आगामी वर्षात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार

आगामी वर्षात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार

भेंडवळ (बुलडाणा) : संपुर्ण शेतकरी जगताचे लक्ष लागलेल्या भेंडवळ घटमांडणीचे अंदाज बुधवारी (ता. 8) पहाटे वर्तविण्यात आले असून ज्वारी, बाजरी, तुर या पिकांचे चांगले वर्ष दर्शविले आहे. येत्या वर्षातही चारा-पाण्याची वाढू शकते. देशात घुसखोरीच्या घटना वाढणार असून आर्थिक क्षेत्रात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. देशाचा राजा कायम राहण्याचे संकेतही वर्तविण्यात आले.

अक्षय तृतियेला बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ (ता. जळगाव जामोद) येथे झालेल्या घटमांडणीचे बुधवारी (ता. आठ) सुर्योदयी अंदाज वर्तविण्यात आले.  या घटमांडणीला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी या घटमांडणीत धान्याच्या राशी, पाण्याचा करवा व इतर साहित्याच्या आधारे  पीक, पाऊस, नैसर्गिक आपत्ती तसेच राजकीय भाकीत वर्तविण्यात येते. या घटमांडणीची सुरुवात करणारे चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ यांनी घटाची पाहणी केली. त्यांना शारंगधर महाराज वाघ यांनी सहाय्य केले. यानंतर दोघांनी मांडणीचे विश्लेषण केले. 

राजा कायम?
देशाच्या राजकीय घडामोडींबाबतही मांडणीत विश्लेषण करण्यात आले. पानविडा हा देशाच्या राजाचे प्रतिक म्हणून या घटात ठेवलेला असतो. पानविडा कायम असल्याने राजा कायम राहील असे संकेत देण्यात आले. मात्र याबाबत विश्लेषकांनी अधिक भाष्य करणे टाळले. देशाला याहीवर्षात घुसखोरीच्या घटनांना सामोरे जावे लागू शकते. मात्र देशाची संरक्षण यंत्रणा त्यांचा सक्षमपणे सामना करतील. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असेही सांगण्यात आले. 

पिक परिस्थिती सामान्य
घटमांडणीच्या अंदाजानुसार येत्या हंगामात तुरीचे तसेच ज्वारी, बाजरीचे पीक चांगले येईल. तुरीच्या तसेच बाजरीच्या दरात तेजी राहू शकते. ज्वारीचे दर सामान्य राहतील. कापूस, मूग, उडीद, तीळ, धान, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडई ही पिके सामान्य स्वरुपाची दर्शविण्यात आली.पिकांचे उत्पादन सामान्य राहतानाच बाजारभावही तसेच सामान्य राहू शकतात. 

जुलैत सर्वाधिक पाऊस
घटमांडणीत ठेवलेल्या मातीची ढेकळे व करव्यातील पाण्याचे निरीक्षण केल्यानंतर पावसाचा अंदाज देण्यात आला. यावर्षी जून महिन्यात साधारण स्वरुपाचा पाऊस राहील. यामुळे पेरणीला विलंब लागू शकतो. मात्र जुलैमध्ये चांगला व सार्वत्रिक पाऊस होईल. ऑगस्टमध्ये जुलैच्या तुलनेत पाऊस कमी राहील. पावसाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लहरी स्वरुपाचा पाऊस दर्शविण्यात आला. 

नैसर्गिक आपत्तींचे वर्ष
घटमांडणीत ठेवलेली पुरी गायब झालेली दिसून आली. त्यामुळे यावर्षात नैसर्गिक आपत्तींचे संकेत मांडणीतून देण्यात आले. पाऊस, भूकंप यामुळे मोठे नुकसान देशाला भोगावे लागू शकतात. मांडणीतील करंजी फुटून सर्वत्र विखुरली होती. हा आर्थिक अडचणींचा संकेत असल्याचे सांगण्यात आले.

अशी होती घटमांडणी
भेंडवळ गावाशेजारी एका शेतात मोठा खड्डा करण्यात आला होता. या खड्ड्यात चार मातीचे मोठी ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेला करवा ठेवला होता.  त्यावर करंजी, पुरी, पापड, वडा, भजा ठेवला होता. खड्ड्याच्या वर्तुळाकार अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, सरकी, हिवाळी मूग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसूर, हरभरा, वाटाणा, भादली अशी धान्ये ठेवण्यात आली होती. पृथ्वीच्या प्रतिकात्मक स्वरुपात पुरी, समुद्राचे प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाचे प्रतिक म्हणून मातीची ढेकळे, वडा, पानसुपारी यांची मांडणी केली होती.

Web Title: coming year is great for jowar and bajara

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com