हेल्मेट, पगडी आणि पुण्याचे पाणी 

सम्राट फडणीस
शनिवार, 12 जानेवारी 2019

हेल्मेट असो, पगडी असो किंवा पुण्याचे पाणी... पुणेकरांच्या मनात या विषयांवर रोजच प्रश्न असतात. पाच वर्षांतून एकदा या प्रश्नांची उत्तरेही ते शोधतात. त्यामुळे, आजच्या प्रश्नांवर भूमिका घेताना राजकीय दूरदृष्टी ठेवली पाहिजे आणि नेमका त्याचाच अभाव दिसतो आहे. 

हेल्मेट असो, पगडी असो किंवा पुण्याचे पाणी... पुणेकरांच्या मनात या विषयांवर रोजच प्रश्न असतात. पाच वर्षांतून एकदा या प्रश्नांची उत्तरेही ते शोधतात. त्यामुळे, आजच्या प्रश्नांवर भूमिका घेताना राजकीय दूरदृष्टी ठेवली पाहिजे आणि नेमका त्याचाच अभाव दिसतो आहे. 

डोके वापरून सोडविण्याचे तीन विषय पुणे शहरात सध्या चर्चेत आहेत. हेल्मेट, पगडी आणि पाणी. तिन्ही विषयांवर समाजातल्या कर्त्या-धर्त्या सामाजिक, राजकीय धुरीणांनी भूमिका घेताना डोके वापरण्याची नितांत आवश्‍यकता आहे. दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेट घालू नये म्हणून पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले राजकीय कार्यकर्ते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवीदान समारंभात पाहुण्यांच्या डोक्‍यावर महात्मा जोतिराव फुलेंच्या विचाराचे प्रतीक असलेली पगडी चढवावी की पुणेरी म्हणून प्रसिद्ध असलेली पगडी आणि पुण्याला नेमके किती पाणी द्यावे, या तिन्ही विषयांवरच्या भूमिकांमध्ये तात्कालिक कुरघोडीचा, आततायीपणाचा प्रभाव आहे. पुणेकरांच्या रोजच्या प्रश्नांबद्दल उदासीनता आहे. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची घाई पुणेकरांना समजते आहे. 

बेशिस्तीचे उदात्तीकरण 
दुचाकीवरून प्रवास करताना अपघातापासून सुरक्षितता म्हणून हेल्मेट वापरावे, हा सर्वसाधारण आग्रह. त्यासाठी कायदा करावा लागणे ही आपल्या देशाची व्यवस्था. अगदी संकुचित दृष्टीने फक्त शहराचा विचार केला, तरी पटेल की या महानगरात एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला जाताना दुचाकीवर जीव सुरक्षित नाही. अपघात होतात आणि अपंगत्व, मृत्यू येतो. व्यक्ती, त्याचे/तिचे कुटुंब उद्‌ध्वस्त होते. या साऱ्याचा परिणाम शहराच्या सामाजिक, आर्थिक आरोग्यावर होतो. त्यामुळे हेल्मेट वापरा, असे नागरिकांना सांगण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागणे हेच मुळात आपले अपयश. त्याहीपेक्षा मोठे अपयश म्हणजे, रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांच्या कारवाईविरोधात आंदोलन करणारे कार्यकर्ते. कुणी रास्ता रोको केला. कुणी हेल्मेटचा दशक्रिया विधी केला. माध्यमांमध्ये फोटो-व्हिडिओ झळकल्याने कार्यकर्त्यांचा जीव सुखावला. "नागरिकांच्या प्रश्नावर घेतलेली भूमिका', म्हणून उद्या कुठल्या तरी निवडणुकीत एखादा कार्यकर्ता हे आंदोलन अहवालात छापेलही. ज्याच्या घरातली व्यक्ती दुचाकी अपघातात दगावली आहे, ज्याला दुचाकी अपघातात अपंगत्व आलेले आहे, त्याच्या दृष्टिकोनातून ही आंदोलने पाहिली तर चाललेला प्रकार "स्मार्ट' नाही, हे नक्की. हेल्मेट वापरले पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नसताना "आधी रस्ते करा... खड्डे भरा...', वगैरे मागण्या सुरू आहेत. जीवावर बेतणाऱ्या बेशिस्तीचे उदात्तीकरण सुरू आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष हिरिरीने उतरले आहेत. पुण्यासाठी हे चांगले नाही. 

विचार सलामत तर पगडी पचास 
असाच प्रकार पगडी प्रकरणाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चर्चेमध्ये आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारून फुले पगडीचा आग्रह धरल्यापासून पगड्यांवरून ध्रुवीकरण सुरू आहे. पवार जाता जाता कधी टिप्पणी करत नाहीत. अनेकदा ते भूमिका टिप्पणी स्वरूपात मांडतात. टिप्पणी असल्याने प्रतिक्रिया आजमावता येतात आणि गरज पडेल, तशी सुधारित भूमिका मांडता येते. फुले पगडीचा आग्रह त्यांनी धरल्यानंतर अचानक पगडी या प्रतिकाला अनन्यसाधारण महत्व आले. "ते फुले पगडी मागतात, तर आम्ही पुणेरी पगडीच मागणार,' अशी ध्रुवीकरणाची भूमिका समोर आली. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पुणे शहराचे प्रतीक म्हणून पाहुण्यांचा सन्मान म्हणून त्यांच्या डोक्‍यावर पुणेरी पगडी चढवली जाते. ती पगडी फुले पगडी असावी की पुणेरी असा ताजा वाद आहे. प्रतीके उभी करणे, त्यांच्याभोवती वलय निर्माण करणे आणि त्या वलयातून प्रतीके अधिकाधिक घट्ट करत नेणे असे काम समाजात सुरू असते. सारेच आज प्रतीकांमध्ये इतके गुरफटले आहेत, की पगडीखाली डोके आहे याचाही विसर पडतो आहे. पदवीदान समारंभ उद्याच्या विद्वानांना शाबासकी देण्यासाठी असतो, याबद्दल बोलले पाहिजे. विद्यापीठात पाहुण्यांचा सन्मान पुणेरी पगड्यांनीच होतो, हे कोणी ठरवले, हा प्रश्नही विचारला पाहिजे. 

गळती, टॅंकर लॉबीबद्दल बोला! 
पुण्याला नेमके किती पाणी हवे, यावरून होणारी चर्चा, आंदोलने आणि टीका-टीप्पणीही अशीच टोकाची आहे. येत्या सहा महिन्यांत पाणीटंचाई वाढेल. अशा वेळी पाणी जपून वापरण्याचा संदेश द्यायलाच हवा. मात्र, लोकानुनय करणाऱ्या 'पुण्याला पुरेसे पाणी मिळालेच पाहिजे,' अशा घोषणा राजकीय नेत्यांना सोयीच्या वाटतात. पाणी पुरेसे म्हणजे किती याचे काही निकष आहेत. ते निकष कधी तपासणार? कागदोपत्री अधिकचे पाणी मिळत असेल, तर टंचाई का? गळतीवर वर्षानुवर्षे कुणी टॅंकर लॉबी पोसली? पुणेकरांच्या मनात रोजच हे प्रश्न पडतात. पाच वर्षांतून एकदा ही उत्तरे नागरिक शोधतातच. त्यामुळे, आज याबद्दलची भूमिका घेताना दूरदृष्टी ठेवलीच पाहिजे. पाणी कमी नाही; गळती-चोरी अधिक आहे, हे मान्य केले पाहिजे आणि ते रोखण्यासाठी काम केले पाहिजे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live