‘ती’ सार्वजनिक मालमत्ताच!

‘ती’ सार्वजनिक मालमत्ताच!

घुसमट वाढतेय. दिवसेंदिवस मन अस्वस्थ होत चाललंय. प्रश्नांचा गोतावळा झालाय. बाईचं शरीर म्हणजे फक्त उपभोगाचं साहित्य झालंय, असं घडणाऱ्या घटनांवरुन तरी दिसतंय. ही माझी आई, ही माझी बहिण, ही माझी मुलगी, ही माझी वहिनी, ही माझी आजी... जे माझं त्याचीच जबाबदारी माझी.. जे दुसऱ्याचं ते सार्वजनिक, कोणीही या ओरबाडून जा..रक्ताचं नातंही कोवळा जीव कुस्करतंय, हीच विकृती वाढतेय. अल्पवयीन मुली, महिला, आजी इतकंच नव्हे तर ४ महिन्याचं बाळही सुरक्षित नसावं? का? ही तिचीच चूक ती मुलगी म्हणून जन्माला आली. वासनांधांच्या जगात तिने पाऊल ठेवलंय.

कठुआ, उन्नाव,सुरत.. या ठिकाणी माझ्या बहिणींवर झालेल्या अत्याचारांनी पुन्हा दाखवून दिलं की देश बदल रहा है. पूर्वी हे घडत नव्हतं?  घडत होतं ना.. पण, आता फरक एवढाच आहे की सोशल मिडियावर शब्दांच्या माध्यमातून फक्त अभिव्यक्त होता येतंय. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की जेवढे जागरुक, ऍक्टिव्ह आपण सोशल मिडियावर आहोत..तिकताच ऍक्टिव्हनेस आपण आजूबाजूला घडत असलेल्या इतकंच कशाला तर घरात काही घडलं तर आहोत का? वासनांध, नराधम हे काही आकाशातून टपकलेले नाहीत ते आहेत आपल्याच भोवती. उगाच लांबण मला लावायची नाही. बलात्कारावरच्या असंवेदनशीलपणाने खरंच अस्वस्थ केलंय.

सुट्टीचा दिवस होता.. घरीच होते.. ट्विटरवर काय चाललंय पाहण्यासाठी लॉग इन केलं. एका हिंदी चॅनेलच्या ट्विटर हँडलवर एक स्टोरी पाहिली.. सुरुवातच आक्रोशाने.. घटना उन्नावमधली...एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. बलात्कार केला तो भाजपच्या आमदाराने, त्याच्या भावाने, त्याच्या गुंडांनी.. पीडितेच्या बापाने न्याय मागण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनाच चोरीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत मार मार मारलं. जीव गेला. मुलगीच ती.. काय करणार? आमची सत्ता.. आम्ही तर आमदार.. कोण आमचं काय बिघाडणार? पण हा माज उतरवला तो मिडियाने.. एरवी कुणी कितीही आम्हाला शिव्या घालोत. तुम्ही विकलेले.. नोटा फेकल्या की कामं करता.. पण त्या आमदाराची मस्ती मिडियानेच उतरवली.  त्या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया ऐकल्या होत्या. मुलगी ही धनाची पेटी नव्हे, तर मुलगी ही सार्वजनिक पेटी.. हीच चीड आणणारी भावना मनात आली.

उन्नावने हादरुन सोडलेलं असताना कठुआत बलात्कार होतो. ८ वर्षाच्या मुलीवर मंदिरात बलात्कार.. खाकी वर्दीने नग्न होऊन नग्न केलं. बलात्कार करणारे हिंदू...पीडित होती मुसलमान.. मग काय.. वातावरण पेटलं, धुमसलं. मोर्चे निघाले. मुस्लिम बांधवांच्या भावना जागल्या. आमच्या धर्मातल्या मुलीवर बलात्कार.. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आम्हाला न्याय हवा.. ठिकठिकाणी पोस्टर्स लागले. सोशल मिडियावर बाहेरच्या देशातल्या विमानतळांवर काहींनी घातलेल्या टी शर्ट्सवर पीडितेचं नाव.. तिला न्याय हवाच.. भारतात जाऊ नका.. तिथे महिला मुली सुरक्षित नाहीत.. असे पिक्स पोस्ट केले गेले. दरम्यान पंतप्रधान मोदींचा लंडन दौरा होता. तिथल्या एका व्हॅनवर मोदींविरोधी वक्तव्य आणि चिमुरडीचा फोटो, तिला न्याय हवाच, असं पोस्टर होतं. हे ही सोशल मिडियावर पाहिलं. चिमुरडीवर बलात्कार झाला पण, २ समाजांनी तिच्या अब्रूचे काढलेले धिंडवडे हे आजही आपल्या मानसिकतेचं नग्न सत्य दर्शवतं. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जात पात, धर्म या पलिकडे आपण जातच नाही आहोत. तिथलं सरकार गप्प का बसलं?  मुफ्ती बाईंचं तोंड कुणी शिवलं होतं. भागीदारीत सत्ता उपभोगत असलेल्या भाजपाने आवाज का नाही उठवला? जागे झाले खरे.. मात्र उशिराने तो पर्यंत हिंदू, मुसलमान, टीव्हीवर चर्चा, सोशल मिडियावर शिव्यांचा वर्षाव सारं काही झाल्यावर..

