शिवसेनेच्या कोंडीची भाजपची रणनीती

शिवसेनेच्या कोंडीची भाजपची रणनीती

मुंबई  : राज्यात शिवसेना-भाजप मध्ये बेबनाव झाल्यानंतर याचे पडसाद मुंबई पालिकेत देखील उमटायला लागले आहेत. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याची रणनीती भाजपने आखली आहे.

याचाच एक भाग म्हणून भाजपने पालिकेतील विरोधीपक्ष नेतेपदावर दावा सांगितल्यानंतर आता आपले स्वीकृत नगरसेवक गणेश खणकर यांच्याजागी आक्रमक भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यापुढे भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून नगरसेवकांना अधिक आक्रमक होण्याचा आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेना आणि भाजपाची युती होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. शिवसेनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षांबरोबर जात महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले. यानंतर भाजपा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झाल्यावर भाजपाने विरोध पक्षात बसणे पसंत केले आहे.

राज्याप्रमाणेच मुंबई महापालिकेतही भाजपाने विरोधी पक्षात बसणे पसंत केले आहे. त्यासाठी भाजपाने काही बदल करत गटनेते पदासाठी विनोद मिश्रा यांची तर विरोधी पक्ष नेते पदासाठी प्रभाकर शिंदे यांची नावे जाहीर करत विरोधीपक्ष नेते पदावर दावा दाखल केला आहे. 

गटनेते आणि विरोधी पक्ष नेते पदासाठी उमेदवारी जाहीर करून भाजपा गप्प बसललेली नाही.यानंतर भाजपाकडून आपले स्वीकृत सदस्य असलेले गणेश खणकर यांचा राजीनामा घेतला असून त्यांच्या जागी प्रवक्ते असलेले भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती केली आहे. भालचंद्र शिरसाट हे अभ्यासू तसेच आक्रमक नेते म्हणून परिचित आहेत. यामुळे येत्या 2022 च्या पालिका निवडणुका डोळ्या समोर घेऊन हे बदल केले गेले आहेत.

भाजपने केलेल्या या बदलानंतर शिवसेनेविरोधात ते आक्रमक होणार हे स्पष्ट झाले आहे. जो पर्यंत भाजप-सेनेची युती होती तोपर्यंत आम्ही महापालिकेत पहारेकरी होतो. त्यावेळी विरोध करण्यास मर्यादा येत होत्या. मात्र, राज्यातली परिस्थिती आता बदलली आहे. त्यामुळे भाजपने अधिक आक्रमक होत विरोधी पक्षाची भूमीका बजावण्याची भूमिका घेतली असल्याचे गणेश खणकर यांनी सांगितले. 

2022 मध्ये मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर बसवण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी पालिकेत काही फेरबदल केले आहेत. माझी भाजपाचा उत्तर मुंबई अध्यक्ष या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांबाबत महत्वाची संघटनात्मक जबाबदारीही मला दिली जाणार आहे, असे भाजपाचे गणेश खणकर यांनी आपला स्वीकृत नगरसेवक पदाचा राजिनामा दिल्यानंतर सांगितले.

भाजपाला शिवसेनाच धोबीपछाड देणार

भाजपाने खणकर यांच्या जागी भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती केली आहे. हा भाजपाचा अंतर्गत मुद्दा आहे. शिवसेना हा पक्षच आक्रमक भूमिका घेणारा आहे. शिवसेनेसारखा आक्रमक पक्ष दुसरा कोणीच होऊ शकत नाही. भाजपाने कितीही बदल केले आणि कोणाचीही नियुक्ती केली तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही.

शिवसेनेसारखी आक्रमक भूमिका कोणी घेऊ शकणार नाही, असा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपाला लगावला आहे. भाजपाला शिवसेनाच धोबीपछाड देऊ शकते. इतर कोणाचे हे काम नाही, हा मक्ता फक्त शिवसेनेकडेच आहे असा पलटवार जाधव यांनी केला.

Web Title bjp trying corner shivsena eying 2022 bmc elections

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com