वाचाळवीरांची वाणी भाजपला भोवली

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 मे 2019

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागल्याने पक्षाचे नेतृत्व बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पक्षानेही यावर सारवासारव करत या नेत्यांची प्रकरणे पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आज घेतला. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीच तसे आदेश दिल्याने वाचाळ नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागल्याने पक्षाचे नेतृत्व बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पक्षानेही यावर सारवासारव करत या नेत्यांची प्रकरणे पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आज घेतला. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीच तसे आदेश दिल्याने वाचाळ नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. 

भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याची देशभक्त म्हणून भलावण केल्यानंतर भाजप नेतृत्व कोंडीत सापडले होते. पक्षालाही अखेर माघार घेत ही आमची भूमिका अथवा विचारसरणी नसल्याचा खुलासा करावा लागला होता. या अडचणीतून बाहेर पडेपर्यंतच पक्षनेतृत्वाला आणखी धक्के बसले. केंद्रीय मंत्री व कर्नाटकातील वाचाळ नेते अनंतकुमार हेगडे यांनी ट्‌विट करत आणखी एका नव्या वादाला जन्म दिला. हेगडे यांनी त्यांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, ""सात दशकांनंतर देशातील बदललेल्या वातावरणात नव्या पिढीकडून हे विषय चर्चिले जात आहेत हे चांगले आहे. शिक्षा झालेल्यांची बाजूदेखील विचारात घेतली गेली पाहिजे आणि या चर्चेमुळे नथुराम गोडसे आनंदित झाला असेल.'' भाजपचेच दक्षिण कारवारचे खासदार नलिन कातील यांनी राजीव गांधी यांची अजमल कसाब व नथुराम गोडसे यांच्याशी तुलना करणारे ट्‌विट करून आणखी खळबळ उडवून दिली. ""नथुराम गोडसेने केवळ एकाच व्यक्तीची हत्या केली तर अजमल कसाबने 72 लोकांना मारले होते. राजीव गांधींनी 17 हजार लोकांची हत्या केली होती. तुम्हीच ठरवा अधिक क्रूर कोण?'' असे त्यांनी त्यांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

शहांचे निवेदन 
अमित शहा यांनी एका निवेदनाद्वारे भाजपची ही भूमिका व विचारसरणी नाही. या नेत्यांची विधाने भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात जाणारी आहेत, असे स्पष्ट केले. परंतु या नेत्यांबद्दल काहीशी सौम्य भूमिका घेताना त्यांनी या नेत्यांनी पक्षाकडे माफीनामा सादर केल्याचे सांगितले आणि तरीही त्यांची ही विधाने शिस्तभंग कारवाई समितीकडे सुपूर्त करण्यात आल्याचे म्हटले आहे. समितीला या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेऊन दहा दिवसांत कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहितीही शहा यांनी दिली. 

निवडणूक आयोगाकडून दखल 
भोपाळ : महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त ठरविणाऱ्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याची दखल घेत यासंबंधीचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अनिल सौमित्र यांची हकालपट्टी 
महात्मा गांधी यांना "पाकिस्तानचे राष्ट्रपिता' म्हणणारे मध्य प्रदेशातील भाजप नेते अनिल सौमित्र यांची आज पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. सौमित्र यांनी फेसबुकवर महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण केले होते. भाजप श्रेष्ठींनी सौमित्र यांना सात दिवसांच्या आत त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मारणाऱ्या नथुराम गोडसेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभाव होता. - सिद्धरामय्या, कॉंग्रेस नेते 

साध्वी प्रज्ञासिंह गोडसेला देशभक्त ठरवित असताना मोदी मात्र ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीवर मौन बाळगतात. अशा स्थितीमध्ये मी माझ्या देशासाठी केवळ प्रार्थनाच करू शकतो. मला आशा आहे की एके दिवशी हे शांत बहुमत हिंसाचाराला दूर ठेवेल. -कपिल सिब्बल, कॉंग्रेस नेते 

हेगडे यांचे घूमजाव 
नथुराम गोडसे संदर्भातील वक्तव्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागलेले भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी अखेर घूमजाव केले, आपले ट्विटर खाते एक आठवडाभरापासून हॅक झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटर खात्यावर काही पोस्ट आपल्या लक्षात न येताच पोस्ट करण्यात आल्या. गांधाजींनी देशासाठी मोठा त्याग केल्याचे सांगून त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नलीनकुमार कटील यांनीही आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली आहे. त्यांनी त्यांच्या ट्‌विटरवरील वादग्रस्त मजकूरही काढून टाकला आहे. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याला देशभक्त म्हणणाऱ्यांविरुध्द कारवाई करावी. स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचे योगदान मोठे आहे. अशा महात्म्याची हत्या करणाऱ्यांना देशभक्त संबोधणे म्हणजे देशद्रोहच आहे. अशा व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे. 
-मल्लिकार्जून खर्गे, कॉंग्रेसचे नेते 

Web Title: The BJP on the backfoot due to Bad Talking leader


संबंधित बातम्या

Saam TV Live