर तसेच जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सायंकाळी सहाच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मुखेड, धर्माबाद, कुंडलवाडी, बिलोली, नायगाव या तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. भर पावसाळ्यातही पाऊस भरभरून कोसळत नसल्याने नागरिकांची हवा गुल झाली आहे. सर्वत्र दुष्काळाची भीषण छाया अजूनही पसरलेली असून शहरासकट गावे, वाड्यावस्त्यांच्या पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. जून महिन्यात अशी स्थिती पहिल्यांदाच जाणवत आहे.

हिंगोली, परभणी, उस्मानाबादेत पाऊस
दुष्काळाच्या झळांनी होरपळत असलेल्या मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांतही शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोलापुरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

Web Title: rain in Marathwada

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com