सन्मान द्या.. सन्मान घ्या.. हेच खरं हिंदुत्व.. हाच खरा धर्म.. होय मी हिंदू..अभिमान आहे याचा. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेलं राजकारण जगाच्या पुस्तकात हिंदूंचं नाव बदनाम करतंय.

ऍड. दिपिका एस. राजावत.. कठुआतल्या माझ्या मुलीवर बलात्कार झाला तिच्यासाठी उभी राहिली. पण ती एक महिलाच ना.. सार्वजनिक प्रॉपर्टी.. मग तिलाही या खटल्यातून माघार घेण्यासाठी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तीनेही जिद्दीनं म्हटलं की हा खटला मीच लढणार.. माझं काहीही होवो.. मी तयार आहे. कदाचित तिचं हे निर्भिड बोलणं काहींना बोचलं असावं. मग सोशिल मिडिया आहेच की.. ती काय करते, कुणाशी संबंध आहेत हे सांगण्यासाठी.. जेएनयूमध्ये भारताचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या ग्रुपमधली ती.. फक्त सरकारच्या बदनामीसाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ओरडतेय... एक नव्हे अनेक मुद्दे मांडले गेले.. सोशल मिडियावर..  पोस्ट करणाऱ्यांनाही लाज नाही वाटली. आपल्या घरातल्या चिमुरडीचे लचके तोडले गेले असते. आणि आपल्या वकिलावर अशी चिकलफेक झाली असती.. तर स्वस्थ बसला असता? फक्त सामाजिक भानाचाच मुद्दा नाही हो.. न्याय मिळवण्यासाठी कँडल मार्च काढले जातात. निषेध मोर्चे निघतात. मग ज्यावेळी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळी त्यांची थोबाडं गप्प करण्यासाठी वज्रमुठ का नाही उगारत आपण? का मोर्चे निघत नाहीत. का बुरखा घालून कुणी रस्त्यावर उतरत नाही. का कुणी चेहऱ्यावर पदर झाकलेल्या उतरत नाहीत. या प्रश्नांचं एकच उत्तर.. ती माझ्या घरातली कुठे? ती सार्वजनिक प्रॉपर्टी ना..दुसऱ्या घरातली.. महिलाच महिलेची शत्रू.. हे अगदी खरं आहे बुवा !

खरंच आपलं घर तरी सुरक्षित आहे का?  सुरतमध्ये तर ४ महिन्याच्या मुलीवर नातेवाईकानेच बलात्कार केला. कोवळं जीव.. काय अवस्था झाली असेल तिची.. गजबजलेल्या परिसरात तिच्यावर बलात्कार झाला. मुलीच्या किंकाळ्या कुणीच ऐकल्या नसाव्यात. घरातले झोपले होते? आपल्याच घरातला माणूस आपल्याच घरात येऊन आपल्याच मुलीचे लचके तोडून जीव घेतो. हा अंधविश्वासच म्हणायला हवा.

