कोल्हापुरच्या रिक्षा चालकाच्या मुलाने मुंबईच्या आयआयटीमधून मिळवली डॉक्‍टरेट

सुधाकर काशीद
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

यांचे नाव वसंत शंकर कातवरे, वय ७५. राहायला कुंभार गल्लीत ऋणमुक्तेश्‍वराच्या देवळाजवळ. गेली ४५ वर्षे रिक्षा चालवतात. रिक्षा व्यावसायिकाच्या भाषेत सांगायचं झालं, तर एसटीस्टॅंड ते गंगावेस रोज वडाप करतात. रिक्षाच्या कमाईवरच घर चालवायचं म्हटल्यावर दिवसभर रिक्षावरच असतात. असं राबतच त्यांनी मुलगा अनिकेतला शिकवले. त्याच्या इंजिनिअरिंगच्या खर्चासाठी कर्ज काढले. अनिकेतनेही आपल्या रिक्षावाल्या बापाच्या कष्टाचे पांग फेडले. 

यांचे नाव वसंत शंकर कातवरे, वय ७५. राहायला कुंभार गल्लीत ऋणमुक्तेश्‍वराच्या देवळाजवळ. गेली ४५ वर्षे रिक्षा चालवतात. रिक्षा व्यावसायिकाच्या भाषेत सांगायचं झालं, तर एसटीस्टॅंड ते गंगावेस रोज वडाप करतात. रिक्षाच्या कमाईवरच घर चालवायचं म्हटल्यावर दिवसभर रिक्षावरच असतात. असं राबतच त्यांनी मुलगा अनिकेतला शिकवले. त्याच्या इंजिनिअरिंगच्या खर्चासाठी कर्ज काढले. अनिकेतनेही आपल्या रिक्षावाल्या बापाच्या कष्टाचे पांग फेडले. 

आज मुलगा अनिकेत एमटेक, तर झाला आहेच; पण त्याने आयआयटीपवई येथून रस्ते बांधणी या विषयात डॉक्‍टरेट मिळवली आहे. त्याला चांगली नोकरी, तर चालून आली आहे; पण मुलगा एवढा मोठा झाला तरी वसंत कातवरे आजही रिक्षा चालवत आहेत. पडत्या काळात रिक्षानेच कुटुंबाला आधार दिला. आता चांगले दिवस आले म्हणून रिक्षा अडगळीत टाकायची नाही, अशी या वसंत कातवरेंची भावना आहे. एका साध्या रिक्षावाल्याची ही भावना म्हणजे त्याच्या कष्टाची आणि बापाच्या कष्टाचे पांग फेडणाऱ्या त्याच्या मुलाची ही आगळीवेगळी कथाच आहे. वसंत कातवरे यांचा मुलगा अनिकेत महापालिकेच्या बाळासाहेब खर्डेकर विद्यालयात आणि शाहू विद्यालयात शिकला. बारावीला चांगले मार्क मिळाल्याने वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तेथे शैक्षणिक कर्ज व स्कॉलरशिपवर शिकला. तेथून आय.आय.टी. खरगपूर येथून एमटेक झाला. नुकताच आय.आय.टी.पवईमधून रस्ते बांधणी यावरील संशोधनात पीएचडीचा मानकरी ठरला. 

आपल्या मुलाची ही सगळी वाटचाल सुरू असताना वसंतराव आपल्या दिवसभराच्या कमाईतला वाटा बाजूला काढू लागले व जेवढे जमतील तेवढे पैसे त्याला पाठवू लागले. आई अश्‍विनी अशिक्षित. तिला आपला मुलगा एमटेक झाला. त्याने डॉक्‍टरेट मिळवली म्हणजे काय, हे या क्षणीही त्या माऊलीला कळालेले नाही, पण आपला अनिकेत कोणतरी मोठा झालाय, एवढा आनंद तिच्या चेहऱ्यावर आहे. 
डॉक्‍टरेट मिळाल्यानंतर येत्या शनिवारी अनिकेत कोल्हापूरला पहिल्यांदाच येणार आहे. बाप वसंतरावांची लगबग सुरू आहे. आपल्या पोरग्याला डॉक्‍टरेट मिळाली, हे कोणाला कसं आणि कधी सांगू हे त्यांना समजेनासे झाले आहे. त्यातही शल्य असे की रिक्षावाल्याच्या मुलाला आय.आय.टी. पवईमधून डॉक्‍टरेट मिळाली, हे न पटणारे काही महाभाग आहेत; पण वसंतराव आनंदात आहेत. ‘उद्या परवा गुळगुळीत दाढी करणार बघा,’ असं पांढऱ्या दाढीवर हात फिरवत आनंदाच्या भरात ते सांगत आहेत. पोरानं आपल्या कष्टाचं पांग फेडल्याचा आनंद त्यांच्या शब्दाशब्दात आहे. आनंदानं गदगदून त्यांच्या अश्रूंचा बांध कधीही फुटेल, अशी स्थिती आहे. आनंद-आनंद म्हणतात, तो या साध्या रिक्षावाल्याच्या जीवनात आज फेर धरून आला आहे.  

अनिकेत कातवरेने रस्त्याच्या बांधणीत डांबराचा वापर, डांबराचे तापमान या विषयावर संशोधन केले आहे. डांबराचा वापर पर्यावरणपूरक कसा होईल व रस्त्याचे आयुष्य अधिक कसे वाढेल, हा त्याच्या संशोधनाचा पैलू आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live