मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्यात पाकविरोधी कारवाई करण्याची चर्चा

मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्यात पाकविरोधी कारवाई करण्याची चर्चा

बिश्‍केक (किर्गिझस्तान) : येथील "शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन'च्या संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत पुन्हा एकदा पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. भारतासाठी त्रासदायक ठरलेल्या दहशतवादावर पाकने कठोर कारवाई करावी, असे मत मोदींनी या वेळी मांडले. मोदी आणि जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी माध्यमांसमोर मांडला. दरम्यान, मोदींनी या वेळी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतली. 

"पाकिस्तानने दहशतमुक्त वातावरण तयार करायला हवे. या परिस्थितीमध्ये आम्हाला ते घडताना दिसत नाही,'' असे मत मोदी यांनी जिनपिंग यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान मांडले. ""आम्ही आतापर्यंत शांततेसाठी खूप प्रयत्न केले; पण ते फसले. आम्ही अपेक्षा करतो की, पाकिस्तानने दहशतवादावर कठोर कारवाई करावी. भारत पूर्वीच्या भूमिकेवर ठाम असून, आम्हाला पाकिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध हवेत आहेत,'' असेही मोदी यांनी जिनपिंग यांना सांगितल्याचे गोखले म्हणाले. जिनपिंग यांच्यासोबतची चर्चा अतिशय फलदायी होती, असे मोदी यांनी म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दलही जिनपिंग यांनी मोदींचे स्वागत केले. जिनपिंग यांचा पंधरा जून रोजी वाढदिवस असून, त्या पार्श्‍वभूमीवर मोदींनीही त्यांना ऍडव्हान्स शुभेच्छा दिल्या. "वुहानमधील बैठकीनंतर दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांमध्ये कमालीचे स्थैर्य आले असून, दोन्ही बाजूंच्या रणनीतीक संवादामध्येही प्रगती झाल्याचे दिसून येते. यामुळे दोन्ही देश परस्परांच्या हितसंबंधांबाबत कमालीचे संवेदनशील झालेले दिसून येतात. दोन्ही देशांसाठी सहकार्याची नवी क्षेत्रे खुली झाली आहेत,'' असेही मोदी यांनी जिनपिंग यांच्याशी बोलताना स्पष्ट केले. 

भारतभेटीचे निमंत्रण स्वीकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले भारतभेटीचे निमंत्रणही जिनपिंग यांनी या वेळी स्वीकारले. ते या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येण्याची शक्‍यता आहे. मागील वर्षी वुहान येथे झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. पुढील द्विपक्षीय चर्चादेखील यशस्वी होईल, असा आशावाद भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे. 

Web Title: PM Narendra Modi Aggressive on Pakistan Actions

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com