BLOG - जॉर्ज आपले का वाटायचे? 

संदीप काळे 
मंगळवार, 29 जानेवारी 2019

आज जॉर्ज गेले यावर विश्‍वास बसत नाही. त्यांच्या जाण्याने अनेक सेवाभावी कार्यकर्ते पोरके झाले आहेत. जॉर्ज प्रत्येक कार्यकर्त्यात उत्साह भरणारे फादर होते. त्यांनी सेवाभावी चळवळीत काम करणाऱ्या दोन पिढ्यांवर फुंकर घालण्यासाठी पुढाकार घेतला होता. गावपातळीवरच्या सामान्य कार्यकर्त्याला कामगार चळवळीचा आधारवड बनवीत कित्येक तरुणांना त्यांनी मसीहा करून पुढे आणले. त्यातून त्या कार्यकर्त्याला चिरंतन टिकणारी एक सामाजिक ओळख मिळाली आणि चळवळीला न्यायही.  

आज जॉर्ज गेले यावर विश्‍वास बसत नाही. त्यांच्या जाण्याने अनेक सेवाभावी कार्यकर्ते पोरके झाले आहेत. जॉर्ज प्रत्येक कार्यकर्त्यात उत्साह भरणारे फादर होते. त्यांनी सेवाभावी चळवळीत काम करणाऱ्या दोन पिढ्यांवर फुंकर घालण्यासाठी पुढाकार घेतला होता. गावपातळीवरच्या सामान्य कार्यकर्त्याला कामगार चळवळीचा आधारवड बनवीत कित्येक तरुणांना त्यांनी मसीहा करून पुढे आणले. त्यातून त्या कार्यकर्त्याला चिरंतन टिकणारी एक सामाजिक ओळख मिळाली आणि चळवळीला न्यायही.  

2003 ला मी प्रतिभा निकेतन महाविद्यालयामध्ये बी. ए. तृतीय वर्षामध्ये शिकत होतो. त्याचबरोबर छात्रभारतीच्या चळवळीमध्ये सक्रिय होतो. छात्रभारतीमध्ये सक्रिय असल्यामुळे जिल्ह्यापासून ते राज्य पातळीपर्यंतची सगळी समाजवादी मंडळी संपर्कात होती. त्यांच्यासोबत बैठकीच्या, कामाच्या किंवा आंदोलनाच्या निमित्ताने भेट व्हायची. त्या काळात दोन वर्षं मी छात्रभारतीच्या राज्यावर असलेल्या टीममध्ये काम केलं. अर्थातच माझ्यामध्ये समाजवादी विचारसरणीचा पगडा कायम राहिला. माझ्यावर तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांचा कमालीचा पगडा होता. त्यांची भाषणं मी अनेक वेळा ऐकली होती. नांदेडला त्यांना एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवावं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकदा त्यांच्या विचारांनी प्रफुल्लित करावं, असं मी आणि माझ्यासोबत असलेल्या अनेक तरुणांना वाटायचं. काही केल्या तो योग येत नव्हता, नांदेडला तेव्हा ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांच्याभोवती समाजवादी विचारसरणीचं वारं जोरकसपणे फिरायचं. कारण त्यांच्या नसानसामध्ये समाजवाद भिनला होता.

आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते या समाजवादाला नेहमी लोक चळवळ' बनवायचे. एकूण तब्बल आठ वर्षं माझ्यासारख्या व्यक्तीला सुधाकरराव डोईफोडे यांचा सहवास मिळाला. आपल्या लेखणीने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे, म्हणजेच ते समाजवाद रुजवायचे, असा सर्व कार्यकर्त्यांचा समजच नव्हता; तर अनुभवही होता. सुधाकरराव डोईफोडे यांच्या पासष्टीनिमित्त नागरी सत्कार करायचा, असा मनसुबा समविचारी संघटनांनी आखला. त्यासाठी आम्ही वारंवार मीटिंग्स घेऊ लागलो. त्यांचा सत्कार कुणाच्या हस्ते करायचा यासाठी बरीचशी नावंही पुढे आली. ऍड. शिवाजी शेराढोणकर, दीपनाथ पत्की, पी. डी. जोशी पाटोदेकर, प्रा. राजाराम वटणवार, बंडू खेडकर, दिलीप ठाकूर अशा अनेक जणांनी एकत्रित येऊन या नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला अधिक चांगलं करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आम्हा सगळ्या तरुण मंडळींचा जॉर्ज फर्नांडिस यांना बोलवावं, असा आग्रह होता. जॉर्ज यांना बोलवायचं ठरलं खरं; मात्र कोणाच्या मार्फत बोलवायचं? मराठवाड्यामध्ये जॉर्ज यांच्या जवळचं कोण? असे प्रश्न आले होते. उदगीरचे असलेले रंगा राचुरे आणि जॉर्ज फर्नांडिस यांचं सख्य आहे, हे आम्हा सगळ्यांना माहीत होतं. शिवाजी शेराढोणकर यांनी रंगा राचुरे यांना फोन करून जॉर्ज यांना नांदेडला कार्यक्रमासाठी निमंत्रित करावं, अशी विनंती केली. चार-पाच दिवसांनंतर रंगा राचुरे यांचा होकाराचा निरोप आला आणि आम्ही सगळे जण कामाला लागलो.10 आक्टोबर 2003 ही तारीखही ठरली. सर्वच समविचारी संघटना या कार्यक्रमासाठी आणि जॉर्ज यांच्या स्वागतासाठी उत्सुक होत्याच, पण वेगळा पक्ष, वेगळा विचार असणारेही या कार्यक्रमासाठी उत्सुक होते. त्याचे कारण जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा साधा माणूस संरक्षणमंत्री झाला कसा, याची उत्सुकता होती. शिवाय सुधाकरराव डोईफोडे यांच्या कार्याचा गौरवही करायचा होता. त्यांच्याप्रति भावना व्यक्त करण्याचा 10 आक्टोबर हा दिवस उजाडला. आम्ही सगळे जण अगदी टापटीप होऊन जॉर्ज यांच्या स्वागतासाठी नांदेडच्या गेस्ट हाऊसला येऊन थांबलो, प्रत्येकाच्या भेटीचे शेड्यूल ठरले होते. संघटना-पक्षवाले, वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये काम करणारे दिवसभर जॉर्ज यांना भेटत होते. रंगा राचुरे यांनी आमची सगळ्यांची भेटण्याची व्यवस्था केली होती. आम्ही सगळे छात्रभारती, सेवादल, मराठवाडा जनता विकास परिषदेची काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी जॉर्ज यांना भेटण्यासाठी गेलो. कमालीचा साधेपणा आणि प्रचंड आत्मविश्वास असलेलं हे व्यक्तिमत्त्व आमच्या प्रत्येक प्रश्नाला आपलेपणाने उत्तर देत होते. त्यांनी पक्षीय बांधणी करावी आणि कार्यकर्त्यांची सर्वत्र शिबिरं लावावीत, कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घ्यावं, चांगला कार्यकर्ता पक्षाशी जोडला जावा, लोकांच्या प्राथमिक गरजा सोडवण्यासाठी एक चांगलं काम उभारावं, अशा अनेक सूचना त्या भेटीदरम्यान दिल्या होत्या. माझ्या मनामध्ये जेवढ्या प्रश्नांची भडास होती, ती मी त्या ठिकाणी काढली. प्रत्येक प्रश्नाला साधेपणाने आणि खांद्यावर हात ठेवून उत्तर देण्याची स्टाईल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात घर करून बसली होती. जॉर्ज यांची अनेक भाषणे ऐकली होती, मुंबईच्या बैठकीदरम्यान अनेक वेळा त्यांच्या भेटी झाल्या होत्या. पण त्यांची कमालीची जवळिक आणि आपलेपणाचा अनुभव नांदेडच्या भेटीदरम्यान आला. जाताना त्यांनी बोललेलं एक वाक्‍य माझ्या सतत मनात आहे, "पॉंव जमीनपर रहेंगे तो हम अपनोंको न्याय देंगे।' त्यांना अभिप्रेत असं होतं की, समाजवादी विचारसरणीशी जोडलेले अनेक कार्यकर्ते आज झोकून कार्य करण्यासाठी पुढे येत नाहीत आणि जे झोकून कार्य करतात, त्यांना मागे फिरून बघायला वेळ नाही; त्यामुळे ठरलेला अजेंडा तसाच राहतो. असा सूचक सल्ला त्यांनी यानिमित्त दिला होता. जॉर्ज मला आणि माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याला आपले का वाटत होते, याचे कारण त्यांना प्रत्येकाची काळजी वाटत होती. लोकशाही प्रत्येकाच्या नसानसात भिनावी, हाच त्यांचा आग्रह होता. गावकोसात खितपत पडणाऱ्या प्रत्येकाला समान नागरिकाचा हक्क मिळावा, एवढाच त्यांचा आग्रह होता आणि त्यांच्या साऱ्या अपेक्षा आम्हा तरुण कार्यकर्त्यांकडून होत्या. काही प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन महाराष्ट्राच्या पक्षीय बांधणीसंदर्भातही त्यांनी चर्चा केली होती. मग कार्यक्रमाच्या ठिकाणी जॉर्ज यांचं आगमन झालं. किती साधं व्यक्तिमत्त्व, अशी साधी प्रतिक्रिया प्रत्येकाची होती. खादीचे कपडे, एक भला मोठा चष्मा, खिशाला दोन पेन्स, वरच्या खिशामध्ये चष्म्याचे कव्हर, असे जॉर्ज फर्नांडिस. डोईफोडे यांच्या सत्कारप्रसंगी त्यांनी केलेले भाषणही तेव्हा चर्चेचा विषय बनले. इलेक्‍ट्रॉनिक मीडिया त्या वेळी फारशी नव्हती; पण प्रिंट मीडियाच्या प्रत्येक पत्रकाराला त्या वेळी जॉर्ज यांच्या भाषणाची दखल घ्यावी लागली. माजी कुलगुरू असलेले डॉ. गो. रा, म्हैसेकर, त्यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार असलेले श्रीकांत जोशी, आमदार गंगाधर पटणे, ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांच्या मते या कार्यक्रमाला रंगत आली होती. कॉंग्रेसच्या अभ्यासू नसलेल्या नेत्यांचा आपल्या भाषणातून जॉर्ज यांनी खरपूस समाचार घेतला होता. शवपेटिका व कासकेट  यांच्यामधला फरक माहीत नाही, त्या सोनिया गांधी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या नेत्या कशा बनू शकतात, असा सवालही त्यांनी आपल्या भाषणामधून उपस्थित केला होता. २०१८ पर्यंत भारताने पहिल्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनलं पाहिजे, त्यासाठी आम्ही तरुणांनी काय केलं पाहिजे, याचे अनेक दाखले देत त्यांनी देशाच्या विकासाचा मोठा आराखडा समोर ठेवला होता. जॉर्ज सगळ्यांना भेटले आणि त्याच दिवशी त्यांनी नांदेड सोडलं. ते नांदेडहून गेले; पण आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात घर करून गेले. त्या वेळी अनेक नवीन तरुण मुलं जॉर्ज यांचे फॅन बनून गेले. नेता असावा तर असा, याचं उदाहरण म्हणून जॉर्ज यांच्याकडे पाहिलं जात होतं. पुढे अनेक वेळा जॉर्जशी भेटण्याचा योग आला. त्या भेटीमध्येही त्यांनी आपलेपणाची ओळख कायम ठेवली होती. 

