औरंगाबादमध्ये उभारणार ९३ फुटांचा शिवसेनाप्रमुखांचा पुतळा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व स्मारक १७ एकर जागेत उभारण्यात येणार आहे. या जागेत बाळासाहेबांचा ९३ फूट उंचीचा पुतळा आणि संग्रहालय राहील. बाळासाहेबांचे मराठवाड्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांची क्षणचित्रे चित्रफितीच्या रूपात दाखविण्याची सोयही या ठिकाणी असेल.

औरंगाबाद - ‘एमजीएम’जवळील प्रियदर्शिनी उद्यानाच्या १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९३ फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामाची ४५ कोटी रुपयांची निविदा डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (ता. २०) सांगितले.  

बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व स्मारक उभारण्याचा महापालिकेने तीन वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने पाच कोटी रुपयांचा निधीही महापालिकेला दिला; मात्र पीएमसी नियुक्तीमध्येच महापालिकेचा बराच वेळ गेला. या संदर्भात सोमवारी (ता. १९) रात्री मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 

या वेळी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान आणि स्मारक उभारण्याच्या कामाचे ४५ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. 

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. ऑर्कहोम यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी तयार केलेला सविस्तर आराखडा अंतिम करण्यात आला आहे. हा आराखडा उद्धव ठाकरे यांना दाखविण्यात आला. पहिल्या टप्प्यात २८ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात १७ कोटी रुपयांच्या कामांची निविदा काढण्याचे महापालिकेने ठरविले होते. मात्र, दोन्ही कामांसाठी एकच निविदा काढण्याची सूचना ठाकरे यांनी या वेळी केली.

१७ एकरांत होणार स्मारक 
बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व स्मारक १७ एकर जागेत उभारण्यात येणार आहे. या जागेत बाळासाहेबांचा ९३ फूट उंचीचा पुतळा आणि संग्रहालय राहील. बाळासाहेबांचे मराठवाड्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांची क्षणचित्रे चित्रफितीच्या रूपात दाखविण्याची सोयही या ठिकाणी असेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live