Loksabha 2019 : औरंगाबादेत काँग्रेस आणि शिवसेनेची मैत्री तर नाही?

Loksabha 2019 : औरंगाबादेत काँग्रेस आणि शिवसेनेची मैत्री तर नाही?

औरंगाबाद - गेल्या चार टर्मपासून कॉंग्रेसला पराभव पत्कारावा लागत असल्याने औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीसाठी आमदार सतीश चव्हाण यांना सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून समोर आली. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी बैठका, सभा, भेटीगाठी अशी जोरदार तयारी सुरु केली. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंना रोखायचे असेल तर चव्हाणच हवेत, असे म्हणत अन्य पक्ष, संघटनांनी देखिल मदत करण्याचे धोरण स्विकारले. मात्र, मतदारसंघ सोडायला तयार नसलेल्या कॉंग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी बहाल केली. यामुळे राष्ट्रवादीच्या युवक मंडळीकडून ही "कॉंग्रेस आणि शिवसेनेची मैत्री' तर नाही ना, अशा शब्दांत त्यांच्या उमेदवारीवर संशय व्यक्‍त केला आहे. 

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत गेल्या चार लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पराभवाची धुळ चाखावी लागली आहे. त्यामुळे यंदा ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी सोडावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉंग्रेससमोर ठेवला. विशेष म्हणजे या मतदार संघांत मराठा समाजाची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आता खासदार खैरेंना रोखायचे असेल तर मराठाच उमेदवार हवा, अशी मागणी कॉंग्रेससह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून केली गेली. चव्हाणांना तयारी लागा, असे संकेत मिळाल्याने त्यांनी गेल्या तीन - चार महिन्यात सभा, बैठकांवर भर देत भेटीगाठी सुरु केल्या. भावी खासदार म्हणून सोशल मिडीयावर त्यांच्याच नावाची चर्चाही रंगायला लागली होती. मात्र, जागा सोडण्यास कॉंग्रेस तयार नसल्याचे लक्षात येताच पुढे बघू म्हणत चार दिवसापासून कार्यालयातच थांबणे पसंत केले. 

दरम्यान, शुक्रवारी (ता.22) मध्यरात्री कॉंग्रेसने कॉंग्रेसकडून आमदार झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून सोशल मिडियातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर शंका घेत टिका करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे घरची लोक (कॉंग्रेस), राष्ट्रवादीसह मराठा समाजाची नाराजी दूर करण्याचे झांबड यांच्यासमोर आव्हान आहे. दुसरीकडे उमेदवारीचा घोळ सोडविण्यास उशीर झाल्याने कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या काय करीत आहेत, असा प्रश्‍न जनता उपस्थित करीत आहे. विद्यमान खासदार खैरेंविरुद्ध आमदार झांबड अशी लढत होईल, असे सध्या म्हटले जात असले तरी अजून मैदानात कोण- कोण उतरते, कोण कोणला मदत करते, यावरच सर्वकाही अवंलबून आहे. विशेष म्हणजे आमदार झांबड यांच्या उमेदवारीवरून खुद्द कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनीच बंड पुकारले आहे. त्यामुळे अजून पुढे काय- काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

तिकीट नाही, तरीही आमदार चव्हाणांकडून पक्षाचे आभार 
गेल्या तीन - चार महिन्यात या मतदार संघात परिपूर्ण तयारी केली होती. मात्र, जिल्हा कॉंग्रेसमधील काही व्यक्‍तींनी हा मतदारसंघ जिंकण्यापेक्षा स्व:हिताआड कोणी येऊ नये, यासाठी अधिक तत्परता दाखविली आहे. असो, या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याइतपत मी सक्षम आहे, असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटणे, हीच माझ्यासाठी मनस्वी आनंदाची गोष्ट आहे, असे म्हणत चव्हाण यांनी पक्षासह विश्‍वास दाखविणाऱ्या जनतेचे आभार व्यक्‍त केले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात श्री. चव्हाण यांनी म्हटले, की चार वेळा पराभव होवूनही मित्रपक्षाला आत्मपरीक्षणाची गरज वाटत नाही. जनता परिवर्तन म्हणते, जिल्हा कॉंग्रेसमधील काही व्यक्‍तिंवर अंगाऱ्याची जादू चालते. म्हणून कायमच हे वेळेवर उमेदवार लादतात. परिणामी पूर्ण तयारीअभावी जागा गमवावी लागते. म्हणून देशाची परिस्थिती पाहून प्रत्येक ठिकाणी "जो जिंकू शकतो. तोच उमेदवार' या भूमिकेतून श्री. पवारांनी माझ्या उमेदवारीबद्दल संकेत दिले होते. मी ही जागा जिंकू शकतो, असा विश्‍वास पक्षाने व्यक्‍त केला होता. त्याबद्दल पक्षातील नेत्यासह जनतेचे आभार मानले.

Web Title: Congress leader Subhash Zambad contest loksabha election in Aurangabad

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com