आज सकाळी जॉर्ज गेल्याची बातमी आली आणि जुने सगळे दिवस आठवले. सकाळपासून मी बऱ्याच जुन्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो. त्यात काही छात्रभारतीचे होते, काही सेवादलाचे होते. चर्चा एकच होती. जॉर्ज तुम्हा-आम्हाला आपले कसे वाटायचे. जॉर्ज यांच्यामागे प्रॉपर्टी नावाचा संबंध नाही. २००९ ला त्यांनी अखेरची निवडणूक लढवली होती आणि आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दहा कोटी एवढी रक्कम दाखवली होती. दिल्लीमध्ये असलेलं त्यांच्या बायकोच्या नावावर असलेलं घर, त्याची किंमत दोन कोटी पन्नास लाख होती. म्हणजे एकूण बारा कोटीच्या आतमध्ये असलेला हा नेता वैचारिक धनाची मात्र पेटी होता. अनेक कार्यकर्ते घडवणे, कार्यकर्त्यांना शिस्तीत उभे करणे आणि त्यांच्या माध्यमातून लोकशाही मजबूत करणे, घटनेच्या तत्त्वाचं तंतोतंत पालन करणे एवढं मोठं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. बिहारमधील मुजफ्फरपूरमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ते या काळात अटलबिहारी यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते. रेल्वेमंत्री, दूरसंचारमंत्री, उद्योगमंत्री अशा अनेक भूमिकाही त्यांनी पार पाडल्या होत्या. देशातील कामगार चळवळीला वाहून घेतलेला हा नेता, प्रत्येक कामगारालाही आपला वाटायचा. सर्वसामान्य मजुरांचे प्रश्न सोडवण्यसाठी ६१ वेळा त्यांनी तुरुंगवास भोगलाय. कितीतरी आंदोलने त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर केली होती. देशातल्या प्रत्येकाला हवाहवासा हा नेता आज आपल्यामध्ये नाही; पण त्यांचे विचार मात्र रोजच्या घडामोडीत आपलं थोडंही योगदान देणाऱ्या प्रत्येकाच्या मनात रुजलेला आहे. लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर या नेत्याच्या विचारांची अंमलबजावणी झालीच पाहिजे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live