राज्यात भाजप मध्यावधी निवडणुकांच्या तयारीत?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

धुळे : राज्यात भाजप व शिवसेनेत सत्तास्थापण्यापूर्वी मुख्यमंत्रिपद व 'मलईदार' मंत्रिपदांवरून रस्सीखेच सुरूच आहे. हा तिढा सुटत नसताना राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत भाजपच्या गोटातून दिले जात आहेत. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सायंकाळनंतर आढावा बैठक घेतली. त्यामध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपला स्वबळावर तयारी करण्याचे निर्देश कार्यंकर्त्यांना देण्यात आले. याला भाजपचे धुळे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनीही दुजोरा दिला.

धुळे : राज्यात भाजप व शिवसेनेत सत्तास्थापण्यापूर्वी मुख्यमंत्रिपद व 'मलईदार' मंत्रिपदांवरून रस्सीखेच सुरूच आहे. हा तिढा सुटत नसताना राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत भाजपच्या गोटातून दिले जात आहेत. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सायंकाळनंतर आढावा बैठक घेतली. त्यामध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपला स्वबळावर तयारी करण्याचे निर्देश कार्यंकर्त्यांना देण्यात आले. याला भाजपचे धुळे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनीही दुजोरा दिला. निवडणुकीत मोठे यश मिळवून राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धुळे येथे जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश दिले. धुळे जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. पैकी चार जागा भाजपने लढल्या होत्या. मात्र, केवळ दोन जागांवरच पक्षाला यश मिळाले.

'साक्री'सह 'धुळे ग्रामीण' या जागांवर पराभव झाला. आता पाचही जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. 'साक्री'सह 'धुळे ग्रामीण'मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर जे मतदान झाले, त्यात आणखी पाच ते दहा हजार मते जमविण्यासाठी रणनीती ठरविली गेली. याबाबत मंत्री रावल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की धुळे जिल्ह्यात भाजपला चारही जागांवर यश मिळण्याची अपेक्षा होती; परंतु आम्हाला केवळ दोनच जागांवर यश मिळाले आहे. यावेळी भाजपतर्फे पाच जागा लढविण्यात
येतील आणि पाचही जागांवर यश मिळविण्यात येईल. त्यादृष्टीने पक्षाच्या कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

भाजपचे धुळे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मंत्री रावल यांच्याकडून मध्यावधी निवडणुकांबाबत संकेत दिले गेल्याचे सांगितले.

 ते म्हणाले, की पर्यटनमंत्री रावल यांनी आम्हाला मध्यवधी विधानसभा निवडणुकांसाठी तयारीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही तयारीला लागलो आहोत. जिल्ह्यातील पाचही जागा आम्ही निवडून आणून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करणारच आहोत.

आम्ही पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. मंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तसे आदेश दिले आहेत. आगामी काळात केव्हाही विधानसभा निवडणूक लागली, तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. जिल्ह्यातील पाचही जागा निवडून आणू. आमचे नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील.

- अनुप अग्रवाल, शहर- जिल्हाध्यक्ष, भाजप, धुळे.

 

Web Title: BJP may preparing for midterm elections in the Maharashtra says jaykumar rawal


संबंधित बातम्या

Saam TV Live