काँग्रेसचे 10 ते 12 आमदार 25 जूनला राजीनामा देण्याची शक्यता

काँग्रेसचे 10 ते 12 आमदार 25 जूनला राजीनामा देण्याची शक्यता

बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने असंतुष्ट झालेल्या 10 ते 12 आमदारांनी तातडीने राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय काहीसा लांबणीवर पडला आहे. आता 25 जूनला राजीनामे देण्याचा मुहूर्त निश्‍चित झाल्याचे समजते. 

कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) पक्षांतील नेत्यांत दिवसेंदिवस मतभेद वाढतच आहेत. उघडपणे त्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील संबंध बिघडत चालले आहेत. त्यातच कॉंग्रेसच्या 11 आमदारांनी तातडीने राजीनामे देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते. त्यांना रोखण्यासाठी किंवा त्यांची नाराजी दूर करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते सिद्धरामय्या, पक्षाचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यापैकी कोणत्याही नेत्यांनी गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत. सरकार मजबूत असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर मौन धारण केले आहे. माजी पंतप्रधान व जेडीएसचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मात्र काही असंतुष्ट आमदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. 

पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळावर आमदार के. सुधाकर यांची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरवातीला विरोध दर्शविला होता. परंतु आता विद्यमान अध्यक्ष जयराम यांचा राजीनामा घेऊन तेथे सुधाकर यांची नियुक्ती केली. त्यामुळे असंतुष्ट आमदारांनी तत्काळ राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय काही दिवसांसाठी स्थगित ठेवला आहे. शिवाय राजीनाम्यानंतर आपणास कायदेशीर त्रास होणार नाही, याचा अभ्यास करण्यात येत असल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात 11 तर दुसऱ्या टप्प्यात आठ आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय केल्याचे कळते. 

भाजपची सावध पावले 
भाजपने यापूर्वी केलेल्या प्रयत्नात अपयश आल्याने आता सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशन काळात असंतुष्ट आमदारांचे राजीनामे घ्यायचे व त्याचबरोबर अधिवेशनात अविश्वास ठराव दाखल करण्याचा भाजपने निर्णय घेतला असल्याचे समजते. कॉंग्रेस आमदारांनी स्वयंप्रेरणेतून राजीनामा दिल्यास भाजपची सरकार स्थापन करण्याची तयारी असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Congress 12 MLAs likely to be resign on tuesday in Karnataka

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com