कापूस खरेदीत मोठा घोटाळा, शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा डल्ला 

साम टीव्ही
शुक्रवार, 19 जून 2020
  • कापूस खरेदीत मोठा घोटाळा ! 
  • शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा डल्ला 
  • ११ हजार ७०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस नोंदणी 

राज्यात कापूस खरेदी सुरू झालीय. मात्र, या कापूस खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी तब्बल ११ हजार ७०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस नोंदणी करून डल्ला मारलाय. 

कापूस उत्पादकांचा जिल्हा ही यवतमाळची ओळख. मात्र, याच जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात खरेदी घोटाळा झाल्याचं उघड झालंय. व्यापाऱ्यांनी तब्बल ११ हजार ७०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस नोंदणी करून कापूस विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कोरोना संसर्गाच्या काळात शेतकऱ्यांची नोंदणी करून टोकन पद्धतीने कापूस खरेदीला सुरुवात झाली. नेमका याचाच फायदा व्यापाऱ्यांनी उचलला. या काळात शेतकऱ्यांचा कापूस अत्यंत कमी किमतीत व्यापारी विकत घ्यायचे आणि तोच माल सीसीआयला दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर चढ्या किमतीत विकायचे. सात बारा शेतकऱ्याचा, मात्र मोबाईल नंबर आणि बँकेचं खातं मात्र आपलं दाखवायचं. असा गोरखधंदा या व्यापाऱ्यांनी सुरू केलाय. या संपूर्ण प्रकारात जिनिंग प्रेसिंगचे मालक, ग्रेडर आणि वरिष्ठ अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय. 

या आरोपांमधलं गांभीर्य आणि घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता सहकार प्रशासनानं राज्यभर प्रत्येक तालुक्याच्या सहायक निबंधकाकडून सर्वेक्षण केलं. त्यात हा घोटाळा उघड झालाय. 

आता या कापूस खरेदी घोटाळ्यात प्रशासन व्यापाऱ्यांविरुद्ध काय कारवाई करतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live