मी एकाकी पडलेली मुंबईची लोकल बोलतेय...

साम टीव्ही
रविवार, 7 जून 2020

पण आता नेमकं काय झालंय... सांगा ना... स्टेशनं ओस पडलीयत... इनाऊन्समेटंचा आवाज नाही... तिकीट खिडक्या ओस पडल्यायत... इंडिकेटर विझून गेलेयत... तुम्ही घरात अडकून पडलाय आणि मीही यार्डात पडून राहिलीय एकाकी... तुमच्या-माझ्या प्रेमात हे कोण आलंय आडवं... 

बरेच दिवस झाले हा आवाज ऐकून... बरेच दिवस... दिवस कशाला बऱ्याच महिन्यांत हा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाच नसेल...

माझ्या येण्याची वर्दी देणारा हा आवाज आता कुणी देत नाही... आणि तो ऐकायला आता कुणी स्टेशनवर येतही नाही... काय झालंय बाळांनो... माझ्यावर रुसलाय का तुम्ही... किती दिवस झाले तुम्ही माझ्या नजरेसही पडला नाहीत... आधी कसे तुम्ही माझ्या अंगाखांद्यांवर खेळायचात... चौथ्या सीटसाठीही भांडायचात... तासाभराच्या प्रवासातही भजनं गायचात... ती भजनं ऐकताना मलाही ठेका धरू वाटायचा... काही लोक खेळणी, मोबाईलचे कव्हर, कानातले-नाकातले किंवा कुरमुरे असं बरंच काही विकायला यायचे... कुणी बसल्या जागीच डब्बा खायचा, कुणी एखादी डुलकी काढून घ्यायचा... तर कुणी मोबाईलवर सिनेमे बघत राहायचा... उन्हाळ्यात घामेजल्या अंगाने तुम्ही प्रवास करायचात, पावसाळ्यात भिजल्या अंगाने बसून राहायचात... जागच्या जागी... रोजच्या रोज तुम्ही मला भेटायला यायचात... अगदी सणासुदीलाही मी तुमच्या सेवेत असायची... हो... सणासुदीवरून आठवलं... दसऱ्याला नाही का... तुम्ही माझ्या अंगाखांद्यांवर झेंडूची फुलं आणि आपट्यांच्या पानांची माळ घालायचात... सजवून टाकायचात मला... भर गर्दीतही पूजा करायचात... धुळवडीला माझ्याही सर्वांगावर रंगीबेरंगी संडा पडायचा... मोहरून जायचे मी... तुम्हाला आठवतंय ? मी स्टेशनात आले की हसू उमटायचं तुमच्या चेहऱ्यावर ... मला यायला थोडा उशीर झाला की बोटं मोडायचात माझ्या नावाने... आणि अचानक स्टेशनवरची अनाऊन्समेंट कानावर पडायची तुमच्या... मग तुम्ही बॅगा सावरत उभे राहायचात माझ्या स्वागताला... मी स्टेशनात घुसली रे घुसली की मी थांबायच्या आतच गाडीत शिरायचात... अत्यंत जवळची मैत्रीण खूप दिवसांनी भेटल्यावर गच्च मिठी मारावी तसं... रोज होत राहायचं असं...

पण आता नेमकं काय झालंय... सांगा ना... स्टेशनं ओस पडलीयत... इनाऊन्समेटंचा आवाज नाही... तिकीट खिडक्या ओस पडल्यायत... इंडिकेटर विझून गेलेयत... तुम्ही घरात अडकून पडलाय आणि मीही यार्डात पडून राहिलीय एकाकी... तुमच्या-माझ्या प्रेमात हे कोण आलंय आडवं... 

खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत आपण... छातीइतक्या पाण्यातूनही आपण चालत राहिलोय दुडक्या चालीनं अनेकदा... पण आपण एकमेकांची साथ सोडली नाही कधीच...

कोरोनामुळे तुमची माझी ताटातूट झालीय ना... नका घाबरू... हळूहळू होईल सगळं नीट... तोपर्यंत काळजी घ्या... आपण कोरोनाला संयमाचा असा काही सिग्नल देऊ, की तोही ट्रॅक बदलून पळून जाईल कुठल्या कुठं... मग तुमची पावलं येतीलच माझ्याकडे धावत... मीही स्वागताला असेन सजून-सवरून... कितीही केलं तरी माझा जन्म तुमच्यासाठीच आहे... आणि तुमचं जगणंही माझ्यासोबतच आहे... कारण, तुम्ही माझी लेकरं आहात... माय-लेकराची ताटातूट करण्याएवढं मोठं संकट जगात कधीच नसतं... तुम्हाला पुन्हा एकदा कुशीत घेऊन मी मिरवणारेय... मोठ्या दिमाखात... भेटू लवकरच...
 


संबंधित बातम्या

Saam TV Live