अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर: संजय राऊत

अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर: संजय राऊत


नवी दिल्ली: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आणि भाजपवर तोफ डागली. अजित पवार यांना भाजपनं मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला. अडीच वर्षे अजित पवार यांना, तर अडीच वर्षे भाजपला मुख्यमंत्रिपद अशी ही ऑफर असल्याचंही ते म्हणाले.
संजय राऊत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवार आणि भाजपमध्ये झालेल्या 'डील'विषयी आज मोठा गौप्यस्फोट केला. भाजपनं अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. सत्तेचा कितीही गैरवापर करा, पण आम्ही पुरून उरू, असं सांगतानाच, विश्वासदर्शक ठरावावेळी आमचा आकडा दहाने जास्त असेल, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्वच आमदार परतले आहेत. काही आमदारांना गुरूग्रामच्या एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी भाजपवर केला. आमदारांच्या सुटकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोकही गेले होते. त्यांना परत आणण्यात आलं आहे. ते आमदार आता भाजपनं कशा प्रकारे दबाव आणला, याचा वृत्तांत सांगत आहेत. त्यांना काही ऑफर देण्यात आल्या, तर काहींना भीती दाखवण्यात आली, असा दावाही राऊत यांनी केला. हॉटेलमध्ये पाच ते सहा लोकांना डांबून ठेवलं होतं. त्यांच्यावर पहारा देण्यासाठी भाजपनं गुंड ठेवले होते, हरयाणात सरकार असल्यानं त्याचा गैरफायदा घेऊन पोलीस बाहेर तैनात केले होते. लोकशाहीसाठी हे चांगलं लक्षण नाही. मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी या देशातील राज्यकर्ते कुठल्या थराला जात आहेत. हे सगळं घृणास्पद आहे. बहुमत असल्याचं राज्यपालांना सांगितलं आणि शपथ घेतली; मग गुंडगिरी, दरोडेखोरी हे सगळं करण्याची गरज काय आहे. भाजपनं असे करून राज्यपाल, राष्ट्रपती आणि महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे, अशी तोफही त्यांनी डागली.

यावेळी राऊत यांनी भाजपवर तोफ डागली. सत्तेचा कितीही गैरवापर करा. आम्ही पुरून उरू. कितीही गडबड, घोटाळे करा, पण विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी तुमच्यापेक्षा आमच्याकडे दहाने आकडा अधिक असेल, असा दावा त्यांनी केला. भाजपच्या नेत्यांची माथी फिरलेली आहेत. सत्ता नसेल तर यांना वेड लागेल. महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांना सांगून त्यांच्यासाठी मनोरुग्णालये उभारण्यास सांगू, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं राज्याच्या राजकारणला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर अजूनही काही आमदार 'बेपत्ता' असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे अजित पवार हे मुख्यमंत्री होतील अशी ऑफर देऊ केली आहे, असा दावा राऊत यांनी केला.

Web Title bjp offers to ajit pawar as chief minister post says shiv sena mp sanjay raut
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com