BLOG - महाराजांचा जयघोष.. बळीराजाचा आक्रोश

वृषाली यादव
बुधवार, 6 जून 2018

शिवरायाचे आठवावे रुप..
शिवरायांचा आठवावा प्रताप..

शिवरायाचे आठवावे रुप..
शिवरायांचा आठवावा प्रताप..

अष्टावधानी  सामाजिक, राजकीय दूरदृष्टी, रयतेच्या केसालाही धक्का लागू न देणारा, गरिबांचा वाली.. व्यक्तीमत्व असं की शत्रूलाही १० नव्हे १० हजार वेळा विचार करायला लावणारं.. अशा माझ्या राजाच्या शिवराज्याभिषेकाला आज ३४५ वर्ष पूर्ण झाली. रायगडावर आज अभूतपूर्व सोहळा.. हातात भगवा घेऊन ढोल ताशाच्या गजरात राजाच्या नावाने आसमंत दुमदुमला.. पावसापाण्याची तमा न बाळगता..हा सोहळा अनुभवण्यासाठी, सहभागासाठी शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहिला. छत्रपतींच्या वंशजांनी रायगडाच्या पायथ्याशी प्रति रायगड उभारणीची घोषणाही केली.. उत्साह, आनंद असावाच कारण माझ्या राजाचा आज शिवराज्याभिषेक सोहळा.. पण, आज जर छत्रपती असते तर?????

अस्मानी, सुल्तानी संकटात पिचलेल्या बळीराजाची अवस्था त्याकाळी त्यादिवशी अशी असती तर राजाने सोहळा साजरा केला असता? कदाचित तुम्हाला असं वाटेल की वृषाली आज उगाचंच दोन ‘विषय’ एकत्र करुन शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतेय. मात्र खरं सांगते.. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतो.. त्या राजाच्या नावाचं फक्त राजकारण होतानाच दिसतंय. स्वराज्याची निर्मिती हे शिवाजी महाराजांपुढचं मोठं आव्हान, त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले, एका हाताने मुत्सद्देगिरीने शत्रूवर वार केले तर दुसऱ्या हाताने अन्नदात्याच्या शेतातल्या तणालाही हात न लावता त्याला स्वाभिमानाने उभं राहायला शिकवलं. म्हणतात ना..कोणतंही युद्ध उपाशीपोटी कुणी जिंकू शकत नाही. जर शेतात राबणारा जगला तरंच माणूस जगेल, तरंच राज्यकर्ते जगतील आणि तरंच साम्राज्य उभं राहू शकेल.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची व्यवथा, देशव्यापी संपाबाबत माझी भूमिका मांडण्याचा विचार करत होते. रोज लाईव्ह बुलेटीन करत असताना बळीराजाचा एल्गार म्हणून आम्ही माध्यमं फक्त बातम्या देतोय. शेतकऱ्यांचा राज्यभरातला संप कव्हर करतोय. शेतकऱ्यांचा संताप कॅमेरासमोर आणण्याचा, त्यांची संतापजनक नजर, डोळ्यातले अश्रू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण, फक्त प्रयत्न..

१ जून २०१७.. शेतकऱ्याने अभूतपूर्व राज्यव्यापी संप केला. शिवारातला शांत शेतकरी काय करणार असं म्हणत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र याच शेतकऱ्याने एकी दाखवत प्रस्थापितांचे धाबे दणाणून सोडले. शेतमाल, दूध रस्त्यावर फेकलं. जो दुसऱ्याचं पोट भरतो तो रस्त्यावर अन्नाची नासाडी करणारच नाही, हा स्पॉन्सर्ड संप म्हणत शेतकऱ्याच्या संपावर बोट ठेवलं गेलं.  त्यावेळी प्रमुख मागण्या होत्या संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मालाला योग्य हमीभाव द्यावा. शेतकरी संपावर गेला.. रस्त्यावर उतरला, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बोलणीसाठी.. माफ करा सरकारसोबत बैठकीसाठी गेले. सरकारने मागण्या मान्य केल्याचं, संप मागे घेतल्याचं काही प्रतिनिधींनी सांगितलं. तर काही म्हणाले..संप मागे घेणार नाही. शेतकरी संपात फूट पडली. सर्वच बिथरले. त्यात मग सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करत असल्याचं जाहीर केलं. तत्वतः कर्जमाफीची अंमलबजावणी कुठल्या टप्प्यापर्यंत पोहोचलीय, याचा फक्त आकड्यांचा खेळच सुरु आहे. सरकारी योजना ही बाबू लोकांच्या अनास्थेमुळे अडकल्याचंही पाहायला मिळतंय. मात्र या बाबूंवर कारवाई झाली का? उत्तर मिळणं कठीणच आहे. कारण उत्तराची अपेक्षा ज्यांच्याकडून तेच बाबूंवर अवलंबून.. सर्व काही राम भरोसेच.. 

