आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ : मराठा क्रांती मोर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मार्च 2019

औरंगाबाद - ‘एसईबीसी’तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीचा निषेधही करण्यात आला.

औरंगाबाद - ‘एसईबीसी’तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीचा निषेधही करण्यात आला.

भाजप-शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याने आता पुढे काय, याबाबत चर्चा करून रणनीती ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मंगळवारी (ता. पाच) राज्यव्यापी बैठक घेतली. हॉटेल विंडसर कॅसल येथे दुपारी १२ वाजता बैठकीला सुरवात झाली. 

प्रारंभी महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या विविध भागांतून आलेल्या समन्वयकांनी सूचना मांडल्या. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करण्यात आली. मोर्चा समन्वयकांनी सांगितले, की मागील अडीच वर्षांत राज्यातच नव्हे, तर जगभरात मराठा समाजाने ऐतिहासिक मोर्चे काढले; मात्र सरकारने २१ पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाबाबत तर घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांविरोधात प्रचार करावा लागेल. दरम्यान, या बैठकीत दोन समन्वयकांमध्ये वैयक्तिक कारणावरून किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली. महिला समन्वयकांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला.

प्रसंगी पुढाऱ्यांना गावबंदी करा
या बैठकीत महिला समन्वयकांनी सांगितले, की मतदानावर बहिष्कार टाकण्याऐवजी पुढाऱ्यांना गावबंदी करू. एवढे करूनही पुढारी गावात आलेच तर त्यांना महिलांमार्फत चोप देण्याची व्यवस्थाही करायला हवी. लोकशाही मार्गाने मागण्या मान्य होत नसतील तर आता त्यास जबाबदार पुढाऱ्यांनाच लक्ष्य करावे, तरच त्यांना समाजाच्या रागाची तीव्रता लक्षात येईल, अशी सूचना केली. त्यास अनेकांनी अनुमोदनही दिले.

फितुरांपासून दूर राहण्याचा सल्ला
मराठा समाजाने एकीतून जगाला आपली ताकद दाखविली; मात्र काही फितुरांनी मोर्चा, समाजाचे मालक असल्याचा आव आणत सत्ताधाऱ्यांकडून पैसे घेतले. मोर्चा, आंदोलने, बैठका थांबविण्याचे प्रयत्न केले; मात्र समाजाने आता त्यांनाच बाजूला सारले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत अशा फितुरांपासून दूर राहावे, असा सल्लाही बैठकीत देण्यात आला.

‘कोणी अपक्ष लढल्यास समाजाने बळ द्यावे’
मराठा क्रांती मोर्चातील एखादा कार्यकर्ता जर अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरणार असेल तर त्यास समाजाने बळ द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्यासही अनुमोदन देण्यात आले.

Web Title: Maratha Kranti Morcha oppose to government


संबंधित बातम्या

Saam TV Live