फाईल विनाकारण थांबली तर नोकरी थांबली : बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी

सरकारनामा
रविवार, 12 जानेवारी 2020

सातारा : माझ्या त्रासासाठी मी मंत्री झालेलो नाही, लोकांच्या त्रासासाठी मंत्री झालो आहे, असे स्पष्ट करून कायदेशीर कारवाईसाठी मला अडविणारा आजपर्यंत तरी कोणी तयार झालेला नाही. माझ्यावर दबाव आणून मी कोणाचे ऐकणारा नाही. जास्तीत जास्त काय होईल मंत्रीपद जाईल. पण, लोकांना न्याय देताना मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास मी ते खपवून घेणार नाही, असा इशारा पाणी पुरवठा, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

सातारा : माझ्या त्रासासाठी मी मंत्री झालेलो नाही, लोकांच्या त्रासासाठी मंत्री झालो आहे, असे स्पष्ट करून कायदेशीर कारवाईसाठी मला अडविणारा आजपर्यंत तरी कोणी तयार झालेला नाही. माझ्यावर दबाव आणून मी कोणाचे ऐकणारा नाही. जास्तीत जास्त काय होईल मंत्रीपद जाईल. पण, लोकांना न्याय देताना मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास मी ते खपवून घेणार नाही, असा इशारा पाणी पुरवठा, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

मंत्री बच्चू कडू सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी साताऱ्यात आल्यावर पोवईनाक्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अपूर्ण केला. त्यानंतर ते जिल्हा परिषदेत बैठकीसाठी गेले. तेथील बैठक संपल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, "अनेक शासकिय योजना आजही लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. 50 वर्षापूर्वी महिला व बालसंगोपन योजना अस्तित्वात आली. मात्र, जिल्ह्यात दहा ते 20 हजार विधवा महिला असताना लाभार्थ्यांची संख्या मात्र, तीनशे, चारशे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आम्ही सातारा जिल्ह्यात नवीन योजना लागू केली आहे. आमची अंगणवाडी सेविका लाभार्थ्यापर्यंत जाऊन सगळी माहिती घेऊन निराधार महिलांना योजना देण्याचे काम करणार आहे. या विभागातून या योजनेची सुरवात होत असून त्यानंतर राज्यभर ही योजना राबविली जाणार आहे.''

''भिक्षा मागणाऱ्यांवर कायम स्वरूपी उपाय योजना केली जाणार आहे. एकही भिक्षेकरी दिसणार नाही, यासाठी पथदर्शी प्रकल्प पुण्यात राबविला जाणार आहे. तो यशस्वी झाल्यावर संपूर्ण राज्यभर राबविला जाणार आहे. महिला बालविकासात निराधार महिलांना चांगला आधार देण्याचे काम आमच्या मंत्रालयाकडून केले जाईल. त्यांना सक्षमपणे उभे केले जाईल. यामध्ये शेतकरी, अपंग, अनाथ महिलांना न्याय देण्याचे काम या विभागाच्या वतीने होईल.'' असेही बच्चू कडू म्हणाले.

आपण आजच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत का, या प्रश्‍नावर मंत्री कडू म्हणाले, ''फाईल विनाकारण थांबली तर त्यांची नोकरी थांबली. कायद्यानुसार कारवाईला सामोरे जावे लागले. शिक्षणाधिकाऱ्यांना आज सांगितले. मागच्या एका महिन्यात किती तक्रारी आल्या, त्याचा प्रवास आणि त्या कुठे थांबल्या, सगळ्या घोषवारा आल्यावर त्यामध्ये दोषी सापडले आणि सात दिवसांच्यावर फाईल थांबविली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.''

प्रत्येक अधिकारी हा कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांशी जोडलेला असतो. मंत्री मंडळात असताना तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्‍यता आहे, यावर ते म्हणाले, ''माझ्या त्रासासाठी मी मंत्री झालेलो नाही, लोकांच्या त्रासासाठी मंत्री झालो आहे, कायदेशीर कारवाईसाठी मला अडविणारा आजपर्यंत तरी कोणी तयार झालेला नाही. माझ्यावर दबाव आणून मी कोणाचे ऐकणारा नाही. जास्तीत जास्त काय होईल मंत्रीपद जाईल. पण, लोकांना न्याय देताना मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास मी ते खपवून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.''

एका प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री बच्चू कडू यांनी माजी निवडणुक आयुक्त टी एन. शेषन यांचे उदाहरण दिले. काही वेळेस कायदा चांगला असतो पण अधिकारी चांगला नसतो. ज्यावेळी अधिकारी चांगला असतो त्यावेळी मंत्री चांगला नसतो. टी. एन. शेषन यांच्या काळात निवडणूक आयोग अतिशय मजबूत आयोग होता. त्यांच्याशिवाय माहितीच पडले नसते. त्यामुळे आता मला टी. एन. शेषन बनावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


संबंधित बातम्या

Saam TV Live