हे झालं मागच्या वर्षीचं.. ३६५ दिवस झाले.. काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याची बोळवण होऊन... चित्र बदललंय? नाही.. संपूर्ण कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आजही बळीराजा आहे. शेतीमालाला हमीभाव केव्हा मिळेल, हे ही अनुत्तीर्णच.. आणि रोज होणाऱ्या आत्महत्या.. हे ही थांबलेलं नाही. पुन्हा एकदा १ जून २०१८ ला शेतकऱ्याने देशव्यापी संप पुकारला. आता फक्त महाराष्ट्रातलेच नव्हे देशातले २२ राज्यातले शेतकरी संपावर गेले. मात्र अजून तरी सरकारी प्रतिक्रिया काही आलेली नाही. माफ करा.. २ प्रतिक्रिया आल्या..अगदी कडक...केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची..  महाशय म्हणालेत..शेतकऱ्यांचे संप हा पब्लिसिटी स्टंट.. खट्टर साहेबांनीही  अगदी कडू प्रतिक्रिया दिली. हे आपलं संवेदनशील सरकार. 

ज्यांच्या जीवावर जगायचं त्यांनाच भिकाऱ्याची वागणूक देण्यासारखंच हे म्हणावं लागेल. १ जूनला राज्यात संप सुरु झाल्यावरही रस्त्यावर संताप व्यक्त करत असताना, काही शेतकरी बांधवांनी जीवन संपवलं. उस्मानाबादमधल्या निपाणीतले आडत व्यापारी दादाराव गुंड यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून आत्महत्या केली. सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत गळफास घेऊनच त्यांनी जीवन संपवलं. हिंगोलीतला तरुण शेतकरी नारायण जाधवने बँकेतल्या अडीच लाखाच्या कर्जाच्या डोंगरापायी ३ गोड मुलांना वाऱ्यावर सोडत आयुष्य संपवलं. परभणीत तुकाराम रसाळ यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. एक नव्हे अनेक शेतकरी दररोज आपलं आयुष्य संपवतायत. सरकारी आकड्यांमध्ये भर पडतेय. (जर प्रामाणिकपणे नोंदी केल्या असतील तर) मात्र असंख्य कुटुंब रस्त्यावर येतायत, त्यांना वाली कोण? कोणी झाडाच्या सुकलेल्या पानावर आत्महत्या करत असल्याचं लिहितं तर कुणी सरणावर आपला देह ठेवतोय. महाराजांचं नाव घेणाऱ्यांच्या सत्तेत अन्नदात्याची ही व्यथा ही कुणालाच दिसत नाही?  आपले प्रश्न केव्हा सुटणार याचा जाब विचारण्यासाठी अख्खं गाव मैलोनमैल चालून मुंबई गाठतं, त्यावेळी रक्तबंबाळ झालेले पाय कुणालाच दिसत नाहीत? उन्हात, सोसाट्याच्या वाऱ्यात राबणारा शेतकरी काँक्रिटच्या जंगलात येतो त्यावेळी परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून दमलेल्या शरिराने रात्रीत मंत्रालय गाठतो.. ती त्याची सरळता, विनम्रता, माणुसकी कुणालाच दिसत नाही? अंगावर फाटके कपडे, रापलेलं शरीर, एक वेळची भाकरी विठोबाचं नाव घेत खाणाऱ्या शेतकऱ्याचं कुटुंब सुखी, संपन्न केव्हा होणार? माल्ल्या, मोदीसारखे हजारो कोटींचा गंडा घालून बँकांना लुटून परदेशात जातात, त्यांना पुन्हा भारतात आणणं हे आपल्या सरकारपुढचं आव्हान, मात्र काही हजारांचं कर्ज फेडता येत नाही म्हणून  आत्महत्या केलेल्या स्वाभिमानी शेतकऱ्याच्या दारात बँकवाले उभे राहतात, त्यावेळी बँकांना फटकारणं हे ही आव्हान?
           
आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी आपला माल रस्त्यावर टाकला. कुटुंबासोबत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. शहराकडे जाणारी रसद रोखण्याचा पवित्रा घेतला.. काय चुकलं त्यांचं? त्यांनी कष्टाने पिकवलं त्यांना नाही ते द्यायचं, पोशिंदा म्हणून वावरणारा शेतकरी स्वार्थी झाला तर राजकीय नेत्यांना का काटे टोचावेत? शेतकऱ्यांना सल्ल्याची नाही..तर साथ देऊ उभारलेली वज्रमुठ अधिक बळकट करण्याची गरज नव्हे तर आपली जबाबदारी आहे.

आज माझा राजा असता शेतकऱ्यांना ताटकळत नव्हे तर त्यांना ताटकळत ठेवणाऱ्यांचा शिरच्छेदच केला असता. अन्नदात्याला न्याय दिला असता..महाराजांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांच्या कार्यशैलीवर किमान चालणाऱ्यांचा गौरव केला असता.. महाराजांच्या नावाचं राजकारण करण्यापेक्षा त्यांनी उभं केलेलं गडांचं साम्राज्य जरी जपलं, तळागाळातल्यांचे अश्रू पुसून त्यांना आश्वासनं न देता न्याय दिला आणि राजाचा जयघोष करताना, बळीराजाचा आक्रोश प्रत्येकाचा मानला ना.. तर हा खरा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल
 


संबंधित बातम्या

Saam TV Live