विवाहितेने पती व सासूच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 जानेवारी 2019

औरंगाबाद : हुंड्यात मागितलेल्या रकमेपैकी काही रक्कम न दिल्याने पती व सासूने दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जाळून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी पतीला दहा वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

औरंगाबाद : हुंड्यात मागितलेल्या रकमेपैकी काही रक्कम न दिल्याने पती व सासूने दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जाळून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी पतीला दहा वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रसकर यांनी मंगळवारी (ता. 29) हा निकाल दिला. पुंजाराम मुळे (32, रा. सटाणा, ता. जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात भाग्यश्री मुळे हिने दिलेल्या मृत्युपूर्व जबाबात, तिचा 1 एप्रिल 2008 मध्ये पुंजारामशी विवाह झाला होता. लग्नातील 1 लाख 11 हजार रुपये हुंड्यापैकी 11 हजार रुपये बाकी होते. यावरून तिचा पती पुंजाराम व सासू रुख्मिणीबाई नेहमी मारहाण, शिवीगाळ करून घराबाहेर काढून छळ करत असत.

16 एप्रिल 2010 ला भाग्यश्रीने अंगावर रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले. आग विझविताना आरोपी पुंजारामचा हात देखील भाजला. दरम्यान, भाग्यश्रीला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. तेथे पोलिस व तत्कालीन नायब तहसीलदार डी. एन. भारस्कर यांनी भाग्यश्रीचा जबाब नोंदविला.

उपचारादरम्यान 27 एप्रिल 2010 ला भाग्यश्रीचा मृत्यू झाला. प्रकरणात करमाड पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी सासूचा मृत्यू झाला; तर सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता बी. आर. लोया यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले.

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी पती पुंजारामला दहा वर्षे सक्तमजुरी, इतर कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी, पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, दुसऱ्या कलमान्वये सहा महिने साधी कैद, पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, तिसऱ्या कलमान्वये सहा महिने साधी कैद, पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.

Web Title: Married wife committed suicide due to husband and mother-in-law


संबंधित बातम्या

Saam TV Live