चलता है, अपने को क्या करना है हाच आविर्भाव होत चाललाय. ज्यांच्याकडे शासन चालवायची जबाबदारी त्यांच्यापैकी काहींच्या तोंडची असंवेदनशील वाक्य म्हणजे याचीच प्रचिती देतं. भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्या स्मृती इराणी बलात्काराच्या वाढत्या प्रकरणांवरुन गप्प.. हेमा मालिनी..सौंदर्यवती मात्र कुरुप विचार.. गेल्या ३ वर्षातल्या घडलेल्या बलात्काराच्या घटना जाणूनबुजून दाखवल्या जातायत, ही भाषा.. तर बडे देशों में एक दो रेप होते है..हे गलिच्छ विचार मांडले..केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी.  या महाशयांची तोंडं लागलीच का गप्प केली जात नाहीत?

बलात्काराच्या वाढत्या घटना पाहता केंद्राने खूप चांगला निर्णय घेतला, पॉक्सो कायद्यातल्या बदलासंदर्भात.. १२ वर्षाखालील मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीच.. स्वागतच. मात्र, फाशी देऊन तो मुक्तच होईल. ज्या यातना त्या मुलीला सहन कराव्या लागतात. त्याच यातना लिंगविच्छेदनातून त्यालाही मिळायला हव्यात. एकदा का लिंग कापलं की उत्तेजित होण्यासाठी काहीही शिल्लक राहणार नाही. तीच त्याची खरी शिक्षा राहिल. नपुंसक म्हणूनच आयुष्य काढावं लागेल.

दिल्लीतली निर्भया असो किंवा महाराष्ट्रातल्या कोपर्डीतली निर्भया.. उन्नावमधली रणरागिणी असो वा कठुआतली नाजूक कळी..  मुलीकडे फक्त उपभोगाचं माध्यम म्हणूनच पाहिलं जातं. काही मिनिटांची राक्षसी भूक मिटवण्यासाठी जीवंत मुलीचे जनावराप्रमाणे लचके तोडले जातात. आपल्या न्यायव्यवस्थेचा आदरच.. मात्र माफ करा.. छोट्या तोंडी मोठा घास.. अगदी जबाबदारीने म्हणतेय की माध्यमांचा दबाव वाढल्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटले गेल्यावर पीडितेला न्याय मिळतो. नाही तर न्यायाच्या प्रतिक्षेत आयुष्य जातं. जीव जातो.. तरीही न्यायाची फक्त प्रतिक्षाच!  सार्वजनिक मालमत्ता हा शब्द वापरणंही जड जातं. कारण सार्वजनिक मालमत्ता आपल्या सर्वांच्या, समाजाच्या मालकीची, सुविधेची असते. आपण तिची काळजी घेणं अभिप्रेत असतं. मात्र आपल्या देशात काही अपप्रवृत्ती सार्वजनिक मालमत्ता ही वाट्टेल तसा वापर करुन पुन्हा तिची नासधूनस करण्यासाठीच असं समजतात. दुर्दैवाने स्त्रियांना सार्वजनिक मालमत्ता समजणारे नराधम त्यांच्याही पुढचे!

सामूहिक बलात्कार आपल्या देशात होतच राहतात. नाही का? माझ्या घरातली नाही ना.. दुसऱ्याच्या घरातली.. मग जाऊ दे.. ही मानसिकता नव्हे तर हीच विकृती म्हणायला हवी. ज्यांना निवडून दिलं त्यांच्या तोंडी असंवेदनशील वक्तव्य निघाली तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारच टाकायला हवा. जेणेकरुन मतांची झोळी मागायला पुन्हा दरवाजात उभे राहता कामा नयेत. सरकार कुणाचंही असो.. आया बहिणींची अब्रू शाब्दिक माऱ्यातून पुन्हा लुटण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं सामर्थ्य आहे ना आपल्याकडे.. मतदानाचं..

सामाजिक, राजकीय भान म्हणण्यापेक्षा मी, माझं.. या पणातच आपण जगतोय. आपलं असं केव्हा म्हणणार.. रस्त्यावरुन जाणाऱ्या मुलीला आयटम म्हणून न पाहता... एक मुलगी, माझ्या घरातली सदस्य म्हणून केव्हा पाहणार? बलात्कार होत होते, होतायत पण केव्हा थांबणार? उत्तर एकच.. ज्यावेळी एक महिला दुसरीला इर्ष्येच्या नजरेनं नाही तर आपुलकीने पाहिल आणि पुरुषी मानसिकता तिला सार्वजनिक प्रॉपर्टी म्हणून समजणार नाही, त्याचवेळी कदाचित मुलगी स्वच्छंद आकाशात झेपावून मोकळा श्वास घेऊ शकेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com