चाकणमध्ये मराठा आंदोलनाचा भडका; 100 वाहनांची जाळपोळ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाला आज (सोमवार) हिंसक वळण लागल्यामुळे चाकण परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांसह मालवाहू ट्रक, बस, एसटी अशा शंभराहून अधिक गाड्यांची जाळपोळ केली. आंदोलकांनी चाकणची मुख्य पोलिस चौकीही जाळली. 

आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला होता. दुपारी बारा वाजता हा मोर्चा अधिकृतरित्या संपला. सुरवातीला मोर्चामध्ये घोषणाबाजी सुरू होती. त्यानंतर अचानक आंदोलक हिंसक झाले. चाकण-शिक्रापूर, तळेगावला जोडणाऱ्या नाशिक महामार्गावर बस, ट्रक आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. 

दुपारी चारच्या सुमारास चाकण उड्डाणपुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. लगेचच महामार्गावर आंदोलकांनी आणखी चार ट्रक जाळले. याशिवाय एसटी स्थानकातील एसटी आणि इतर वाहनांचीही तोडफोड केली. नाशिक महामार्गावर चारचाकी, दुचाकी जळालेल्या अवस्थेत दिसत होत्या. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या फोडून चालकांना मारहाणही झाली. बंदोबस्तावरील पोलिस आल्यानंतर आंदोलक पांगत होते; पण पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा हिंसक घटना सुरू झाल्या.

आक्रमक आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ले केले. त्यात दोन पोलिसांना मारहाण झाली. या जखमी पोलिसांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाळलेल्या गाड्यांची छायाचित्रे, व्हिडिओ घेणाऱ्यांनाही आंदोलकांनी मारहाण केली. हातात मोबाईल दिसल्यावरही मारहाण केली जात होती. राजगुरुनगर येथे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

संबंधित बातम्या

Saam TV Live